वैभव संपन्न नवरात्र : १

on

लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः ।
नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता॥२६॥
विविध रत्नांनी मढविलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभांमधून जिला स्नान घातले आहे, अशी ती हातात कमळ घेतलेली, सर्व शुभ उपाधींनी युक्त लक्ष्मी नेहेमी माझ्या सदनात राहो.: श्री सूक्त

पंढरपूर तीर्थक्षेत्राची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पंढरपूर क्षेत्राची अधिष्ठात्री देवता श्री विठ्ठल असे जरी समजले जात असले तरी हा द्वारकेचा राणा पंढरपुरात येण्याला कारणीभूत माता रुक्मिणीच आहे. या तीर्थक्षेत्रात परंपरागत रूढी व परंपरा नुसार वर्षभरातील सर्व सणवार साजरे होता.तसे पाहायला गेले तर पांडुरंगा साठी गोकुळाष्टमी व रुक्मिणी मातेसाठी नवरात्र हे दोन महत्त्वाचे व मोठे उत्सव समजले जातात . या काळात देवळाला मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. अभिषेक, भजन, कीर्तन, विविध संगीत कार्यक्रम महाप्रसाद यांची रेलचेल असते.रुक्मिणीच्या रूपाचे अजून एक वैशिष्ट्य आहे. इतर देवी रूपे आपापले वाहन व शस्त्र संभार घेऊन येतात. आमच्या रुक्मिणी मातेसमोर कोणतेही वाहन नाही व तिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही ती फक्त आणि फक्त आशीर्वादच देते. रुख्मिणी मातेच्या नवरात्राचे एक वैशिष्ट्य आहे . हा नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा नसून तो पौर्णिमेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस साजरा होतो व काल्याने त्याची सांगता होते.या पंधरा दिवसात त्या कालावधीत श्री विठ्ठल व रुक्मिणी यांना वैशिष्ट्यपूर्ण पोशाख व त्याला सुसंगत असे दागदागिने घातले जातात. हे सर्व दागदागिने ऐतिहासिक परंपरा असलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, माधवराव पेशवे, शिंदे- होळकर व इतर अनेक मान्यवरांनी हौसेने हे दागिने देवाला दिलेले आहेत.यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे काही दागिने आहेत.रुक्मिणी मातेच्या अलंकाराच्या सतराव्या शतकांपासून च्या नोंदी सापडतात. यामध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी दिलेली साठ सुवर्ण मोहरांची माळ, शिंदे सरकारांनी दिलेले लहान-मोठे मोत्याचे कंठे, हिरेजडित पाचूची गरसोळी ,हिरेजडित तानवड जोड, कमाल खाणी म्हणजे पाच पदरी शिंदेहार , सोन्याचे चुडे ,मणीमोत्यांच्या पाटल्या , हिरेजडित सूर्य ,२३ माणके जडवलेला चंद्रहार हे विशेष दागिने आहेत. अहिल्याबाईंनी मातेला सोन्याची घुंगरे असलेले पैंजण, बाजूबंद मोत्याचा कंठा पानाड्यांचा बिंदी बिजवरा,हिरेजडित पाटल्या जोड हे काही वैशिष्ट्यपूर्ण दागिने आहेत. हैदराबादच्या राजे समबक्ष यांनी १८ व्या शतकात जडावाची गरसोळी अर्पण केलेली आहे. त्याशिवाय भक्तांनी दिलेल्या अलंकारांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अलंकार आहेत. सोन्याची तुळशीमाळ, सोन्याचा सातपदरी अष्टपैलू मण्यांचा कंठा,जवेची माळ म्हणजे सोन्याचा आकाराचे जवस बनवून केलेली माळ,६४ पुतळ्यांची माळ, मकराकार मत्स्यजोड , दशावतारी मंगळसूत्र, पदकासह तारा मंडळ, सोन्याचे विविध मुगुट, हिरे व तांबडे माणिक वापरून केलेल्या चिंचपेट्या आणि महत्त्वाचे म्हणजे श्रीमंत वायजाबाई सरकार शिंदे यांनी मातेला अर्पण केलेले सोन्याचे पातळ. हे दागिने या काळात पाहायला मिळतात हेही या उत्सवाचे एक वैशिष्ट्य आहे.या उत्सवात पांडुरंगाचा किंवा रुक्मिणीचा घट बसत नाही. मंदिर संकुलात आवारात असलेल्या अंबाबाईच्या देवळात रुक्मिणीचा घट बसविला जातो. या पंधरा दिवसाच्या काळात रुक्मिणी स्वयंवर सांगितले जाते.
प्रतिपदेला काकडा आरती, पंचसूक्त पवमान अभिषेक होऊन रुक्मिणी मातेला केशरी दुधाचा नैवेद्य दाखवून उत्सवाची सुरुवात होते. या पंधरा दिवसात देवीला दररोज अभ्यंग स्नान घातले जाते. एरवी मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशीच ते होते. पंचसूक्त पवमानाच्या अभिषेकानंतर देवीला डाळीची खिचडी, पंचामृत,शेंगदाण्याची चटणी, तुपाची वाटी, बेसन लाडू असा नैवेद्य दाखवला जातो. सकाळी अकराच्या सुमाराला महानैवेद्य जातो यात पंचपक्वान्ने असतात; साखरभात, श्रीखंड, पुरणपोळी, बेसनाचा लाडू व शेवयांची खीर.दहा पुऱ्या, पाच पुरणपोळ्या, वरण-भात, कढी व कटाची आमटी, चुका, पातळ भाजी, भजी, अळूवडी, मसालेभात, बटाटा भाजी, चटणी ,मेतकूट, कोशिंबीर, दहा साध्या पोळ्या आणि पुरणाची छोटी मुद असा महाप्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो. दररोज सायंकाळी चार वाजता मातेचा पोशाख होतो.

