वैभवशाली नवरात्र : माळ आठवी

on

मंडळी नमस्कार,

अशीच आंबे हास माझ्या दारी हास ग.. 

जन्मोजन्मी दास व्हावे हीच माझी आस ग !

आज अष्टमी. आजचा पोशाख कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आहे. आज रुक्मिणीच्या अंगावर एकंदरीत २७ दागिने आहेत. आजचा तिचा पोशाख ‘खडा पोशाख‘ प्रकारचा आहे.

आज तिला गुलाबी रंगाची पैठणी नेसवली आहे. सर्वात प्रथम मुगुट आहे, खड्याची वेणी आहे, पारंपारिक बाजूबंद मुकुटात बांधले गेले आहेत. त्यावर सूर्य प्रतिमा आहे. आज खास नवरत्नांची बिंदी व खड्या मोत्यांची बिंदी देखील बांधली आहे. कर्णफुले आहेत. कालच्यासारखाच मद्रासी साजाचा तुरा तिच्या मुकुटावर बांधलेला आहे. सोन्या- मोत्याचे तानवड आहेत. कानात सोन्याचे मत्स्य  जोड आहेत. मोठी मोत्याची नथ घातली आहे. गळ्यात हिरवी चिंचपेटी आहे. त्याखाली सोन्याची ठसठशीत ठुशी आहे. त्या खाली  पाचूंची गरसोळी आहे. सोन्याच्या कंठ्या आहेत. चंद्रहार आहे. त्यातला मोठा प्रकार देखील आज तिला घातला आहे. लांबलचक कोल्हापुरी साज आहे. कळ्या पाकळ्यांचा हार आहे. एक जडावाचा हार आहे. मोहरांची माळ आहे. घुंगरांचा कंठा कंबरेला  बांधला आहे. आज तिला पायात चांदीचे कवच घातले आहे. त्यावर सोन्याचा रूळ आहे. सोन्याचे पैंजण जोड आहेत. दंडात कलमाडी बाजूबंद आहेत. हातात मोती पाचू सोने यांच्या बांगड्या आहेत. मळवटावर मधोमध अक्षत लावलेली आहे. आजचे तिचे रूप या सर्व साजांमुळे खूपच खुलून दिसत आहे. चेहऱ्यावरील मंदस्मित व शांत भाव मनाला तृप्त करतात. 

रुक्मिणी एवढी सजलेली आहे तर पांडुरंगाला कसे मागे राहून चालेल. चला त्याचाही आजचा थाट पाहूया. 

सुरुवातीच्या  छायाचित्रात त्याचे कुर्मावतारातील रूप स्पष्ट होते आहे तर वरील छायाचित्रात  दागिन्यांचा तपशील दिसतो आहे. 

आज त्याला  सोन्याचा खास शिरपेची मुकुट बांधला आहे. तो मुकुट निरखून पहा आणि त्यातील  कलाकुसरीचा आस्वाद घ्या. मुकुटावरती मोत्याचा डौलदार तुरा आहे. दोन भुवयांमध्ये चंदनाचे सुंदर नाम आहे. त्यावर मधोमध अक्षत लावली आहे. कानात सोन्याचे मत्स्य आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. त्याखाली मोत्याचा कंठा आहे. नंतर राजेशाही हार आहे. हिऱ्यांची पदके जडवलेला मोती-पाचूंचा  हार आहे. नंतर सोन्याचा तुळशीहार आहे. हातात शिंदेशाही तोडे व दंडात सोने व माणिक यांचा वापर करून केलेला कलात्मक बाजूबंद आहे.  सोवळ्या वरती कुर्मावताराचे निर्देशन करणारा सोन्याचा कूर्म  आहे. हा सोन्याचा कूर्म  बडवे मंडळाने खास बनवून घेतलेला आहे असे समजते. आज खरोखरीच उभयतांचे हे रूप डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ : तुकोबा 

नैवेद्यात भजी, अळूवडी हे पानात डाव्या बाजूस वाढलेले असतेच. भजी प्रकार आपली रूची वाढवतो. चमचमीत काहीतरी मेनू हा हवाच 👍

पण आज जी भजी करणार आहोत ती उपासाची भजी आहेत.

उपासाची बटाटा राजगिरा भजी 

साहित्य 

१= राजगिरा पीठ दोन वाट्या,

२= किसलेला कच्चा बटाटा १ वाटी,

३= १ वाटी भरून दाण्याचे कूट, 

४= तीन मिरच्या कूटून,

५= १/४ चमचा जिरे पूड, 

६= चवीनुसार मीठ 

आणि उपासाला कोथिंबीर चालत असेल तर पाव वाटी चिरलेली कोथिंबीर .

कृती 

१= सालासकट बटाटा किसून पाण्यात ठेवा . 

२= वाडग्यात मिरचीचे कूट , मीठ , जिरेपूड , दाण्याचे कूट , निथळून ठेवलेला बटाट्याचा कीस हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करा, आता यात राजगिरा पीठ घालून कालवून घ्या. पाण्याची गरज असेल तर पाणी घालून पीठ सरसरीत करा ( पण पातळ नको बॅटर हातानेच भजी सोडता आली पाहिजे तेलात ) 

३= कढईत तेल गरम झाल्यावर भजी सोडा आणि मंद आचेवर चांगली तपकिरी रंग येईल इतपत भजी तळून घ्या .

खरंच अप्रतिम होते ही भजी. खमंग आणि कुरकुरीत. जरूर करून पहा 👍

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.