मंडळी नमस्कार,
आज अश्विन शुद्ध एकादशी. आज विठ्ठलाला आणि रुक्मिणीला दोघांनाही नेहमीचाच वेश परिधान केला गेला आहे. त्यामुळे त्याचे फारसे विवेचन आज करत नाही. आज परिवार देवतांपैकी अजून एक महत्त्वाची देवता म्हणजे शहराच्या उत्तर भागात असलेली लखुबाई. इथे मंदिर नदीकाठी आहे. मंदिरासमोर उभे राहिले की चंद्रभागेचे विहंगम दृश्य दिसते. पैलतीरी असलेला इस्कॉनचा घाट देखील दिसतो आहे .या भागाचे पुरातन नाव दिंडीरवन आहे. याला पूर्वी चिंचबन म्हणून ओळखले जायचे.राधेची कृष्णाची असलेली जवळीक सहन होऊन रुक्मिणी माता रुसून आली ती पहिल्यांदा इथेच अशी आख्यायिका आहे. या भागात पूर्वी मोठी चिंचेची झाडे होती .कालौघात त्यातील बहुतांश झाडे नष्ट होऊन आता एखादे झाडच तेथे शिल्लक आहे.
माझ्या परिचयाच्या सुनंदाताई कुलकर्णी गेली अनेक वर्षे देवाचा प्रसाद करण्याचे काम करत होत्या . आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी एकादशीला देवाचा नैवेद्य कसा केला जातो त्याची सविस्तर माहिती मला दिली. त्यावरून मी घरी ते सर्व पदार्थ तयार केले आहेत. देवाच्या नैवेद्याचा अधिकृत फोटो उपलब्ध होऊ शकला नाही. आज काकडा झाला की देवाला भगर, शेंगदाणा चटणी, दही आणि तूप हा नैवेद्य असतो. दुपारच्या महाप्रसादात ताटात बरेच पदार्थ असतात ते खालील प्रमाणे ;
साबुदाणा खिचडी, भगर, दाण्याची चिंच गुळाची आमटी, बटाटा भाजी, दाण्याची चटणी, काकडीची कोशिंबीर, भगरीचा शिरा, दाण्याचा लाडू, साबुदाणा व भगर एकत्र करून केलेल्या पुऱ्या, मठ्ठा, दोन केळी, श्रीखंड असा हा उपवासाचा नैवेद्य असतो.
रुक्मिणीसाठी मात्र केळ्याची शिकरण असते.
. धुपारतीनंतर परत भगर, दही, तूप, चटणी आणि वाटीत साखर आणि साय याचा नैवेद्य असतो. आता यातले दोन वेगळे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे.
पहिला पदार्थ म्हणजे साबुदाणा पीठ आणि भगर पीठ यांची पुरी.
साहित्य:
१ एक वाटी भगर पीठ
२ एक वाटी साबुदाणा पीठ
३ दोन चमचे दाण्याचे कूट
४ दोन हिरव्या मिरच्या
५ पाव चमचा जिरे
६ चवीनुसार मीठ
७ तळण्याकरता तेल
कृती:
१ साबुदाणा पीठ भगर पीठ एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घाला. थोडेसे मोहन घाला.
२ मिक्सरच्या भांड्यात दोन मिरच्या, दाण्याचे कूट, जिरे बारीक वाटून घ्या आणि वरील मिश्रणात मिसळा.
३ या सर्व मिश्रणात लागेल तसे पाणी घालून छान उंडा म्हणून घ्या.
४ आता पोळपाटावरती प्लास्टिक वर खाली घेऊन छोट्या छोट्या पुऱ्या लाटा.
५ या पुऱ्या तेलात तळून घ्या. तळताना गॅस मोठा ठेवू नका. पुरी छान खुसखुशीत होते. तिखट मिठाची चव देखील वेगळी लागते.
जरूर करून पहा ही पुरी..
दुसरा पदार्थ आहे नारळाच्या दुधातील खांडवी
साहित्य:
१ अर्धी वाटी वऱ्याचे तांदूळ
२ अर्धी वाटी साखर
३ एक वाटी नारळाचे दूध
४ चिमूटभर मीठ
५ पाच-सहा दाणे वेलचीचे
६ पाव चमचा तूप
कृती:
१ नारळाच्या दुधात साखर विरघळवून घ्या.
२ कढईत तुपावरती वरीचे तांदूळ चांगले भाजून घ्या.
३ आता दुधाला उकळी आणून त्यात भाजलेले वऱ्याचे तांदूळ घाला.
४ हे मिश्रण चांगले हलवून घ्या. गुठळी होऊ देऊ नका.
५ आता यावरती झाकण ठेवून दणकून वाफ आणा. वरी तोंडात टाकल्यावर कच्ची लागता कामा नये.
६ मध्येच एकदा कढईवरील झाकण काढून एक चमचा तूप सोडून मिश्रण हलवून घ्या.
७ आता एका ताटलीला तूप लावून त्यावर वरील मिश्रण थापून घ्या. वरून ओले खोबरे भुरभुरा.
८ हे मिश्रण गार झाले की वड्या कापून घ्या.
हा पदार्थ नैवेद्यात नसतो . त्या ऐवजी वरीचा शिरा असतो.
या सर्व पंधरा दिवसाच्या कालावधीत पोशाखाइतकेच कपाळीच्या नामाचे महत्त्व आहे. त्यातही वेगवेगळे आकर्षक प्रकार केले जातात.
त्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील ध्वनीचित्र फीत जरूर पहा.
सौ शुभांगी जोशी
Khamang.blog
Khamangbyshubhangi you tube channel.
उद्याचे रुक्मिणी मातेचे रूप खूप वैशिष्ट्यपूर्ण व वेगळे असणार आहे… थोडी वाट पहा…
chaan mahiti dilya baddal khup dhanyawaad . Khup chaan ani veghlya recipes
LikeLiked by 1 person