झाडाला लागलेल्या हिरव्या कंच कैऱ्या पाहिल्या की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही सांगा बरे. मग दगड मारून, काठीने, उड्या मारून कैरी पाडण्यात ( आपल्या झाडाची नाही बर का ,दुसऱ्याच्या झाडाची) व तीखटमिठ लावून कैरी खाण्याची मजा औरच !! 😀👍
मग मे महिना व जूनचा पहिला आठवडा कैरीचे नानाविध प्रकार आपण करत असतो. टक्कू, लोणचे, गुळांबा, चटणी, पन्हे, सार, चित्रान्न, अजून बरेच सारे प्रकार घरात होतात. मग नविन पदार्थांची देवाणघेवाण होते यांतील काही पदार्थ आपण उत्साहाने करून बघतोही. काल तसेच काहिसे झाले. माझी मैत्रीण वर्षा काळे मला विचारत होती “तु कैरीची आमटी केली आहेस का कधी ? मी म्हटले “नाही ग”.
“अग माझे वडील खूपच मस्त ही कैरीची आमटी करीत असत. गरम भाताबरोबर तर भारीच रुचकर लागते ती”.
आता फार वेळ न दवडता तीने सांगितलेली कैरीची आमटीची कृती खालीलप्रमाणे.
खालील साहित्यात चार जणांना पुरेल येवढी आमटी होईल .
साहित्य

- एक मध्यम आकाराची कैरी ( साल काढून वाटीभरून फोडी होतात )
- एक कांदा ( साल काढून उभे पातळ काप करून घ्या)
- अर्धा नारळाचा चव ( खोवलेलं खोबरे )
- दोन सुक्या लाल मिरच्या
- एक चमचा ( टेबल स्पून ) धने
- दोन चमचे साखर
- चविनुसार मीठ
- एक चमचा तेल फोडणीसाठी ( टेबल स्पून )
- एक चमचा ( टी स्पून ) मोहरी , हिंग , चीमुटभर हळद , चार दाणे मेथीचे.
सर्व साहित्य तयार असेल तर सात ते आठ मिनीटांत आमटी तयार होते.
कृती
- पॅन मधे तेल गरम करत ठेवायचे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, मेथी, हिंग, हळद घालायची, नंतर आपण कापून ठेवलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या. चविनुसार मीठ घाला व थोडे पाणी घालून पॅन वर झाकण ठेवा. चांगली फोडींना वाफ येवू द्यायची. पण फोडी फार शिजवायच्या ही नाही.
- तोपर्यंत मिक्सर जार मधे नारळ, कांदा, धने, मिरची व दोन चमचे पाणी घालून मिश्रणाची पेस्ट करून घ्या. पेस्ट करताना लागेल तसे पाणी घालायचे.
- पॅन मधील फोडी मऊ झाल्यावर वरील मिक्सर मधील मिश्रण त्यात घालायचे. आता साखर ही घालायची. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठरवा.
- एक मस्त उकळी आणायची आमटीला. आमटी ढवळत रहा.
- आता वरून थोडी कोथिंबीर भूरभूरायची. आणि गरम भाताबरोबर लगेच जेवायला घ्यायचे. काही दुसरे तोंडीलावणे लागत नाही.
मस्त चविष्ट कैरीची आमटी जरूर करून बघा.
आम्रओदन, कैरी ची तिखटी, गुळांबा आणि आता कैरीची आमटी. एकसे एक हटके रेसिपी. न चाखताच तृप्त व्हायला होते. सुंदर! 👍
LikeLiked by 1 person
ज्याची बायको सुग्रण त्याच्यासारखा नशीबवान कुणीच नाही. कैरीचा मुरांबा फक्त ऐकला होता. एक साधी सरळ कैरी इतक्या प्रकारची व्यंजनं देऊ शकते हे वाचून आश्चर्य वाटले. आता सौच्या इच्छेवर अवलंबून आहे, ही पक्वान्न चाखायला मिळतात की नाही. अनिल आणि शुभांगी तुम्हा उभयतांचे आभार
LikeLiked by 1 person
Explained with clarity . Mouth watering, in fact.
LikeLiked by 1 person
खूप सुरेख निवेदन कृती ! नक्कीच करून बघणार ! कॅनडात अजूनही कैरी मिळतेय
LikeLike