मी एक गृहिणी आहे व याचा मला सार्थ अभिमान आहे . भारतीय परिप्रेक्षात घर हे गृहिणी भोवतीच फिरते व या घराचा स्वयंपाक घर हा अत्यंत महत्वाचा भाग असतो . भारतीय संस्कृतीत जेवणाला यज्ञकर्म समजले जाते हे आपण सर्वांना माहीतच आहे . म्हणून हेच वाक्य आपल्या ब्लॉग चे घोषवाक्य आहे . अन्नग्रहण करताना त्याची अनुभूती पंचेंद्रियांना झाली पाहिजे यावर माझा कटाक्ष असतो . या क्षेत्रातील माझी गुरु म्हणजे माझी आई . ती उत्तम गृहिणी आहेच पण त्याच बरोबर ती एक उत्कृष्ठ सुगरण ही आहे . स्वच्छता , टापटीप , अचूक माप व कामाचे नेटके नियोजन हे सर्व तिच्याकडून उचलण्याचा मी प्रयत्न केलाय.
मी महाराष्ट्रीयन असल्याने या ब्लॉग मधे महाराष्ट्रीयन पदार्थांना थोडेसे झुकते माप मिळणार हे उघड आहे . परंतु ब्लॉग ला महाराष्ट्रीयन किंवा भारतीय असे संबोधून एका कप्प्यात बंद करण्याची माझी अजिबात मनीषा नाही . जगभरातल्या वेगवेगळ्या स्वादिष्ट पाककृतींचा वेध घेण्याचा माझा इरादा आहे . तांत्रिक दृष्ट्या या ब्लॉग ची मालकी माझी असेल ही परंतू ब्लॉग चे यश तुम्ही दिलेल्या प्रतिसादातच आहे . चला तर रूप , गंध व रस यांची एक लज्जतदार सहल सुरु करूया .
शुभांगी अनिल जोशी
