गुळांबा

चैत्र पालवी पासून, कैरीच्या वळणाने, केशरी लाल पूर्ण फळाकडे होणारा आंब्याचा प्रवास हा पंचेंद्रियांना वैशाखवणवा सहन करण्याची ताकद देतो. आपल्या सर्वांचा उन्हाळा सुसह्य बनविण्यात या राज वृक्षाचा व राज फळाचा फारच मोठा वाटा असतो. गुळांबा हे या प्रवासातले एक आंबट गोड वळण. आज थोडेसे या वळणावर विसावुयात. लहानपणी मला स्वत:ला मोरांब्यापेक्षा गुळांबा जास्त आवडायचा. पण काळाच्या ओघात तो काहीसा मागे राहिला. पिकलेल्या हापूस आंब्याच्या केशरी फोडी चिरून साखरेच्या पाकात तजेलदार दिसणारा मोरांबा सगळ्यांच्या मनात जास्त घर करू लागला. गुळांब्याची ही पीछेहाट मला फार जाणवत होती.
खरेतर गुळांब्याची गोष्टच वेगळी, त्याला फार काही साहित्यही लागत नाही. दोन जीनसात तयार होतो. याचा रंग काळपट तपकिरी आहे थोडा. त्यामुळे कदाचित मुलांना तो आवडत नसावा. पण म्हणतात ना काय भुललासी वरलिया रंगा ! गुळांबा पूर्णत्वाकडे गेला की गुळाच्या पाकाचा घमघमाट घरभर दरवळतो. हा वास आपल्याला अस्वस्थ करतो. झालेला गुळांबा पानात कधी पडेल याची वाट बघायला लावतो.
काहीसा विस्मरणात गेलेला हा गुळांबा तुम्हा सगळ्यांना करायला मी भाग पडणार आहे. चला तर लागू या कामाला. आपल्यापैकी बऱ्याच जणींना पाक करण्याची भीती वाटते. ते जमेल का नाही अशी शंका उगाचच मनात येते. त्यामुळे हा गुळांबा दोन प्रकारात दाखवत आहे. पाकासकट व पाकाशिवायही !

पहिला प्रकार साधा ,बिनपाकाचा.

साहित्य

  • एका मोठ्या कैरीचा कीस (साल काढून किस करायचा) साधारण एक मोठी वाटी भरून. कैरी शक्यतोवर थोडी गोडसर घ्यावी म्हणजे गूळ कमी लागतो.
  • एक वाटी कैरी कीसाला दोन वाट्या भरून गूळ बारीक करून घेणे. जर कैरी गोडसर नसेल तर अडीच वाटी गूळ घ्या.
  • तीन ते चार लवंगा ठेचून घ्या, फार बारीक पूड नको.
  • किंचीत मीठ, वेलची पूड

कृती

  1. पहिल्यांदा कैरीचा कीस वाफवून घ्यायचा. कैरी किस शिजवताना एक शिटी कुकर मधे बास होतात. फार शिजवू नका. बीन शिटी देवून कीस तीन ते चार मिनिटे कुकरमधे शिजवा (कुकरची शीट्टी काढून ठेवायची).
  2. मोठ्या पातेल्यात बारीक चिरलेला गूळ घाला. गूळ बुडेल इतकेच पाणी घालायचे. आता गूळ विरघळे पर्यंत व त्याला थोडा कड येईपर्यत ढवळत रहा. नंतर आपण शिजवलेला कैरीचा कीस त्यात घालायचा.
  3. आता दोन्ही गोष्टी चांगल्या उकळू द्यायच्या. साधारण पाच ते सात मिनिटे लागतील. मिश्रण ढवळत रहा कारण गूळ पातेलीस खाली चिकटायचा धोका असतो.
  4. सात मिनीटाने गुळांबा आपल्याला आळलेला दिसेल. आता त्यात मीठ व लवंग पूड घाला. गुळांबा बरणीत ओतताना सहज खाली पडला पाहिजे.
  5. फार घट्ट गुळांबा करायचा नाही कारण तो गार झाल्यावर आटतोच.

हा गुळांबा करायला सोपा आहे ना .👍👍

आता आपण गोळीबंद पाकाचा गुळांबा कसा करायचा ते पाहूयात.

साहित्य वरच्या कृती प्रमाणे.

कृती

  1. पहिल्यांदा कैरीचा कीस वाफवून घ्यायचा. कैरी कीस शिजवताना कुकरला एक शिटी बास होते.फार शिजवू नका.
  2. पातेल्यात चिरलेला गूळ घालून त्यात गूळ बुडेल एवढेच पाणी घालायचे.
  3. आता गूळ विरघळून त्याला चांगली उकळी आणायची. गूळाचा पाक घट्ट होवू लागला की बशीत पाणी घ्या व पाकाचा एक ठिपका बशीत घाला. बशीत पाक न विरघळता त्याची गोळी होते . ती गोळी कोरड्या ताटलीवर टाकून पाहिली की ट्ण असा आवाज होतो . म्हणजेच गोळीबंद पाक तयार आहे आता यात कैरीचा कीस घालायचा.
  4. कीस घातल्यावर हे मिश्रण परत पातळ होते. मग परत याला एक उकळी आणायची.
  5. आता गॅस बंद करा. त्यात लवंग पूड व मिठ घाला.

चला तर गोळीबंद पाकाचा गुळांबा करून बघताय ना 👍

टीप्स

  1. तुम्हाला वेलची पूड घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. पण गुळांबा पूर्ण तयार झाल्यावर पूड घालायची.
  2. काही वेळा गुळांबा खूपच घट्ट होतो. पानाशी जेवढा गुळांबा हवा असेल तेवढा गूळांबा कुंड्यात काढून घ्या. दोन चमचे पाणी चांगले गरम करून त्या गुळांब्यात घालायचे व चमच्याने चांगले हलवून घ्यायचे. अश्याने गुळांबा पातळ होतो.
  3. काहिंना गुळांबा तिखट,गोड,आंबट आवडतो. जर तसा करायचा असेल तर कैरीचा किस तुपावर जिरे व सुखी लालमिरची घालून परतून शिजवून घ्यायचा व तो पाकात घालायचा.

1 Comments Add yours

  1. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

    jyanna vishesh bhaji nasali tari chalate
    tyanchyasathi gulanba he pakwannach 👌

    Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.