मंडळी नमस्कार,
आज अश्विनी शुद्ध दशमी. आज पारंपरिक नवरात्र संपला असलं तरी श्री रुक्मिणी पांडुरंगाचे नवरात्र हे पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. आज श्री रुक्मिणी देवीला प्रतिपदेचाच सर्व साज घातला आहे . त्यामुळे त्याचे सविस्तर वर्णन न करता त्याऐवजी पंढरपूर परिसरातील महत्त्वाची परिवार देवता पद्मावती याविषयी अधिक माहिती पाहूया.आजपासून पांडुरंगाला नेहमीचाच वेष असणार. रुख्मिणी मात्र दागदागिन्यांनी नटलेली असेल. त्याचा आनंद आपण घेणारच आहोत .
प्रत्येक तीर्थक्षेत्राला चारी दिशांना दारे असतात. या दारांमधूनच तीर्थक्षेत्री प्रवेश करावा असा संकेत. पंढरपूरच्या पूर्वेला असलेल्या दाराच्या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत या देवळाभोवती एक तळे होते. जलाशयापर्यंत पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या ज्या आजही आपण पाहू शकतो. या देवळात जाण्यासाठी एका दगडी पुलावरून जावे लागते. अर्थातच खाली तळे असल्यामुळे हा पूल बांधावा लागला हे उघड आहे. मंदिरामध्ये पद्मावती देवीचा तांदळा आहे. सकवार बाई पवार यांनी या मंदिरासाठी बरेच काही काम केले असल्याचा उल्लेख असणारा एक शिलालेख मंदिराच्या मंडपात मध्यभागी आहे.
श्री पद्मावती देवी
देवळाच्या प्राकारात भक्तांनी रचलेला ‘संसार ‘
तळ्यात नेणाऱ्या पायऱ्या
मंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या परड्या
काल आपण बंगालमध्ये केला जाणारा पदार्थ पाहिला आज आपण थोडे तमिळनाडूकडे वळूयात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत तेथे ‘सुंदल’ नावाचा पदार्थ केला जातो . सुंदल म्हणजे कडधान्याची उसळ. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाणारी ही उसळ आहे.चणे, वाटाणे, शेंगदाणे, मुग, चवळी ,राजमा यापैकी कोणत्याही कडधान्याचा यासाठी आपण वापर करू शकतो. आज आपण शेंगदाण्याचे सुंदल करणार आहोत.
साहित्य:
१ एक वाटी शेंगदाणा, रात्री भिजत घालायचे.
२ खोवलेले खोबरे दोन चमचे
३ थोडीशी कोथिंबीर
४ चवीनुसार मीठ व तिखट( हिरवी किंवा लाल मिरची)
५ फोडणीसाठी तेल, हिंग, कढीपत्ता
६ सुंदल पावडर.
सुंदल पावडरची कृती: पाव वाटी धने, दीड टेबलस्पून चणाडाळ, सहा ते सात सुकी लाल मिरची. हे सर्व साहित्य कढईत कोरडे परतून घ्या. डाळीचा रंग तपकिरी झाला की गॅस बंद करा. मिश्रण थंड करा आणि कोरडे वाटून बरणीत ठेवून द्या.
कृती:
१ रात्री भिजविलेले शेंगदाणे चांगले टपोरे झालेले दिसतील. ते उपसून चाळणीवर घाला.
२ कुकरमध्ये मीठ घालून शेंगदाणे शिजवून घ्या. हे शेंगदाणे खूप शिजवायचे नाहीत. मीठ घालून कडधान्य शिजवल्यामुळे कडधान्याला मिठाची चव लागते.दाणे शिजवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
३ कढईत तेल घ्या. तेल तापल्यावर हिंग ,लाल मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. फोडणीत दाणे घाला आणि दोन चमचे सुंदल पावडर घाला. चवीनुसार मीठ घाला. आता एक वाफ आणा.
४ तयार उसळीत वरून ओला नारळ आणि कोथिंबीर घाला. आपले प्रथिनयुक्त सुंदर असे सुंदल तयार झाले आहे. माझी मैत्रीण साधना तिप्पनखाजे हिने मला ही कृती सांगितली आहे.
जरूर करून बघा.
सौ शुभांगी जोशी
Khamang.blog
Khamangbyshubhangi you tube channel
तोंडाला पाणी सुटले
LikeLiked by 1 person