तोंडीलावणी या मालिकेतली चौथी चटणी
साहित्य

- कच्ची पपई अर्धी (साधारण दोन वाटी कीस होईल)
- दोन चमचे कच्चे तीळ
- दोन चमचे भरून कच्चे (न भाजलेले) दाणे
- दोन चमचे सुख्या खोबऱ्याचा कीस
- चवीनुसार मीठ, लिंबू, साखर
- कोथिंबीर व फोडणीसाठी तेल
- तीन ते चार मिरच्या
कृती
- प्रथम पपईचे साल व बीया काढून पपईचा कीस बारीक कीसणीने करून घ्यायचा.
- कढईत दोन ते तीन चमचे तेल घ्या. या चटणीला नेहमी पेक्षा जास्त तेल लागते. त्यामुळे लागेल तसे तेल घालायचे.
- तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, हिंग, हळद घालून फोडणी करा. आता या फोडणीत पपईचा कीस व मिरच्यांचे तुकडे घालायचे व एकच वाफ आणायची. कीस बोटाने दाबला तर मऊ लागला पाहिजे. इतपत वाफ बास.
- आता खलबत्ता अथवा मिक्सर मधे तीळ व दाणे भरड स्वरूपात वाटायचे.
- वाफ आणलेल्या पपई मधे तीळ, दाणे, खोबरे, घालायचे. आणी भांड्यावर झाकण न ठेवता मिश्रण ५ ते ६ मिनींटे मंद आचेवर परतत रहायचे. आपण तीळ, खोबरे, दाणे कच्चेच घेतले आहेत हे लक्षात ठेवून परतायचे. म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत परतत रहायचे.
- मिश्रणाचा रंग बदलला की साखर व मीठ घालायची व परत एकदा दोन मिनीटे चटणी परतायची .
- चटणी बाऊल मधे काढून त्यावर भरपूर लिंबाचा रस पिळायचा. कोथिंबीर घालायची व सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे.
मस्त आगळावेगळा चटणीचा प्रकार तयार !
तुम्ही फुलका,थेपला, दशमी, भाकरी, ब्रेड, सर्वांबरोबर ही चटणी खाऊ शकता.
मला माझी वहिनी ( रागीणी थत्ते ) हिने ही वेगळी चटणी शिकविली . 👍👍👍
करून पहा व प्रतिक्रिया कळवा 🙏