मंडळी,
भारतीय किंवा महाराष्ट्रीयन स्वयंपाकात पानाच्या डाव्या बाजूचे एक वेगळेच महत्त्व आहे. अनंत प्रकारची लोणची, कोशिंबिरी, चटण्या यांची पानात डाव्या बाजूला रेलचेल असते. मुख्य पक्वान्नांची चव ही मंडळी द्विगुणित करतात. अगदी वर्षातले 365 दिवस रोज नवीन डावी बाजू करून घालता येईल इतकी कल्पक विविधता याबाबतीत आपल्याला आढळते. वर्षभराचे जाऊ द्या निदान एक आठवडा नवनवीन डावी बाजू वाढता येईल एवढी माहिती माझ्या आगामी सात अंकात देण्याचा मानस आहे. आज सुरुवात करतेय ती एका चुरचुरीत तोंडीलावण्याने !
साहित्य

- एक वाटी हिरव्या मिरच्या तुकडे
- १/२ वाटी लसूण पाकळ्या थोड्या जास्तीही चालतात
- शेंगदाणा कूट २ चमचे (कूट फार बारीक करायचे नाही)
- दोन चमचे तेल
- हिंग, हळद, मीठ चवीनुसार
कृती
- मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्या. लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या
- कढईत दोन चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, हळद घाला (जिरे मोहरी अजिबात घालायची नाही). या फोडणीतच आता मिरच्यांचे तुकडे घाला. ठेचलेला लसूणही घाला. मिरची व लसूण थोडे परतून घ्या.
- परतल्यानंतर त्यात थोडेसे शिजण्यापुरते पाणी घाला. चवीपुरते मीठ घाला. एक उकळी आणल्यानंतर जरा मिरची मऊ झाल्याची खात्री करून शेंगदाण्याचे कूट घाला. हे मिश्रण परत एकदा थोडेसे शिजवा.
- हे मिरचू बाहेर ठेवल्यास दोन दिवस टिकेल. पण फ्रिज मधे डब्यात ठेवल्यास आठ दिवस आरामशीर टिकेल.
बस…. आपला मिरचू तयार! काही वेळेला उजवी पेक्षा डावी बाजू बाजी मारून जाते. तशातलाच हा प्रकार आहे. ही सुंदर कृती मला माझ्या ताई, सौ विद्या हजारे यांनी दिली आहे.