मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
मंडळी नमस्कार,
आज मातेने दुर्गा मातेचे रूप धारण केले आहे. आज तिथीने सकाळचा थोडा वेळ अष्टमी व दुपारनंतर नवमी आहे. आज तिला लाल काठ असलेली पांढरी स्वच्छ पैठणी नेसवण्यात आली आहे. आजच्या मुकुटाचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण मुगुट जडावाचा आहे. हिऱ्याचे तुकडे उरतात त्याला परब असे म्हणतात. त्या परबांचा कौशल्यपूर्ण वापर करून आजचा मुकुट बनलेला आहे.त्यावर छानसा मोत्याचा तुरा आहे आणि लोलक हिऱ्याचेच आहेत. आज तिला तोरणासारखी नवरत्न फेटा बिंदी व खड्याची बिंदी मुकुटावर बसवली आहे.कानात आंब्याच्या कैरीच्या आकाराच्या हिऱ्याची भिकबाळी आहे.त्याला खाली मोत्याचे लोलक लावले आहेत. कानात हिऱ्याचीच तानवड आहेत.कानात सोन्याचे हिरे जडित मत्स्य आहेत. पांढरी स्वच्छ चिंचपेटी आहे. जडावाचे पेंडंट असलेले मोत्याचे मंगळसूत्र आहे. पाचूची गरसोळी आहे. हिऱ्याचे पदक असलेला मोत्याचा कंठा आहे. त्यात पाचू व माणिक देखील जडवले आहेत ते. या कंठ्याचे मोती किती टपोरे आहेत ते जरूर पहा. असे तीन कंठे आज तिला घालण्यात आले आहेत.कमरेला जडावाचा मासपट्टा आहे.आजचा पोशाख हा खडा पोशाख असल्याने सोन्याचा तुळशीहार घालण्यात आला आहे. मोठ्या जडावाचा शाही हार आहे. हातात हातसर तोडे आणि हिऱ्याच्या पाटल्या आहेत. सोन्याचे दोन बाजूबंद दंडात आहेत. पायात सोन्याचे रूळ आणि पैंजण आहेत. आज दोन्ही बाजूंना चांदीचे छत्र चामर देखील आहे. देवीपुढे आज सोन्याचा करंडा ठेवलेला आहे. जो शाही हार आज रुक्मिणीच्या गळ्यात दिसत आहे तो शिंदे सरकारांनी भेट केलेला आहे. अशी माझी रुक्मिणी हिऱ्यामोत्याने , सोन्याने सुशोभित आहे.
आज पांडुरंगाचा काय थाट आहे तोही पाहूयात का ?
सोन्याचा आणि जडावाचा मुकुट, त्यावर दोन हिऱ्यांचे शिरपेच, मोत्याचा तुरा, त्यावर एक सुंदर हिऱ्याचे फुल. पांडुरंगाच्या नामावरती माणिकाची पट्टी आहे. गळ्यात टपोरा कौस्तुभमणी आहे. दोन पदके असलेल्या साखळ्या आहेत. त्याखाली दोन पदरी पुतळी हार आहे. त्यानंतर अजून एक मोठा पुतळी हार, तीन पदरी सोन्याचा तुळशीहार. आज लक्ष वेधून घेत आहे तो शाळीग्राम हार. त्याखाली अजून एक मोठा चार पदरी हार आहे तो नवीन आहे. हातात दोन्ही बाजूला बाजूबंद आहेत,तोडे आहेत.
आज आपण एक खास कोकणी पदार्थ नैवेद्यासाठी म्हणून पाहूयात.
दुधेळी
हा कोकणी पदार्थ आहे. आपल्या नजरेआड गेलेला म्हणूयात. आज नैवेद्यासाठी खास केला.
साहित्य
१= बारीक तांदूळ ( कोलम ) कोरडेच दळलेले दोन वाट्या.
२= नारळाचे दूध १/२ वाटी
३= गूळ १/२ वाटी
४= किंचीत मीठ , वेलची पूड
५=दोन चमचे ओला नारळ
कृती
१= दळून घेतलेली तांदळाची पिठी दोन वाट्या, ओले खोबरे, मीठ, बारीक केलेला गूळ, आणि नारळाचे दूध सर्व एकत्र करून पॅन मधे ठेवा. आणि मंद आचेवर मिश्रण सतत ढवळत रहा. मिश्रण पॅनला चिकटणार नाही याची दक्षता घ्यायची.
२= मिश्रण शिजल्यावर गोळा व्हायला लागेल. मग हे मिश्रण ताटलीत पसरवून घ्यायचे. मिश्रणावर वेलची पूड पसरवा. गार झाल्यावर वड्या पाडायच्या.
या वड्यांची पोत खुटखुटीत नसते, खांडवी सारख्या मऊ असतात. खाताना नारळाचा चव आणि नारळाच्या दूधाचा स्वाद अफलातून लागतो.
जरूर करून पहा वेगळा पदार्थ आहे .
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi you tube Channel