आज माझ्या खमंग ब्लॉग ला दोन वर्ष पूर्ण झाली. मागे वळून पहाताना असे वाटते की कसा काय पार पाडला हा पल्ला. हा ब्लॉग तयार करण्याची प्रेरणा माझा मुलगा मिहीर आहे. त्यानेच ब्लॉगची तांत्रिक बाजू सांभाळली आहे. ब्लॉगचे संपादन डॉक्टर अनिल करतो. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही माझे हितचिंतक ज्यांनी हा ब्लॉग उचलून धरला व मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले त्यांचे मी शतश: आभारी आहे.
मागच्या पाच महिन्यांखाली मी माझे YouTube channel सुरू केले आहे .जरा चाचपडत सुरवात करत बरीच प्रगती करत आहे 😊. khamang by Shubhangi हे या चॅनेल चे नाव आहे. खूप मोठ्या संख्येने तुम्ही या चॅनेलचे सभासद झालेले आहात व होत आहात. माझी स्पर्धा माझ्याशीच असल्यामुळे हळूहळू करत कासव गतीने मी प्रयत्न करीत आहे.
माझ्या काही चूका होत असतील तर जरूर कळवा. कौतुक तर तुम्ही करत आहातच.
तुम्हाला माझ्याकडून वेगळ्या किंवा पारंपारीक काही पाककृती हव्या असतील तर जरूर कळवा. माझ्या परीने मी त्या सांगण्याचा प्रयत्न करीन.
आजच्या या वाढदिवशी मी माझ्या आईला सादर नमस्कार करते. स्वयंपाक करणे ही एक कला आहे हे भान तिनेच मला दिले. माझ्या सासुबाईंनी पण मला तेवढीच साथ दिली आहे माझ्या प्रत्येक प्रयोगात त्यांनी सुचना व कौतुक केले आहे. काही श्रेय वडीलांकडेही जाते कारण त्यांनीच आम्हाला चवीने खायला शिकवले आहे. झामाचा सामोसा, व्हिटी ला गेल्यावर पावभाजी, दादरला बटाटेवडा, ही सर्व ठिकाणे त्यांच्यामुळेच माहित झालेली. आणि बाबा सांगतात की ही ठिकाणे मला नजरेस जरी पडली तरी भूकेने मी व्याकुळ व्हायची किंवा तहान तरी लागायची. तर अशी मी लहानपणापासूनच खवय्यी आहे (खरे तर खादाड म्हणायचे आहे पण जरा अलंकारिक शब्द वापरला कि बरे वाटते 😀🤭). ही यात्रा पुढे चालवत आज मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय डीश दाखवणार आहे.
ही डीश आवडायचे कारण म्हणजे पूर्णतः पौष्टीक, चवळीची ऊसळ न खाणारे ही हा मेनू करून बघतील, पूर्ण प्रथिनयुक्त डीश आहे, घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या सामानातून करता येते .
चला तर साहित्य व कृती पाहूयात.
साहित्य
मी जे साहित्य सांगत आहे ते सहा ते सात जण वडे खावू शकतील येवढे आहे.
वड्याचे साहित्य
- चवळी (काळे नाक असलेली शक्यतोवर घ्या) दोन वाट्या म्हणजे ४०० ग्रॅम
- तीन कांदे (साल काढून फोडी करून घेणे)
- चवीनुसार मीठ
- तीन ते चार चमचे ( टेबल स्पून ) कॉर्न फ्लॉवर
- आले एक चमचा (किसलेले)
चटणी साहित्य
- एका नारळाचा चव (साधारण दीड वाटी खोबरे)
- मिरच्या सहा (तुम्हाला चटणी किती तीखट हवी त्या प्रमाणात मिरच्या घ्या)
- एक चमचा साखर ( टीस्पून ) चवीनुसार मीठ, कोथिंबीर पाव वाटी, सहा पुदीन्याची पाने, जिरे ( एक टी स्पून )
- काजू चे तुकडे दोन टेबल स्पून, शेंगदाणे दोन टेबल स्पून
- कैरी असल्यास पाव वाटी तुकडे, जर कैरी नसेल तर एका लिंबाचा रस
सॅलेड साहित्य
- दोन गाजराचा किस
- दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
- दोन मोठे कांदे बारीक चिरून
- ऑलिव्ह ऑइल दोन टेबल स्पून (नसेल तरी चालेल ) एक टीस्पून मीरेपूड, १/२ टीस्पून दालचिनी
- वडे तळण्यासाठी तेल दोन वाटी
कृती
- पहिल्यांदा चवळी मिक्सर मधून फिरवून घ्यायची. नंतर बाऊल मधे हे चवळी चे मिश्रण घ्या व त्यात भरपूर पाणी घालून ठेवा. जरा वेळाने पाण्यावर काळी टरफले तरंगू लागतील ती गाळणी ने गाळून घेवून काढून टाकावी. परत पाणी घालून आठ ते नऊ तास चवळी भिजत ठेवा.
