मिसळ म्हटले की कोणतीतरी उसळ ,त्यात घरातला उरलेला चिवडा,शेव, फरसाण, बटाट्याची भाजी, शिजवलेले पोहे असे झणझणीत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ना ? मिसळी बरोबर वरून भुरभुरलेली कोथिंबीर, कांदा, काकडीचे काप टोमॅटो इत्यादी सजावट आलीच. मठ्ठा ,पाव हेही साथीदार अनिवार्य..
साऱ्या महाराष्ट्रात चालणारा मेनू म्हणजे मिसळ. प्रत्येक भागाची चव वेगवेगळी. पुणेरी ,कोल्हापुरी ,नासिक, नगर, सोलापूर या गावांची काही वैशिष्ट्ये त्या त्या ठिकाणच्या मिसळीत पाहायला मिळतात. अजून एक आठवण म्हणजे लहानपणी आमचा मामा आम्हाला आसूदच्या जोशांकडची मिसळ खायला घालायचा. ती चव अजून आठवते आहे. ही एवढी सगळी घराणी असताना अजून एक मातब्बर घराण्याचा अचानक शोध लागला. माझी भाची तन्वी ही कर्जतला असते. तिचे सासरे रवींद्र बागाईतकर हे स्वतः पट्टीचे खवय्ये आहेत. नुसते खवय्ये नसून स्वयंपाक घरात कल्पक प्रयोग करणारे बावर्चीदेखील आहेत. ती सांगत होती दर रविवारी सासऱ्यांना सुट्टी असते. त्यादिवशी त्यांच्या अधिपत्याखाली खास वेगळा मेनू बनतो. पण तिच्या सासूबाई तिला सांगायच्या, आपण स्वयंपाक घरात लुडबुड केलेली त्यांना आवडत नाही. त्यांच्या मापानुसार कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरणे हे फारच अवघड काम. त्यामुळे आपण त्यांच्या ताब्यात स्वयंपाकघर देऊन त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊयात. आणि मग बागाईतकर काका खांद्यावर टॉवेल टाकून त्यांना हव्या त्या प्रमाणात, हव्या त्या पद्धतीने ही मिसळ तयार करायचे.अशी तर्रीदार मिसळ खाल्ल्यावर रविवारची लज्जत द्विगुणित न झाली तर नवल . मी आज त्यांचे मिसळीचे प्रमाण वापरून मिसळ केली. न राहवून तुम्हालाही ती सांगावीशी वाटते आहे. कुठल्याही मसाल्यांचा भडीमार न करता साधी सोपी सरळ अशी ही कृती आहे. तर पाहूयात कर्जतच्या बागाईतकरांची मिसळ. प्रमाण आठ ते दहा माणसांसाठी पुरेल असे आहे.
साहित्य

- सहा कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरलेले
- पाऊण वाटी सुके खोबरे किसलेले
- चार ते पाच पाकळ्या लसूण
- दोन चमचे धने
- तीन ते चार लाल सुख्या मिरच्या
- पाव वाटी कढीपत्ता.
- चवीनुसार मीठ.
- तेल पाच ते सहा चमचे
- मटकी पाव किलो मटकी नसल्यास पांढरे वाटाणे हिरवे वाटाणे चवळी मटार यातील काहीही घेऊ शकता. किंवा कांदेपोहे, उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी देखील चालते.
- फरसाण, गाठी पापडी शेव चवीनुसार. या सर्वांचे मिश्रण करून घेणे श्रेयस्कर
- पाव वाटी कोथिंबीर
कृती
- प्रथम कढईत सुखे खोबरे भाजून घ्या. भाजून झाल्यावर ताटलीत काढून ठेवा.
- आता कढईत तीन ते चार मोठे चमचे तेल घ्या.
- तेल गरम झाले की लसूण, लाल मिरच्यांचे तुकडे, धने चांगले परतून घ्या.
- यानंतर कांदा घालून तो खरपूस भाजून घ्या. त्यानंतर किसलेले खोबरे घालून थोडा वेळ परता. गॅस बंद करा.
- मिश्रण थंड झाल्यानंतर लागेल तसे थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून हे वाटण गुळगुळीत वाटा.
आता तर्रीकडे वळूया.
- पातेल्यात तीन चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, हळद ,कढीपत्ता याची फोडणी करा.
- तुमच्या आवडीनुसार यात लाल तिखट घाला.
- योग्य वेळी तिखट जळू न देता यात छोटे भांडे भर गरम पाणी घालावे. **ही पाणी घालण्याची वेळ साधण्यावर मिसळीचा चटकदारपणा अवलंबून असतो हे लक्षात ठेवा.
- पाणी घातल्यावर लगेच वाटलेला मसाला घालावा व दोन मिनिटे हे मिश्रण उकळून घ्यावे.
- आता परत पुन्हा गरम पाणी घालावे. त्याचे प्रमाण माणशी पाव लिटर असे असावे.
- पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही जे कडधान्य शिजवून घेतले आहे ते त्यात घालावे.
- चवीनुसार मीठ घालून ही तर्री चांगली उकळू द्यावी. मिसळीचा रस्सा कट सॅम्पल इत्यादी इत्यादी तय्यार बरे का !
- बटाट्याची भाजी, पोहे ,फरसाण ,कांदा यावर रस्सा घालून चटकदार मिसळ वाढावी. वर कोथिंबीर भुरभुरा.
डिशमध्ये काकडीच्या फोडी कांदा लिंबू आणि सोबत मठ्ठ्याचा ग्लास आणि हो पाव देखील हवा बर का ..वेगळ्या घाटणीची वेगळ्या चवीची ही बागाईतकर मिसळ जरूर करून पहा.