करंजी….गौरीसाठी

on

खमंगच्या माझ्या blog च्या पहिल्या लेखांकाला आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार.

आमच्या ही गौरी चे आगमन झाले. तुळशी पासून ७ खडे आणायचे नाहीतर नदीवरून ( पाण्याच्या आसपास असेल तिथून ).पुर्वी आम्ही विठ्ठल मंदिरा जवळ रहात होतो तेव्हां चंद्रभागा जवळ होती , त्यामुळे ते जमत असे.

माझी जाऊ माधुरी म्हणजे हौसेचा पाऊस . ती पंढरपूरचीच. त्यामुळे तिला प्रत्येक व्यक्ती व त्याची सर्व कुंडली माहित असे .त्यामुळे तिला या गौरी नदीवरून आणण्यात काहीच संकोच वाटत नसे .मला मात्र हे करताना अवघडल्या सारखे वाटे. मग मी खूप कारणे सांगे ,अग नदीला पाणी नाही “ नसेना का आपण कलश घरातून भरून घेउ”.नदीला पाणी भरपूर आहे खडे मिळणार नाहीत “ त्यात काय …..मी वाळूतून आधीच आणुन ठेवते. आज पावसाची लक्षणे वाटतात ग. “ जाऊ गाडीतून थोडे भिजू” .माझ्या सर्व सबबींची सकारात्मक उत्तरं तिच्या कडे असत.

त्यात माझ्या सासूबाईंचा दंडक … सर्व दागिने घालून व शक्यतोवर नऊवारी नेसून गौर आणायची. आमच्या बरोबर घरातील एक मदतनीस असे ,माझी भाची, तिला घाटी घेऊन बरोबर यायला फार आवडत असे. रस्ताभर वाजवत यायची.

पायात चप्पल न घालता रस्त्यावरून नदीपर्यंत जायचे ,अहाहा कडक उन्ह, पायाला मधेच दगड टोचायचा, साडीतून पाय नाहीना दिसत अशी अनेक विघ्ने पारपाडत आमची वरात निघायची .प्रथम मला खूप संकोच वाटायचा. या गोष्टींची सवय नव्हती.

असो येताना मुक्याने यायचे …. नेमकं कोणीतरी हटकणार अग गौरी कुठेत तुमच्या,दिसतच नाहित.मग त्यातील कोणीतरी सांगे अरे हे कोकणस्थ एवढ्याश्या द्रोणात असतील गौरी ,😀😀😀😀अश्या गौरी साग्र संगीत घरी यायच्या .पुढचे आव्हान अजून अवघड .आमचा गावातला वाडा हा सुमारे शंभर वर्ष जूना.पण त्याला एक वेगळा इतिहास आणि परंपरा आहे .माझे आजे सासरे हे एक गांधी वादी स्वातंत्र्य सैनिक व आमदार होते. आमच्या तीन मजली घरचा दुसरा मजला हा त्यांचा दरबार .त्याला यायला जायला दगडी खडा जीना आहे.तो चढून जाताना त्रेधातिरपीट उडे.मग एकदा गौर वर नेताना पायात ओचा अडकला 😯पुढचे सांगायलाच नको.😀

मग नैवेद्याची गडबड सुरू .करंज्यांचा नैवेद्य गौरीला दाखवायचा असतो .मग त्या आदल्याच दिवशी करून ठेवायच्या.

चला तर मग करंज्या करूयात.

ओल्या नारळाच्या करंज्या

साहित्य

  •  १ नारळ
  • २ वाट्या बारीक रवा
  • १ वाटी साखर
  • २ चमचे गुलकंद
  • तूप अंदाजे ३ वाट्या

कृती

  1. नारळ प्रथम खोवुन घ्या . नारळाच्या चवाच्या निम्मी साखर घालायची व सारण चांगले परतून घ्या . गार झाल की दोन चमचे गुलकंद घालायचा ….स्वाद छान येतो .वेगळी वेलची पूड घालावी लागत नाही.( गुलकंदात साखर भरपूर असते म्हणून साखर कमी घेतली.)
  2. २ वाटी बारीक रवा घ्या त्याला तूपाचे मोहन घाला व मुटका वळता येईल इतपत घट्ट भिजवा,व ३ तास दडपून ठेवा . आता रवा मस्त फुलून आलेला असेल,मग निरसं दूध घालून छान भिजवा. मऊ भिजवा म्हणजे पोळी लाटता येईल. भिजवलेला रवा चांगला बत्याने कूटून घ्या .
  3. साटा = २ चमचे काॅर्नफ्लावर, २ चमचा तूप, १ चमचा तांदूळाची पीठी, हे सर्व फेटून ठेवा.
  4. आता २ पोळ्या लाटून घ्या,पहिल्या पोळीवर साटा लावून घ्या,त्यावर दुसरी पोळी ठेवा त्याला साटा लावून घ्या ,मग वळकटी वळून घ्या . मग त्याचे छोटे छोटे भाग करून ठेवा ( म्हणजे पुरी लाटता येईल एवढी लाटी करायची .)
  5. आता एकाच बाजूने पुरी लाटा ( उलटू पालटून करू नका ) .पूरी हातावर घेवून सारण भरा म्हणजे करंजी फुगीर होते.कडा चिमटीत पकडून चांगली मिटवून घ्या.मग कातरण्याने कापून ठेवा. आता मंद आचेवर करंजी तळून ध्या ,सुरेख करंज्या तयार.

IMG_2952.JPG

10 Comments Add yours

  1. मंदार केसकर's avatar मंदार केसकर म्हणतो आहे:

    वा…खूपच छान शब्दांकन !

    Like

  2. Sujata Yadgiri's avatar Sujata Yadgiri म्हणतो आहे:

    Too good

    Like

  3. snehaseeks's avatar snehaseeks म्हणतो आहे:

    What a delicious karanjee it would make…😋👌

    Like

  4. भक्ती नातू's avatar भक्ती नातू म्हणतो आहे:

    वा सुंदर

    Like

  5. भक्ती नातू's avatar भक्ती नातू म्हणतो आहे:

    वा सुंदर

    l

    Like

  6. manasee's avatar manasee1 म्हणतो आहे:

    मनोवेधक वर्णन आणि अर्थातच चविष्ट रेसिपी!

    Like

  7. Sumedha Sanjay Deshpande's avatar Sumedha Sanjay Deshpande म्हणतो आहे:

    व्वा !! करंज्या सुबक सुंदर व लिहिलयंसही खुसखुशीत … मस्तंच
    Waiting for next post Shubhangi

    Like

  8. BHAKTI NITIN RATNAPARKHI's avatar BHAKTI NITIN RATNAPARKHI म्हणतो आहे:

    really delicious recipe

    Like

  9. Janhavi Namjoshi's avatar Janhavi Namjoshi म्हणतो आहे:

    Karanjya ekdam sundar zalya. Karun baghitalya . Asech khaas padartha Navin rupat amhala satat milavet hi prathana.

    Ukadicha Modak suddha khup Chan zale……..

    Like

  10. Sneha Warkhedkar's avatar Sneha Warkhedkar म्हणतो आहे:

    Looks yum…

    Like

Leave a reply to Sneha Warkhedkar उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.