- आठ तासाने चवळी फुलुन वर येते. आता त्यात कांदा व आले घालून दहीवड्या साठी जशी डाळ वाटतो तशी बारीक वाटून घ्यावी. डाळ पातळ वाटायची नाही.डाळीत तीन चमचे कॅार्नफ्लाॅवर मिक्स करा व चवीनुसार मीठ घाला.
- आता कढईत तेल तापत ठेवा. वडे तेलात सोडायचे व मध्यम आचेवर तळायचे. नेहमी पेक्षा वडे तळायला थोडा जास्त वेळ लागतो. तांबूस रंगांचा होईपर्यंत वडा तळायचा.
- तोपर्यंत चटणी वाटून घ्यायची. चटणी पण पातळ वाटायची नाही . सॅलॅड पण तयार ठेवा.त्यासाठी गाजर, टोमॅटो, कांदा एकत्र करा त्यात काळीमीरी पावडर एक टीस्पून, दालचिनी पूड १/२ टीस्पून, चविनुसार मीठ व ॲाईल एकत्र करायचे.
- आता हातात वडा घ्या बरोबर मधोमध सुरीच्या मदतीने तो कापा ( शेवटपर्यंत कापायचा नाही). वड्याच्या मधोमध चटणी भरायची आणि वरून सॅलॅड भूरभूरायचे.
- तुम्ही टोमॅटो साॅस मधे हा वडा बुडवून खावू शकता किंवा कुठल्याही पातळ चटणी बरोबर पण चालेल.
आकारहे हा मूळ अफ्रिकन पदार्थ सामीश पण त्याचा आधार घेत मी ही नविन शाकाहरी डीश शाकाहरी आपल्या पुढे मांडली आहे . जरूर करून बघा .
धन्यवाद 🙏
Khupach chhan…👌he vade khamang paushtik hot asanar…aakarahe prakar mastach pak-kruti..
LikeLike
शुभांगीताईंच्या ‘ब्लॅक आइड पिज’ (हे नांव मला अधिक परिचित) च्या वड्यांची कृती नाविन्यपूर्ण असून त्यात जे सारण भरण्याचे सुचवलेले आहे, ती कल्पना विशेष वाखाणण्याजोगी आहे. एरवी दुपारचा चहा पीत असतांना सोबतीस झटपट करतां येणारे भाजणीचे वडे अंगवळणी पडलेले होते. महत्वाचे म्हणजे, सदर कृतीच्या प्रस्तावनेमुळे त्यांची यु ट्यूबवर सचित्रपणे विविध कृत्या सादर केली जाण्याची माहिती समजल्यामुळे कुतूहल म्हणून तिथे भेट दिल्यानंतर समजले की त्यांच्या ‘पुरणपोळी’च्या प्रात्यक्षिकाला २.९ मिलियन -बहुदा गृहिणी असाव्यात भेट दिल्याचा आंकडा वाचून थक्क व्हायला झाले. ‘पुरणपोळीचे’ नाते कवैय्यांना किती अप्रुपाचं असतं त्याचा अनुभव त्यामुळे आला. ते प्रात्यक्षिक देखील ‘अफलातून’ आहे. अभिनंदन !!
हेमंत वि कुळकर्णी
अमेरिका
LikeLike
खूप मस्त वाटलं . खमंग चा सुवास असाच दरवळत राहो.
LikeLike