शेंगपोळी किंवा शेंगापोळी

on

ही पोळी खास करून थंडीत म्हणजे संक्रांतीला केली जाते. सोलापूर भागात शेंगपोळी फारच प्रसिध्द आहे. आपल्याला गुळाची पोळी, तीळाची पोळी माहित आहे पण शेंगपोळी फारशी माहित नाही. जरा चवीला वेगळी लागते. तुम्ही सोलापूर हायवे ने जायला लागलात तर जसे सोलापूर जवळ येईल तसे तुम्हाला शेंगपोळीचे बोर्ड दिसून येतील. आमच्या या सोलापूर जिल्हयात पदार्थात शेंगदाण्याचा वापर जरा सरसच करतात . शेंगचटणी, शेंगभाजी, ईत्यादी.
शेंगपोळी ही गुळाच्या पोळी सारखी खुटखुटीत नसते. शेंगपोळी जरा जाड व मऊ असते. गोडीला पण बेतास असते पण फारच खमंग लागते.
चला आपण साहित्य आणि कृती पाहूयात

साहित्य

  • २०० ग्रॅम दाणे भाजलेले (अडीच वाट्या कूट होते याचे)
  • १५० ग्रॅम गूळ बारीक करून (दीड वाटी साधारण)
  • एक टेबल स्पून भरून तीळाचे कूट (तीळ भाजून कूट करणे)
  • एक चमचा वेलची पूड (टी स्पून)
  • तीन वाट्या भरून कणिक ( साधारण चारशे ते पाचशे ग्रॅम )
  • तीन टेबल स्पून तेल
  • सहा चमचे (टेबल स्पून) साजूक तूप
  • १/४ चमचा मीठ (टी स्पून)

कृती

  • प्रथम कढईत दाणे खरपूस भाजून घ्या. दाणे कोमट असतानाच साल काढून घ्या. नंतर मिक्सर मधे कूट करून घ्या. कूट खूप बारीक नको म्हणजे दाण्यातून तेल निघेपर्यंत बारीक करायचे नाही. गूळ सुध्दा बारीक चिरून अथवा कूटून घ्यायचा. तीळ पण खमंग भाजून बारीक कूट करा.
  • आता परात घ्या त्यात कणिक घ्या,चविपुरते किंचीत मीठ घालायचे, तीन चमचे तेल घालून कणिक मळून घ्यायची. पाणी बेताबेताने घालून मळा फार पातळ कणिक करायची नाही. पुरणपोळी ला लागते तशीच कणिक मळायची.
  • जसे पुरणाच्यापोळी साठी लाटी घेतो तशीच लाटी घ्यायची, त्याचा द्रोण तयार करायचा व त्यात सारण भरायचे. सारण पूरण पोळी सारखे खूप भरायचे नाही. पण खूप कमी पण सारण नको, बेतास भरा. पारीचे तोंड दुमडून पोळी कणकेवर अथवा तांदूळाच्या पिठीवर पोळी एकसारखी लाटायची. ही पोळी जरा जाडसर लाटायची. फार पातळ लाटली तर कूट व गूळ तव्यावर चिकटेल.
  • पोळी भाजताना दोन्ही बाजूने तूपसोडून (किंवा तेल सोडून) पोळी उलथन्याने दाबत खमंग भाजायची.

मग करून पाहतांना ही शेंगपोळी

टीप

  • वरील जीन्नसात दहा पोळ्या साधारण होतील.
  • या पोळीतून गूळ व शेंगदाणा यांच्या संयोगाने शरीरास लोह भरपूर मिळते. त्यामुळे लहान मुलांना पौष्टीक व खमंग पदार्थ म्हणून द्यायला उत्तम.
  • या पोळ्या प्रवासात न्यायला उत्तम, कारण शेंगपोळी आठ ते दहा दिवस उत्तम टिकतात.
  • करायला सोपी, मोजक्याच जिन्नसात होतात.
  • या पोळी बरोबर तूप असल्यावर दुसरे कोणतेही तोंडीलावणे लागत नाही.

3 Comments Add yours

  1. Sayali Lad's avatar Sayali Lad म्हणतो आहे:

    मस्त ग

    Liked by 1 person

  2. मैत्रेयी केसकर's avatar मैत्रेयी केसकर म्हणतो आहे:

    मस्त ! सर्वांची आवडती शेंगपोळी ! छान रेसिपी !

    Liked by 1 person

Leave a reply to Prajakta khadilkar उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.