वरील पोषाख प्रतिपदेचा आहे . पहिल्या दिवशी सर्व दागिने घातले जातात त्याला पंधरा दागिन्यांचा डबा असेच नाव पडले आहे .
क्रमवार दागिन्यांची नावे सांगते .सर्व प्रथम सोन्याचा मुगुट , कानावर सोन्याचे तानवड ,तांबडी चिंचपेटी ,दोन्ही दंडामधे वाक्या ,सोन्याचे मंगळसूत्र ,सोन्याची मोठी सरी ,जवच्या माळा ,पुतळ्याची माळ ,मोहरांची माळ , मधोमध गोल आकाराचे मोठे पदक आहे त्याला अलवा दागिना म्हणतात कारण पंढरपुरातील डॅा अलवा यांनी तो दिलेला आहे .सोन्याचा कंबरपट्टा ,पाकळी माळ ,हातामधे तोडे .सगळ्यात शेवटी जी माळ आहे ती फार वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण माळ आहे यात मधोमध वरवंट्याचा आकाराचे पदक आहे व कडेने ३२ पेट्या आहेत . या माळेस हायकोल माळ म्हणतात .

प्रतिपदेला जरीकाठी खडी साडीपोशाख म्हणजेच नऊवार लुगडे नेसवले जाते.या पोशाखात पायापुरत्या निऱ्या पसरवल्या जातात. पहिल्या दिवशी घालायच्या १५ दागिन्यांचा डबा ठरलेला आहे. यात सर्वप्रथम सोन्याचा मुगुट, दोन सोन्याचे तानवड कानावर, तांबडी चिंचपेटी, गळ्यात दोन्ही दंडांमध्ये वाक्या, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची मोठी सरी, जवच्या माळा, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ. अल्वा पदक (देवीचे एक भक्त डॉक्टर अल्वा यांनी एक वेगळे पदक करून दिले आहे. त्याला अल्वा पदक म्हणूनच ओळखले जाते.),सोन्याचा कंबरपट्टा, पाकळ्या कळीची माळ, हातामध्ये तोडे. या सर्वातील मुख्य व वैशिष्ट्यपूर्ण दागिना म्हणजे हायकोळ हा दागिना. पहिल्या दिवशी घालायचा मानाचा दागिना. हायकोल म्हणजे ३२ पेट्या व मध्यभागी वरवंट्याप्रमाणे आकार असलेले एक पदक असा हा सोन्याचा दागिना आहे. दिवाण राजे चंदुलाल दिवाण यांनी हा वैशिष्ट्यपूर्ण दागिना व त्यासोबत मातेला नवरत्न हार, जडावाचा हार, मास पट्टा, हिरे जडीत कर्णफुले. रात्री धुपारती असते. त्यावेळेला पुन्हा आरती नैवेद्य होते.यावेळी रुक्मिणी स्वयंवर व रुक्मिणी अष्टक म्हटले जाते व देवीच्या मस्तकावर तुळशीअर्चन होते. नैवेद्यासाठी दहिभात असतो.
रात्री अकरा वाजता शेजारती होते. यावेळी पोहे शिरा लिंबू सरबत बेसन लाडू व पाच गोविंद विडे दाखविले जातात. अशा तऱ्हेने प्रतिपदेची सांगता होते. या अलंकाराचे वर्णन ऐकल्यानंतर व हे अलंकार पाहिल्यानंतर तुम्हा आम्हाला आश्चर्य वाटते. पण जिच्या पुढे साक्षात कुबेर देखील हात जोडून उभा असतो तिच्या वैभवाचे कोण व कसे वर्णन करणार ?
पौर्णिमेपर्यंत देवी रूपाचे हे वेगवेगळे अविष्कार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

