फणसाचे आपल्याला सांदणं, खीर, बिस्किटं, केक, फणस पोळी, आईस्क्रीम इत्यादी प्रकार माहीत आहेत. पण आज मी तुम्हाला फणसाचे घारगे कसे करायचे ते सांगणार आहे. ही पाककृती माझ्या मावशीने मला सांगितली. करायला अत्यंत सोपी अशी ही पाककृती आहे. कापा व बरका हे फणसाचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. आज मी तुम्हाला “बरका “ प्रकारच्या फणसाचे घारगे करून दाखवणार आहे.
साहित्य

- एक वाटी बरक्या फणसाचा गर
- एक वाटी तांदळाची पिठी
- दोन चमचे कणीक ( टेबल स्पून )
- दोन चमचे मोहन ( तेल, टेबल स्पून )
- दोन चमचे गुळ ( टेबलस्पून ) गुळाचे प्रमाण फणसाच्या गोडी नुसार कमी जास्त करता येते
- चवीप्रमाणे मीठ
कृती
- पहिल्यांदा गऱ्यातील आठळ्या काढून रस काढा.
- काढलेला रस पॅनमध्ये घेऊन गॅसवर थोडा आटवावा.
- तांदुळाची पिठी पण थोडी भाजून घ्यायची. पिठीचा रंग बदलू देऊ नका.
- आता मोठ्या बाऊलमध्ये आटवलेला फणसाचा रस घ्या. त्यात तांदळाची पिठी घाला. दोन चमचे कणिक घाला किंचित मीठ घाला. दोन चमचे तेलाचं मोहन घाला. ( मोहनासाठी दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे) . गुळ घाला .आता सर्व जिन्नस एकत्र करून चांगले मळायचे. इतके मळले गेले पाहिजे की घारगा थापताना किंवा लाटताना त्याला चिरी जाता कामा नये. घारगा लाटताना फार पातळ लाटू नये. मध्यम जाडीचे लाटल्यास ते छान फुगतात.
- गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर एकेक घारगा तळून घ्या. घारगे चांगले टम्म फुगले पाहिजेत.
- घारगा साजूक तुपाबरोबर खायचा. तोंडी लावायला खाराची मिरची किंवा आंब्याचे लोणचे घेऊ शकता.
टीप
जर बरका फणस मिळत नसेल तर काप्या फणसाचे गरे घ्या. आठळ्या काढून तो मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे छान रस निघेल आणि मग त्याचे घारगे करता येतील.
Very interesting variation!
LikeLike
Are waa mastach👌
LikeLike