वैभवशाली नवरात्र: अश्विन पौर्णिमा

on

 मंडळी नमस्कार, 

 आज या आपल्या मालिकेची सांगता करीत असताना मी खूप समाधानी आहे.  दहा दिवस कसे गेले ते समजलेच नाही. श्री रुक्मिणी पांडुरंगाचे अनुपम सौंदर्य व वैभव शब्दबद्ध करणे सोपे नव्हते. रुक्मिणी मातेनेच ते माझ्याकडून करून घेतले अशी माझी श्रद्धा आहे.  या निमित्ताने पंढरपुरातल्या एका वेगळ्या व समृद्ध परंपरेचा परिचय आपणा सर्वांना करून देता आला.  सर्वच रूढी व परंपरा त्याज्य  नसतात.त्यामागे ही काही निश्चित विचार व कलाविष्कार असतात.  ही मालिका सादर करण्यासाठी मला अनेक लोकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले.  चिंतामणी उत्पात ,आशुतोष बडवे, विवेक बडवे,  सुनंदाताई कुलकर्णी, मूर्तिकार मंडवाले बंधू ही त्यातली काही ठळक नावे.  शिवाय माझ्या घरातील माझ्या नेहमीच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील मनापासून मदत केल्याने हे शक्य झाले.  आपण सर्वांनी देखील याला भरभरून प्रतिसाद दिलात. 

रुक्मिणी मातेमुळे हा विश्वदेव, द्वारकेचा राणा पंढरपुरात आला व भक्तांच्या अलोट प्रेमामुळे येथेच स्थिरावला.  आम्हा पंढरपूरकरांचे सारे आयुष्य याच्याभोवतीच फिरते.  त्याच्याच कृपाशीर्वादावर आम्हा सर्वांची उपजीविका चालते. 

पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥

वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥

पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥

आज श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नवरात्राची सांगता होते.  यासाठी काही विशिष्ट वेशभूषेचे संकेत असे नाहीत.  आज रुक्मिणी मातेचे नवरात्र उठल्यामुळे नेहमीप्रमाणे महानैवेद्य होताच.  तरीसुद्धा तिच्यासाठी आज चार वेगळ्या गोष्टी केल्या गेल्या.  त्या म्हणजे गव्हाची खीर, रवा बेसन लाडू, शिरा आणि पाटवड्या.  माझी भाबडी समजूत अशी आहे की नवरात्रात रोज नवीन पोशाख रोज नवीन दागिने आणि भक्त आणि त्यांच्या भक्तीचा  महापूर यामुळे ती थकली नसेल ना? हा शिणवटा लवकर दूर व्हावा म्हणून या पदार्थांचे प्रयोजन असावे का?  आज नित्याच्या  आरतीनंतर तिला पुरणाची आरती करण्यात आली. मग शुभांगीची पण धांदल उडाली.  तिलाही वाटू लागले हे चार प्रकार आपण करावेत.  रुक्मिणी मातेने या लेकराचे हट्ट पुरवले व मी हे चार पदार्थ केले. आज तिचे डोळे भरून दर्शन घेऊन आले.  तिच्या रूपाचे वर्णन करताना माझ्याकडून काही प्रमाद  घडले असतील तर त्याची  क्षमा मागितली. 

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. तिचा आशीर्वाद कायम पाठीशी आहेच. ती स्वतः खूप पाककला निपुण आहे असे मानतात.  तिच्या या कौशल्याचा अल्पसा अंश माझ्यात उतरावा अशी तिच्या चरणी विनम्र प्रार्थना करते. 

सौ शुभांगी जोशी 

Khamang.blog

Khamangbyshubhangi youtube channel

2 Comments Add yours

  1. विनया परिचारक's avatar विनया परिचारक म्हणतो आहे:

    वाह. रोज वैभव संपन्न रुक्मिणी चे दर्शन आणि तुझे सुंदर वर्णन. खरंच छान

    Liked by 1 person

  2. शिवतनय's avatar शिवतनय म्हणतो आहे:

    खूप छान !

    Liked by 1 person

Leave a reply to विनया परिचारक उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.