
फोंडा गोवा येथील लेखिका व माजी मुख्याध्यापिका शैलाताई राव यांनी ही एक आगळीवेगळी पाककृती नुकतीच गप्पांच्या ओघात सांगितली.
साहित्य:
१ एक भांडे उकडा तांदूळ
२ अर्धे भांडे खोवलेला ओला नारळ
३ अर्धे भांडे पडवळच्या आतील बिया
४ चवीनुसार चिंच ,गूळ, मीठ. चिंच साधारणपणे लहान लिंबाएवढी लागते.
५ मीठ, हिंग, चार ते पाच सुक्या मिरच्या
कृती:
१ आदल्या रात्री तांदूळ भिजत घाला. तांदूळ कमीत कमी सहा ते सात तास भिजले पाहिजेत.
२ पडवळ त्याच्या आतील बिया काढून घ्या.
३ अर्धे भांडे खोवलेला ओला नारळ लागणार आहे.
४ पॅनमध्ये पाव चमचा तेल घालून त्यात हिंग फुलवून घ्या.
५ पडवळाच्या बिया लाल मिरच्या घालून एक ते दोन मिनिट सर्व जिन्नस परतून घ्या.
६ आता मिक्सर भांड्यात तांदूळ, परतलेल्या पडवळच्या बिया, ओला नारळ, मीठ, चवीनुसार गुळ, चिंच , थोडेसे पाणी घाला.
७ हे मिश्रण अगदी गुळगुळीत वाटून घ्यायचे आहे.या पिठाचा रंग पांढरा स्वच्छ असणार नाही याची नोंद घ्या.
८ तवा चांगला तापल्यानंतर ओल्या फडक्याने पुसून घ्या . मग त्यावर डोशाचे पीठ पसरवा. वरून थोडेसे तेल सोडा.
९ तपकिरी रंगाचा जाळीदार डोसा होईपर्यंत हे ठेवा.
हा आगळावेगळा डोसा दही भाताबरोबर खाण्याची गोव्यातील प्रथा आहे. या डोशा सोबत भाजी सांबर इत्यादी काहीही लागत नाही. हा डोसा आंबट तिखट व किंचित गोड असा लागतो. जरूर करून पहा ! पडवळच्या बियांची चटणी आपण करतोच यावेळी डोसा करून पहा.