वैभवशाली नवरात्र :  माळ तिसरी

on

मंडळी, 

 आजच्या या भागात आपण  रुक्मिणी  मातेचे तिसरे रूप पाहणार आहोत.  हे रूप आहे कमलादेवीचे किंवा कमलजेचे.  पोशाखाचे नाव कमलजा म्हणजे कमळपुष्पात विराजमान झालेली देवी.  या कमलासनात ती मांडी घालून बसली आहे.  थोडक्यात या अवताराला गायत्री अवतार असेही म्हणता येईल. प्रत्यक्षात रुक्मिणी मातेची मूर्ती ही उभी आहे.  ही मूर्ती बसली असल्यासारखी दाखवणे आणि वस्त्रांचा वापर करून कमल फूल तयार करणे या दोन्ही गोष्टीला खूप कौशल्य लागते.  मूर्तीच्या दोन्ही बाजूला उशा  लावून माता जणू  मांडी घालून बसली आहे असा आभास  निर्माण केला जातो.  त्यात ती नऊवारी साडी नेसवणे,  दोन्ही पायांच्या मध्ये सुरेख एकावर एक येणाऱ्या सुबक निऱ्या   साडीचे आणि देवीचे वैभव द्विगुणीत करतात. कमळ पाकळ्या सुद्धा जरीच्या साडीच्याच केल्या जातात.  पाठीमागे सुंदर रेशमी साडी पडदा म्हणून घालतात.  देवीचे हे ध्यानस्थ रूप बघून आपल्या मनास  शांती मिळते.

आता आपण या रूपासोबत घातल्या जाणाऱ्या दागिन्यांचा तपशील पाहुयात.

सर्वप्रथम सोन्याचा मुगुट,  हा मुकुट प्राचीन व पारंपारिक आहे.  या मुगुटावरती तीन दागिने बांधले गेले आहेत.  त्यापैकी एक सूर्य आहे, पैंजणजोड आणि पट्टीची बिंदी हे इतर दोन दागिने.सोन्याची मोठी कर्णफुले, दोन मत्स्य व सोन्या मोत्याचे दोन तानवळ घातलेले आहेत.नाकात मोत्याची नथ आहे.   मत्स्यांच्या खाली दंडात कानडी पद्धतीचे दोन बाजूबंद आहेत.  गळ्यात हिरवी चिंचपेटी आहे दशावतारी मंगळसूत्र आहे.  हा फार वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिना आहे.  मोत्याची कंठी आहे.माणकाचे पदक असलेला कंठा  मद्रासी पद्धतीचा आहे व तो सगळ्यात खालती दिसतो आहे.  त्यानंतर नवरत्नांचा हार आहे.सोन्याचा कंबरपट्टा आहे. पायात सोन्याचे रूळ आहेत.काही वेळा या पोशाखामध्ये पानवड्याचा कंठा  देखील घालतात.तो काहीसा याप्रमाणे दिसतो,

या कंठामागची संकल्पना अशी आहे.  तळ्यातल्या उमललेल्या कमळावर विराजमान रुक्मिणी,  तळ्यातल्या हिरव्या शेवाळ्याचे प्रतिबिंब तिच्या दागिन्यांवर दिसते आहे. हा अत्यंत  कल्पक असा दागिना तृतीयेला घातला जातो.

नैवेद्याच्या ताटातील मसाले भात आज पाहूया. 

मसालेभात

साहित्य 

१= दोन वाटी तांदूळ 

२= मटार एक वाटी , पाव वाटी फ्लॅावर , पाव वाटी गाजर ( भोपळी मिरची असल्यास घालू शकता )

३= दोन मिरच्या , एक इंच आलं तुकडा ,पाव वाटी कोथिंबीर ,पाव वाटी खोबरे , पाव चमचा जीरे 

४=दोन चमचे सुके खोबरे ,१चमचा जीरे , १चमचे धने , दोन सुक्या मिरच्या सर्व भाजून मिक्सरवर वाटून घ्यायचे.

५=पाव चमचा गूळ 

६=दोन चमचे गोडा मसाला 

७=दोन चमचे धने,जिरे पूड

८=चविप्रमाणे मीठ

९=फोडणीचे साहित्य

१०=दहा कढिलिंबाची पाने 

११=१/२ वाटी खोबरे , पाव वाटी कोथिंबीर 

१२=१/२ वाटी सायीचेदही

१३=चार चमचे तेल 

कृती

१= तांदूळ धुवून ठेवावेत एक तास आधी 

२= मटार , फरसबी , गाजर , फ्लॅावर , तुकडे धुवून निथळत ठेवा .

३= पातेलीत प्रथम तेल घालायचे ते तापल्यावर त्यात कढिलिंब घालून फोडणी करून घ्यायची मग याच फोडणीत सर्व भाज्या परतून घ्यायच्या .धुतलेले तांदूळ भाज्यांवर घालून मंद आचेवर चार ते पाच मिनीटे परतून घ्यायचे .

४= तांदूळाच्या दुप्पट पाणी आधीच उकळवून ठेवायचे . गरम पाणी तांदूळावर ओतायचे आता क्रमाने प्रथम ओला मसाला घालायचा ( मिरची ,आल , जिर , खोबर ) नंतर गोडा मसाला , धनेजिरे पूड,कोरडा मसाला ( सुखे खोबरे , मिरची ,धने ,जिरे )चविनुसार मीठ , गूळ , दही घालून सर्व जिन्नस अलगद हलवून शिजत ठेवावे . भातातील पाणी कमी झाल्यावर आता पातेल्यावर झाकण ठेवावे . पुढची सर्व क्रिया मंद  आचेवरच करायची .

४= भात शिजल्यावर आता त्यावर ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरावे . 

मस्त मसाले भात तयार 👍

सौ शुभांगी जोशी 

Khamang,blog

सर्व माहिती  श्री चिंतामणी उत्पात यांच्या विशेष सहकार्याने.  

One Comment Add yours

  1. अश्विनी दातार's avatar अश्विनी दातार म्हणतो आहे:

    तानवळ , दशावतारी मंगळसूत्र हा कुठला दागिना आहे हे वेगळे -वेगळे दाखवू शकलात तर मदत होईल.धन्यवाद.

    Like

Leave a reply to अश्विनी दातार उत्तर रद्द करा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.