चैत्रांगण : लोकसंस्कृतीचा अनोखा उत्सव

on

मंडळी नमस्कार, 

 चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा  हा महिना सुरू झाला की ‘ चैत्रांगण “ अपरिहार्यपणे आठवते.   चैत्रांगणाचा उगम  हा लोकसंस्कृतीत  आहे.  विविध शुभचिन्हांनी नटलेली एक रांगोळी  चैत्र महिन्यात काढली जाते.आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत  एकूण किती चिन्हे असावी   याचा काही निश्चित संकेत नाही. चैत्र गौरीचे स्वागत हा या रांगोळीचा महत्वाचा हेतू.  यावेळी ही  रांगोळी काढण्याचा विचार सुरू झाला  आणि माझे  लक्ष  डॅा. भारती माटे यांनी एका वेगळ्या पद्धतीने या रांगोळी कडे पाहिले आहे; त्याकडे गेले.   आपले पारंपारिक सण व उत्सव हे निसर्ग चक्राशी बांधलेले आहेत. या  रांगोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या ६४   चिन्हांची विशिष्ट रचना त्यांनी सुचवली आहे व त्या मागचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे.  यावेळी मी ती रांगोळी त्यांच्या रचनेनुसार काढली आहे. आत्म्याची रांगोळी असे या रांगोळीचे त्यांनी सार्थ वर्णन केले आहे.  याविषयीच्या आपल्या लेखक मालिकेचे शेवटचे पुष्प गुंफताना त्या म्हणतात “ वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षत तृतीया असे म्हणतात. भारतासारख्या खंडप्राय देशात प्रत्येक प्रांतात तिथल्या भौगोलिक परिस्थिती प्रमाणे सण साजरेही होतात आणि त्याप्रमाणे कथा प्रचलित होतात, तशाच अक्षत तृतीयेच्याही! 

आज ह्या अक्षय दिवशी आपल्यातील दुर्गुणांचा कायमचा त्याग करून अंतर्यामी सद्गुणांचे वरदान मागण्याची जी अक्षय परंपरा आहे, ज्यामुळे आपले संस्कार किंवा आचरण बदलून आपल्या कर्मातही बदल होईल, व हा बदल अक्षय टिकून रहावा म्हणून प्रार्थना करायचा दिवस म्हणजे अक्षत तृतीया. ह्यादिवशी केलेले संकल्प सिध्दीस जातात, असा इतिहास आहे.

गेले ३३ दिवस चैत्रांगणाच्या रांगोळीचे अनेक पदर आणि प्रतिकांविषयी आपण चिंतन करतो आहोत. आज ह्या चैत्रांगणाच्या शेवटच्या भागात ह्या भूमातेला वन्दन करून,ह्या जगातले हे तमस दूर करण्यासाठी  वचनबध्द होऊ या. ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘स्वसंवेद्या आत्मरूपा’ चा संवेदनशीलपणेआपल्या आतील असूरांकडे डोळसपणे पाहू यात, त्यांना सतत वाढून न देता डोळे उघडे ठेवून आपण आपला भवताल, ही सुजलाम् सुफलाम् जन्मभूमी पाहू यात. कमळांनी भरलेली तळी, नाचणारे मोर, मुबलक सूर्यप्रकाश, रत्नखचित आकाश, हिरवीगार वनसृष्टी, फुलाफळांनी लगडलेली झाडे, गंधित आसमंत आपण किती भाग्यवान आहोत की या भूमीत जन्माला आलो. थोडेसे आत डोकावून पाहू यात, निरामय होऊन जाऊ यात.” 

त्यांची ही प्रार्थना तुमची आमची प्रार्थना  देखील आहे,  नाही का ?

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.