मंडळी नमस्कार,
आजची सातवी माळ. नवरात्राचे नऊही दिवस श्री रुक्मिणी पांडुरंगाला पंचपक्वानांचाच नैवेद्य असतो. फक्त एकादशी दिवशी उपवासाचा नैवेद्य दाखवला जातो. श्री पांडुरंगाच्या नैवेद्यात कायम बटाट्याची भाजीच असते मात्र रुक्मिणीच्या ताटात त्याचबरोबर वांगी, भेंडी ,गवा,र घेवडा , कोबी इत्यादी इतर भाज्यांचाही समावेश असतो. दिवाळीपर्यंत पंचपक्वानात श्रीखंडाचा समावेश असतो. दिवाळीनंतर बासुंदी असते आणि अक्षय तृतीयेपासून आमरस सुरू होतो.मार्गशीर्षात सटीच्या नवरात्रात रुक्मिणीच्या पानात आवर्जून वांग्याची भाजी असते.आजच्या पोशाखाला पसरती बैठक असे म्हणतात. यात मंचकावर मांडी घालून बसलेली रुक्मिणी आहे. तिला तीन साड्यांच्या निऱ्या करून नेसवलेल्या जातात. पूर्ण मंचकभर साड्यांच्या निऱ्या असतात म्हणून पसरती बैठक हे नाव.असाच पोशाख कोल्हापूरची अंबाबाई देखील करते. त्यामुळे आजचा अवतार तिच्यासारखा आहे असे आपण म्हणू शकतो.
सगळ्यात वर खड्याची वेणी त्यानंतर सोन्याचा मुगुट, त्यावर बांधलेली सोन्याची दोन पैंजणे, मुकुटावर हिरे व मोती जडवलेला चंद्र. मद्रासी पद्धतीचा कंठा मुकुटाला बांधलेला आहे आणि त्यातील मधले पदक माणिक आणि मोत्यांनी सजवलेले आहे. ते तुऱ्यासारखे एका बाजूला लावले आहे.हिऱ्याची मद्रासी नथ नाकात आहे. सोन्या मोत्याचे चांदवड आहे. कानात कर्णफुले आहेत. गळ्यात हिरवी चिंचपेटी, मोत्याचे मंगळसूत्र, पांढरे हिरे बसविलेला मोठा मोत्याचा तन्मणी, नवरत्न हार, मोहरांची माळ, मोत्याचा कंठा, बाजूबंद, माणिक मोत्यांच्या बांगड्या आणि एक तारा मंडल,कमरेत पेट्यांची बिंदी बांधलेली आहे.
आजचा पांडुरंगाचा पोशाख ही खूपच विलोभनीय आहे त्यामुळे त्याचे रूप ही थोडेसे पाहूयात. आज त्याचा मत्स्यावतार आहे; दशावतारातला पहिला अवतार. सोन्याचा मुगुट, शिरपेच तुरा, चंदेरी तुरा, नीलमची नामकांडी, गळ्यात रुद्र गाठीचा गोफ आहे. कंठी अर्थातच ध्वनी आहे, चंद्रहार आहे, माणिकाचे बाजूबंद आहेत , दोन्ही हातात तोडे आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे धोतरावरती घातलेले मत्स्यरुपी सुवर्ण कवच ! त्या मत्स्यालासुद्धा माणिकाचा तुरा आहे बरंका !
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
जशा वेगवेगळ्या भाज्या आपण करतो तशा वेगवेगळ्या कोशिंबीरीही पानात लागतातच. पानाची ही बाजू बळकट करण्यासाठी आज पाहुयात मायाळूचे रायते .
मायाळुचे रायते (दह्यातली कोशिंबीर )
साहित्य
१= मायाळुच्या पानाची जुडी , किंवा दहा ते बारा पाने मायाळुची स्वच्छ धुवून घ्यायची
२= १/२ वाटी नारळ खोवलेला
३=दोन लाल मिरच्या
४=एक वाटी दही
५= फोडणीसाठी ( दहा दाणे मोहरीचे , चारदाणे मेथीचे , हिंगाचा बारीक खडा, जिरे ) सर्व खडबडीत कूटून घ्यायचे
६= एत चमचा दाण्याचे कूट आणि भाजलेले दाणे सहा ते सात
७= चवीनुसार मीठ / साखर
८= फोडणीसाठी तेल
कृती
१= मायाळुची धुतलेली पाने बारीक चिरून पाण्यात ठाकायची ( जरा गुळगुळीत लागतात पान चिरल्यावर )
२= कढईत तेल घालायचे आणि आपण कूटलेले फोडणीचे साहित्य तेलात तडतडू द्यायचे . मिरची फोडणीत तुकडे करून घालायचे . आता चिरलेला मायाळू पाण्यातून निथळून फोडणीत घालायचा , मीठ पण घालायचे , ओला नारळ सुध्दा घालायचा चांगली वाफ आणायची आणि साहित्य सगळे गार करत ठेवायचे .
३= बाऊल मधे दही जरा फेटून घ्यायचे त्यात साखर , दाण्याचे कूट घालायचे.
४= मायाळूचे मिश्रण जरा हाताने कुस्करल्या सारखे करायचे . नंतर फेटलेल्या दह्यात मायाळू घालायचा आणि रायत एकसारखे करून घ्यायचे . आता वरून भाजलेले अख्खे दाणे घालायचे अप्रतिम चवीचे रायते तयार . जरूर तरून पहा 👍
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi YouTube channel
माहिती संकलन विशेष सहकार्य : श्री चिंतामणी उत्पात, पंढरपूर
mast navin recipe
LikeLiked by 1 person