
माझी आई सौ सुनिता यशवंत वैद्य ( ८१) जाऊन आज दीड महिना होतोय. कोविड ने माझ्या आयुष्यात निर्माण केलेली ही एक फार मोठी पोकळी आहे. माझ्या आईचा पदर धरतच मी स्वयंपाक शिकले, स्वच्छता, टापटीप, शिस्त, काटेकोर पणा, ही पूंजी देखील तिचीच. ती अत्यंत, साधी, सात्विक, आध्यात्मिक गृहीणी होती . . ती सुगरण होती, कोकणी, गुजराथी, बंगाली पदार्थ करण्यात ती तरबेज होती. कोणत्याही पदार्थाचे प्रमाण तोंडपाठ असायचे, कधीही फोन केला तर लगेच सांगायची. तिच्या हाताला प्रचंड चव होती. माझ्या खमंग blog तिच्या प्रेरणेने सुरू झाला .. यावर्षी मी “समदा” दिवाळी अंकात लेख लिहीला याचा तिला प्रचंड आनंद झाला होता. असो, आता फक्त आठवणी उरल्या आहेत.
चकल्या, पातळ पोह्याचा चिवडा, शंकरपाळे, करंज्या, भाजणी, फेसलेली लोणची, उंदीयो, थेपले, ढेबरे, पानगी किती नावे घेऊ, तीची पदार्थाची यादी फार मोठी आहे . वड्या, लाडू , साखरभात, घारगे, सांदण, खांडवी असे बरेच पदार्थ जे कधी बिघडलेच नाहित आणी ज्यांची चव पण कधी बदलली नाही. अजून एक गोष्ट म्हणजे ती फार Perfectionist होती. तिच्या मनाला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत ती त्या पदार्थ साठी मेहनत घ्यायची. तुम्हाला एक किस्सा सांगते. आमच्या घरातील स्वयंपाक घरातील ओटा फार मोठा होता. आई खूप वेळा त्यावर बसून पदार्थ करे. चकल्या तळायला ती बसायची. मी तिचा सहाय्यकाच्या भूमीकेत. ओट्यावर एक मोठी खिडकी आहे. तिच्या काचा हिरव्या रंगाच्या आहेत त्यामुळे तळण्यावर सावट यायचे. मग आई प्रत्येक घाणा तळून झाला की ती चाळण मला हातात द्यायची व अंगणात पाकटवायची. उजेडात तळलेला चकलीचा रंग बाहेरच्या उजेडात पहायला सांगायची. पण हा मी रंग तिच्या नजरेतून मी पहायचा. म्हणजे बघा “काळपट नाही ना वाटत, पिवळट नाही ना दिसत, तपकिरी दिसली पाहिजे, चकलीला काटा आला आहे ना ? अगदी बारीक तुकडा मोडून पहा, नळी पडली आहे का ? कुरकुरीत लागते ना ? कडकडीत नाही ना झाली ? ” शंभर प्रश्ण असायचे पण माऊलीची चकली कधीच बिघडली नाही. मला कंटाळा व राग दोन्ही एकदम यायचे पण ही तेवढ्याच शांतपणे माझी समजूत काढायची. “वीणा मनापासून व कष्टाने केलेला कोणताही पदार्थ कधीच बिघडत नाही हे कायम लक्षात ठेव.” हे तिचे बोल आता कायम लक्षात राहतील. ती असे पर्यंत मी चकलीची भाजणी कधीच केली नाही किंवा चकल्या सुध्दा करायची वेळ आली नाही. कारण कोणीतरी वारीला येणारे तिला सापडे मग आईच्या पुरचुंड्या बांधून तयारच असत. तिने घातलेली तीन वर्षा पूर्वीची फेसलेली मिरची अजून माझ्या कडे आहे. पंढरपूर ची हवा कोरडी त्यामुळे मिरची टिकेल म्हणून भरपूर घालून पाठवायची. आज याच मिरचीची कृती तुम्हाला देत आहे.
गेले दोन महिने माझे फारच अस्वस्थेतच गेले.
आज तिला श्रध्दांजली वहावी असे ठरवले. मला वाटते तिने शिकवलेला पदार्थ तुमच्या पर्यंत पोहचवणे म्हणजे हीच खरी श्रध्दांजली ठरेल.
