भत्ता

on

भत्ता , ज्याची निवांत पंढरपूरवर निर्विवाद सत्ता !
बोला आता त्याला काय करता ?

पंढरपूरच्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे निवांतपणा व भत्ता. पंढरपूर तसे निवांतच आहे चार वाऱ्या सोडल्या तर इतर वेळी लोकांना कार्यप्रवण ठेवणारे फारसे उद्योग नाहीत. त्यामुळेच निवांत हा शब्द पूर्णपणे लागू पडतो. निवांत वेळी माणसं काय करतात एकतर गप्पा मारतात नाहीतर खातात. पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे चुरमुरे आणि बत्तासे. पंढरपूरला फार मोठी याची बाजारपेठ आहे. रोज दुपारी ताजे चुरमुरे आणायचे त्याचा भत्ता करायचा नाहीतर चिवडा. भत्ता आणि चिवडा हे चुरमुरा घराण्याचे दोन लोकप्रिय ख्याल. आमच्याकडे भत्ता जरा जास्त चालतो .भत्ता करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे चुरमुरे कालवून लगेच संपवायचे आणि दुसरी पद्धत म्हणजे चुरमुऱ्याला तेल मसाला लावून चार दिवस खाता येईल असा भत्ता करून ठेवायचा.

पंढरपूरात हा भत्ता बनवणारी खास प्रसिद्ध घराणी आहेत. गवळी समाज प्रामुख्याने हा भत्ता बनवण्यात तज्ञ आहे. आमचा तेरकर, आमचे महेश काका, यांच्या हातचा भत्ता म्हणजे विचारूच नका. जेवण झालेले असताना देखील त्यांनी भत्ता पाठवला तर डाॅक्टर, ओंकार, अभय ही मंडळी परत त्यावर ताव मारायला तयार असतात 😀👍.
पंढरपूरात विभूते व गवळी यांचा भत्ता प्रसिद्ध आहे . हा भत्ता मी जेव्हा प्रथम खाल्ला तेव्हां नाक व डोळे लाल होवून डोळ्यांना मात्र धार लागली.
हा भत्ता पुरूष मंडळी उत्तम करतात. पटकन बेत ठरवून लगेच हातोहात भत्ता तयार पण होतो. फळीवर पेपर पसरवून कुठल्याही फारश्या साधनसामुग्रीची वापर न करता हा भत्ता सिध्द होतो. आणि भत्याला काळ वेळ यांचे बंधन नाही. असा हा भत्ता आता आपण करूयात चला.
याला लागणारे साहित्य रोजच्या वापरातलेच आहे. चला तर मग पाहूया काय काय लागतं भत्ता करायला ते.

पहिली कृती पटकन खाण्यासाठी :

साहित्य

  • पाव किलो ताजे चुरमुरे
  • १०० ग्रॅम भाजके दाणे
  • दोन कांदे, अर्धी वाटी कोथिंबीर, असल्यास दोन कैरीच्या फोडी, सात ते आठ पाकळ्या लसणीच्या सोलून घ्या.
  • एक चमचा(टेबल स्पून ) काळे तिखट
  • दोन टेबलस्पून शेंगदाणा तेल ( करडई देखील चालेल )
  • चवीनुसार मीठ.
  • पन्नास ग्रँम बारीक शेव

कृती

  1. चुरमुरे पहिल्यांदा चाळुन घ्या. आता त्यात शेंगदाणे घाला. कांदा घाला. कैरी घालायची. कोथिंबीर घालायची.
  2. एका वाटीत दोन टेबलस्पून तेल घ्या. त्यात काळे तिखट ( मसाला), किंचीत मिठ व लसणीच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून त्या मसाल्यात मिसळायच्या. हा मसाला चांगला एकजीव करून घ्या.
  3. आता वरील मिश्रण पातेल्यातील चुरमुर्याला हाताने चांगले चोळा.
  4. आता आपला भत्ता तयार आहे आणि हा पटकन संपवायचा पण आहे. आहे की नाही करायला सोपा. ना फोडणी, ना तळणी.

दुसरी कृती साठवणूक करण्यासाठी

साहित्य

  • पाव किलो ताजे चुरमुरे
  • १०० ग्रॅम भाजके दाणे
  • एक चमचा(टेबल स्पून ) काळे तिखट
  • दोन टेबलस्पून शेंगदाणा तेल ( करडई देखील चालेल )
  • चवीनुसार मीठ.
  • अर्धा टेबल स्पून जिरे पावडर, अर्धा टेबलस्पून धने पावडर, पाव टेबलस्पून पिठीसाखर, अर्धा टेबल स्पून लाल तिखट.

कृती

  1. चुरमुरे पहिल्यांदा चाळुन घ्या. आता त्यात शेंगदाणे घाला.
  2. एका वाटीत दोन टेबलस्पून तेल घ्या. त्यात काळे तिखट ( मसाला) घालायचे त्यातच चवीनुसार मीठ,पाव टेबल स्पून पिठीसाखर, अर्धा टेबल स्पून जिरे पावडर व धने पावडर व भत्ता जर खूप तिखट हवा असेल तर अर्धा चमचा लाल तिखट घाला. आता सर्व मिश्रण चांगले कालवून घ्यायचे.
  3. पातेल्यातील चूरमुर्याला वरील कालवलेले सर्व मिश्रण हाताने चोळून लावायचे.
  4. अशा पद्धतीने केलेला भत्ता पाच ते सहा दिवस टिकतो.

टीप : या भत्यात कोथिंबीर कांदा लसूण घालायचा नाही कारण हे सर्व घातल्यावर भत्ता मऊ पडेल. त्यामुळे टिकाऊ भत्त्यासाठी वरील सर्व जिन्नस घालायचे नाहीत .

4 Comments Add yours

  1. विनायक तेलंग's avatar विनायक तेलंग म्हणतो आहे:

    वा वाचून तोंडाला पाणी सुटले पण इकडे पेणला पंढरपूर सारखे चिरमुरे मिळत नाही पंढरपुरातील क्षेत्र उपाध्ये मंडळींचा हा आवडता खाद्य प्रकार कारण कुळधर्म कुळाचार करताना स्वयंपाकाला हमखास उशीर होई व संध्याकाळी स्वयंपाक न करता व दुपारच्या गोड जेवणावर उतारा म्हणून त्याला म्हणजे भत्याला खूप मागणी आणि हे करण्यात पुरुष मंडळींचा पुढाकार असायचा माझे आजोबा दात गेल्यावर भत्ता कुठून खात असत

    Liked by 1 person

  2. Sharmila's avatar Sharmila म्हणतो आहे:

    Very nice ,how to make kale tikhat?

    Like

  3. Prajakta khadilkar's avatar Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    alpamoli bahuguni…karayala sutsutit khayala chamchamit…receipe mast..bhari bhatta👌

    Liked by 1 person

  4. Anuradha Phatak's avatar Anuradha Phatak म्हणतो आहे:

    I would like to know your Masala recipe used in the Bhatta. I am Born and Brought uo in Sadashiv Peth Pune. Also I am Joshi by birth. So I feel more connected to you.

    Like

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.