छायाचित्र व माहिती सौजन्य : श्री चिंतामणी उत्पात पंढरपूर. नवरात्राच्या काळात नेसवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या साड्या व त्यानुरूप वापरले जाणारे दागिने हे त्यांना तोंडपाठ आहेत.

श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या नैवेद्यात पुरणपोळीला वेगळे महत्त्व आहे.  त्यामुळे या निमित्ताने तुम्हाला पुरणपोळीची कृती सांगते आहे. 

पुरणपोळी ( गुळाची )
साहित्य
१= दोन वाट्या चण्याची डाळ
२= दोन वाट्या चिरलेला चांगला पिवळा गूळ
३=दोन वाटी कणीक आणि १/२ वाटी मैदा चाळून
४= जायफळ , वेलची पूड यातील कोणतेही एक चमचा
५= मीठ, हळद , तेल
६=साधारण पाव वाटी तेल
७= पोळी लाटायला तांदूळाची पिठी
कृती
१= डाळ आधीच धुवून ठेवायची म्हणजे चांगली फुलते . आता नेहमी पेक्षा जास्त पाणी घालून कुकर मधे मऊ शिजवून घ्यायची . डाळ शिजवताना त्यात हळद ( रंग छान येतो ) घाला, थोडे तेल पण घाला ( पावचमच्या पेक्षाही कमी ).
२= तोपर्यंत कणिक व मैदा परातीत चाळून घ्या .काहिही न घालता कणिक थोडी घट्ट भिजवून ठेवा . एक तासाने मीठ व तेल लावून परत कणिक मळून घ्यायची .साधारण कणिक बुडेल एवढे पाणी घालून कणिक पातेल्यात एक तासासाठी भिजत ठेवायची .
३=शिजलेल्या डाळीचे जास्तीचे पाणी ( चाळणीवर डाळ टाकून पातेल्यात राहिलेले पाणी )कटाच्या आमटीसाठी काढून ठेवा .
४ = डाळ गरम असतानाच त्यात गूळ व किंचीत मीठ घालून पुरण आळायला गॅसवर ठेवायचे . पुरण शिजत आले याची खूण म्हणजे पातेल्यात उलथने पुरणात सरळ उभे रहाते . आता पुरण गरम आहे तोपर्यंत पुरण यंत्रातून काढून घ्या . वाटलेल्या पुरणात जायफळ घालून एकत्र करून घ्यायचे .
५=भिजलेली कणीक परातीत काढून घ्या व पाणी टाकून द्या . कणीक चागंली तिंबायची म्हणजे परातीत आपटायची . त्यामुळे कणकेला चांगली तार येते .
६= कणकेच्या गोळ्याचा दुप्पट पुरण घेवून उंडा करायचा . पोलपाटावर तांदळाची पिठी पसरवून हलक्या हाताने पोळी लाटायची .ही पोळी तव्यावर सारखी उलटपालट करायची नाही . गुलबट रंगावर पोळी भाजायची ( तांबूस रंग ).
या प्रमाणात बरोबर दहा पोळ्या होतात . या पध्दतीने पोळ्या सुरेख रंगाच्या , परफेक्ट गोडीच्या आणि अलवार पुरणपोळ्या होतात .

सौ शुभांगी जोशी
khamang .blog
Khamangbyshubhangi you tube channel

३ ऑक्टोबर २०२४ .

One Comment Add yours

  1. Anjali's avatar Anjali म्हणतो आहे:

    लक्ष्मी नारायण दोघांच्या कौशल्याचा एकत्र संगम आमच्यासाठी नवरात्रीची पर्वणी खूप छान माहिती आणि पुरण पोळी नवख्या मुलीला सुद्धा सुगरण बनवेल असे वर्णन. छान समजावून दिले आहे. अतिशय सुंदर. मी सर्व पाहत असते आवडतात. अवडण्या सारख्याच असतात.

    Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.