
शैलाताईंनी मागच्या आठवड्यात पडवळच्या बियांचे दोसे कसे करायचे हे जसे दाखवले त्याच पद्धतीने आज आपण कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे दोसे करणार आहोत.कलिंगडाचा लाल चुटुक भाग खाऊन झाला की आपण साल टाकून देतो. ती साल न टाकता पाठचा हिरवा भाग तसाच ठेवून मधला पांढरा स्वच्छ भाग आपण किसून घेणार आहोत. साहित्य पाहूया.
साहित्य :
१ दोन भांडी जाड तांदूळ
२ एक भांडे पांढरा भाग कलिंगडाचा किसलेला
३ एक भांडे खोवलेला नारळ
४ लिंबाएवढी चिंच
५ छोटा खडा गुळाचा
६ चार ते पाच सुक्या मिरच्या
७ चिमूटभर हिंग व चवीनुसार मीठ
कृती:
१ सात ते आठ तास तांदूळ भिजले पाहिजेत.
२ पॅनमध्ये पाव चमचा तेल घेऊन त्यात हिंग फुलवून घ्या. नंतर मिरच्या तडतडून घ्या.कलिंगडाचा पांढरा भाग जो किसून घेतला होता तोही थोडा परतून घ्या. पाच ते दहा मिनिटे ह्या दोन्ही गोष्टी मंद आचेवर परता.
३ मिक्सर जारमध्ये वरती परतलेले मिश्रण ,ओले खोबरे, मीठ, चिंच, गूळ आणि भिजवलेले तांदूळ सर्व गोष्टी अगदी गुळगुळीत वाटून घ्या.मिश्रणाचा रंग पांढराशुभ्र येणार नाही कारण चिंच, मिरची, हिंग आणि गूळ यामुळे रंग थोडासा बदलतो.
४ बिडाचा तवा किंवा नॉनस्टिक तव्यावर दोसे घालायचे आहेत. तवा चांगला तापल्यावर ओल्या फडक्याने एकदा पुसून घ्या आणि मग दोसे घाला.
याचे छान जाळीदार दोसे होतात. मग ते तुम्ही चटणी बरोबर,लोणच्याबरोबर, कायरसाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता.
वन डिश मील म्हणून दहीभात व हे डोसे हा बेत नामी होतो.
आगामी आकर्षण: जास्वंदीच्या पानाफुलांचे दोसे .
सौ शुभांगी अनिल जोशी
Khamang.blog
Khamangbyshubhangi You tube channel