
एक जामची बाटली घरात असली की पोळी, ब्रेड ,पराठा, धिरडं या सर्वांच्या बरोबर लावून एक वेळची न्याहरी होते. तसेच गडबडीच्या वेळात जाम आपल्याला खूप मदत करतो. लहान मुले, वयस्कर माणसे यांच्यासाठी हा एक पर्वणीच आहे. जून महिन्यात जशी आपण लोणची घालतो तसेच जाम देखील करायला हरकत नाही. या दिवसात बाजारात तोतापुरी आंबा खूप येतो. त्याच्याबरोबर केशरही उपलब्ध असतो. या दोन्ही जातीच्या आंब्यांना छान गोडी असते. यांची साल पातळ असते त्यामुळे जाम करायला हे दोन्ही प्रकारचे आंबे अत्यंत योग्य आहेत. अजून एक मुद्दा म्हणजे हे दोन्ही आंबे मूळचे गोड असल्याने साखर कमी लागते.
साहित्य:
१ तीन मोठे आंबे
२ आंब्याच्या फोडीच्या निम्मी साखर
३ लिंबाचा रस दीड ते दोन चमचे
कृती:
१ आंबे स्वच्छ धुऊन, कोरडे करून त्याची पातळ साल काढून घ्या.
२ बाठ बाजूला काढत या आंब्याच्या फोडी करून घ्या.
३ झालेल्या फोडींच्या निम्मी साखर घ्या.
४ आंब्याच्या फोडी आता ब्लेंडर मध्ये बारीक करून घ्या.
५ गॅसवर पॅन ठेवून मॅश केलेला रस पॅनमध्ये घालून त्यात साखर घाला. मंद आचेवरती हा रस साखर विरघळेपर्यंत आटवा.
इथपर्यंत कृतीची एक महत्त्वाची पायरी पूर्ण होते.
६ साखर विरघळल्यानंतर लगेच त्यात लिंबाचा रस घाला.
७ आता हे सर्व मंद आचेवरती कमीत कमी 25 ते 30 मिनिटे ठेवा. त्यातील पाण्याचा अंश पूर्ण कमी झाल्यावर रसाचा रंग थोडासा गडद होतो आणि लक्षात येते.
८ जाम चमच्यावर घेऊन तो चकचकीत झाल्याची खात्री करा. आणि त्याला जामची कन्सिस्टन्सी आल्याचे लक्षात आले की गॅस बंद करा.
या सर्व प्रक्रियेला अर्ध्या तासाचा वेळ लागतो. मंद आचेवरती उलथण्याने ढवळत रहा.
आहे ना करायला सोपा प्रकार. यात आपण कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर केलेला नाही. हे जाम रेफ्रिजरेटर मध्ये वर्षभर सुद्धा टिकेल.बाटलीचे झाकण छान घट्ट हवे आणि त्याला पाण्याचा हात लागता कामा नये याची काळजी घ्या.
सौ शुभांगी अनिल जोशी
Khamang.blog
Khamangby shubhangi you tube channel