साहित्य

- १/४ किलो हिरवी मिरची
- १/२ वाटी लाल मोहरी ( ६० ते ८० ग्रॅम )
- १ चमचा मेथी ( टेबल स्पून )
- २ चमचे खडा हिंग ( १० ते १५ ग्रॅम अंदाजे )
- १ चमचा हळद (टेबल स्पून )
- १० लिंबांचा रस ( मध्यम आकाराची )
- पाऊण ते एक वाटी तेल
- एक चमचा आल्याचा किस
- गुळाचा बारीक खडा
कृती
- मिरचीची देठं काढून धुवून पसरवणे. कोरड्या झाल्यावरच तुकडे करणे.
- मोहोरीची पावडर करून घेणे व ती पाण्यात ८ तास भिजत ठेवणे. जेव्हां मोहरी पाण्यात भिजवता तेव्हां मिरची फार काळ टिकत नाही. पण लिंबाच्या रसात मोहरी भिजवलीत तीन ते चार तास, तर मिरची बाहेर चांगली टिकते.
- मेथ्या तेलात तळून बारीक पावडर करणे. हिंग खडा तळून पावडर करणे.
- आवडत असले तर आले किसून घालणे ( १ छोटा तुकडा )
- आता ८ तासा नंतर भिजविलेली मोहरी फुगली असेल
- मिक्सर च्या भांड्यात गूळाचा बारीक खडा, भिजविलेली मोहरी, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद चवी नुसार मिठ हे सर्व चांगले फिरवून घ्या . मिक्सर चे झाकण उघडले कि मोहरीचा वास नाकात चढतोच . म्हणजे ती चांगली फेसली गेली आहे. आता या साहित्यात मिरची चे तुकडे मिसळा व त्यात लिंबाचा रस घाला . मस्त खाराची मिरची तयार .
- फोडणी करा त्यात फक्त मोहरी व हळद घाला. फोडणी गार झाल्यावरच घालणे.
गूळ का घालायचा ? गूळा मुळे मोहरी चांगली चढते. हि मिरची ७ / ८ महिने टिकते.
फोडणीतील तेलाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. मिरची बुडेल एवढी तेलाची फोडणी घालू शकता. जास्त खमंग लागते.
नावा प्रमाणेच खमंग ,चटकदार रेसिपी.सादरीकरण अतिशय उत्तम .
आईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
LikeLike
मस्त ! माझी आई पण करायची, फक्त लिंबा ऐवजी कच्च्या कवठाचे तुकडे घालायची.बाकी प्रोसिजर सेम टू सेम😊
LikeLike
सौं शुभांगी ताई,
आजचा पदार्थ ति. स्व. सौं सुनीताकाकू वैद्य (तुझी आई ) ह्यांकडून शिकलेला खास आहे. खूप अप्रतिम अतिशय पारंपरिक अशी खाराची मिरची !!!!!
. स्व.सौं काकू ह्यां कायमच आहेत आपल्याबरोबर फक्त एक देह रूपाने त्यांनी विश्रांती घेतली आहे. इतक्या आठवणी आहेत प्रत्येक मोठा प्रसंग असला की ति. काका आणि सौं काकू कायमच आशिर्वाद आणि आधार द्यायला सज्ज असत. सुयश ही वास्तूच सर्वांचा आधार आहे, प्रेरित स्थान आहे, माहेर आहे. नेहमीच वाटते काका काकू कायमच जसे आम्हाला लहानपणी दिसत असत तसेच कायमच दिसावेत, असावेत. सौं काकू म्हणजे मूर्तिमंत चैतन्य, वात्स्याल्य आणि शांत पवित्र असे सरोवरच.. त्यांचा प्रेमळ हात पाठीवरून फिरला की इतकी ऊर्जा आणि
शक्ती मिळत असे, हा नक्कीच माझा अनुभव आहे. त्यांचे नीट नेटकेपणा, purity, प्रत्येक पदार्थ करतानाची एक विशिष्ठ शैली, सर्वाना कुटुंबियाप्रमाणे सामावून घेण्याची कळकळ तितकाच उत्कृष्ठ पदार्थ करण्याचा आग्रह, साडी नेसताना तिचा पोत, रंग ह्यांचे अगदी अचूक विश्लेषण करून नेसणे, हे सर्वच अप्रतिम अविस्मरणीय, हेच संस्कार त्यांनी सर्वावर केले. सर्वांच्या कल्याणाची कायमच काळजी करणारी अशी ही माऊली कायमच आपल्यात आहे. कारण खूप मोठ्या गोष्टी करताना काकू कसे करतील हे सहजच कायमच मनात येते. तिच्या चरणी नम्र अभिवादन. ईश्वराचे देणेच आहे ही सौभाग्यलक्ष्मी!!
LikeLiked by 1 person
मस्त मॅडम 👌
खरी श्रद्धांजली 🙏
LikeLike