फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. कोणे एके काळी हा लावणी महोत्सव वसंत पंचमी ते रंगपंचमी असा चालायचा. कालौघात तो आता फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी असा होतो.या महोत्सवाचे स्थलांतर आता उत्पात वाड्यात म्हणजेच एकनाथ भवन येथे झाले आहे. आजही तितक्यात उत्साहाने एखादा कुलधर्म साजरा करावा त्या पद्धतीने उत्पाद समाजातील मंडळी हा महोत्सव साजरा करतात. या महोत्सवाविषयी लिहायला सुरुवात केल्यानंतर हैदराबाद येथील जेष्ठ पंढरपूर वासी भारत देगलूरकर यांनी आवर्जून फोन केला. त्यांच्या लहानपणच्या या संदर्भातल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने या लावणी मंडळाचा खास कार्यक्रम हैदराबादीत केला होता. कार्यक्रमाला ही सर्व मंडळी तिथे गेली होती. प्रवासाच्या गडबडीत ढोलकी फुटली. परंतु नाउमेद न होता या लोकांनी तो प्रसंग निभावला. लावणीतील भक्ती संगीत वेगळे काढून त्याचा एक स्वतंत्र प्रयोग याच नावाने होत असे. असे दोन प्रयोग भारत देगलूरकर यांना आठवतात. एक प्रयोग झाला होता दासगणू मठात तर दुसरा झाला होता देगलूरकर मठात.
लावणी परंपरा जतन आणि संवर्धन करणे हे काम तसे सोपे नाही. त्याला अनेक लोकांचा हातभार लागलेला आहे आणि लागतो आहे. त्यातले काही बिनीचे शिलेदार आपण चार दिवसात पाहिले आहेत. त्याखेरीज पडद्यासमोर व पडद्याआड काम करणारे अक्षरशः शेकडो लोक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वासुदेव भगवान उत्पात( वैरागकर), वसंत भगवान उत्पात, तात्यासाहेब जोशी- मंगळवेढेकर प्रकाश दादा उत्पात, वासुदेव नारायण उत्पात, मंजिरीची ऐटबाज साथ करणारे सुरेश वामन उत्पात, बाबाजी ज्ञानेश्वर उत्पात ,नरसिंह दत्तात्रय जोशी- मंगळवेढेकर, बापू जोशी, कीर्तनकार चंद्रशेखर मच्छिंद्र उत्पात, उत्तम ढोलकी पटू गोविंद यशवंत वनारे, अरुण रामचंद्र उत्पात, बाळप्पा अनणवलीकर, मधुकर दिवेकर यांचा समावेश होतो. या कीर्तनपरंपरेला हातभार लावणारे अनेक हात आहेत. विस्तार भयास्तव बऱ्याच लोकांचा नामनिर्देश येथे झालेला नाही.
आत्ताच्या पिढीतील श्यामराव उत्पात आणि त्यांचे सहकारी ही धुरा पुढे वाहत आहेत. अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या लोककला विषयक अभ्यासक्रमात या परंपरेचा समावेश व्हावा व त्याला राजाश्रय मिळावा ही त्यांची अत्यंत रास्त मागणी आहे. धोरण करते त्याचा अनुकूल विचार करतील अशी आशा आहे. त्याचबरोबर लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांच्या नावाने एखादे लोककलेचे अध्यासन स्थापन केल्यास या लावणीच्या अभ्यासाला एक निश्चित दिशा येईल. पंढरपूरच्या मंदिर समितीने या कामी पुढाकार घ्यावा.
लेखमालिका वाचून प्रकाशदादा उत्पात यांच्या पत्नी चारुशीला काकू यांनीही आवर्जून फोन केला. बोलता बोलता त्यांनी एक आठवण सांगितली. या लावणी संगीतात श्रुती म्हणून महिलांचा सहभाग जवळपास नसतो. मानसी केसकर यांनी हट्टाने फक्त महिलांसाठी या कार्यक्रमाचा एक प्रयोग करायला लावला. पंढरपुरातील कवठेकर प्रशालेच्या भव्य प्रांगणात झालेल्या या महिला विशेष कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.
कार्यक्रमाची सांगता करताना एक भैरवीतील लावणी येथे देते.
नरजन्मामध्ये नरा करून घे, नरनारायण गडी । तरीच हे सार्थक मानवकुडी ।।
बा चौऱ्यांशी लक्षवेळ, संसार पडला गळा । चिंतेचा पिकला मळा ।।
दार धनाचा मोह टाकूनी, झटकन हो वेगळा । का कसा उकलिसी पिळा ।।
धनानिमित्ते जनापुढे तूं, दाविसी नाना कळा ।
किती तुला मुलांचा लळा ।। तू पडूं नको याचे भरी, तुझ्या हे खापर फुटते शिरी । तुला की गोष्ट सांगतो खरी ।।
आता करी तातडी, ही पुन्हा न ये बा घडी ।
करून घे नरनारायण गडी, तरी हे सार्थक मानवकुडी ।।१।।
कविराय राम जोशी यांची ही भैरवीतील ताल धुमाळीतील लावणी म्हणजे भक्तीरसाचा परमोच्च बिंदू !
संदर्भ : उत्पातांचा लावणी इतिहास- वसंत भगवान उत्पात लिखित पुस्तक.
माहिती सौजन्य: श्याम उत्पात, आशुतोष बडवे , पंढरपूर.
आजची रंगपंचमी साजरी करण्यासाठी पाहूयात श्री पांडुरंगाला आज दाखवला जाणारा नैवेद्य ,श्रीखंड !
साहित्य
१= १ लिटर दूध
२= साधारण तीन वाटी साखर( किंवा जितका चक्का होईल तेवढीच साखर लागते )
३=पाच ते सहा केशर काडी
४= वेलचीपूड १ चमचा पाव चमचा जायफळ
५= कातरलेले पिस्ता ,बदाम , काजू एक चमचा भरून
६= किंचीत मीठ
कृती
१= दूध तापवून घ्यायचे ते कोमट झाल्यावर त्याला विरजण लावायचे ( एक चमचा दही दुधास लावायचे . एकाच दिशेने दूध हलवून दह्याचे विरजण लावायचे )
२= दही लागल्यावर ते स्वच्छ फडक्यावर निथळत ठेवा . दह्यातील पाणी निघून गेल्यावर , चक्का घट्ट बांधून ठेवायचा . उन्हाळ्याच्या दिवसात चक्का बाहेर पटकन आंबट होतो . अश्यावेळी मोठ्या गंजात चक्का टांगून फ्रिज मधे ठेवायचा .
३= आता चक्का आणि साखर , थोडी साय ( दोन चमचे ) मिक्स करून जरा वेळ ठेवून द्या . तासाभराने साखर जरा विरघळलेली असेल . त्यात किंचीत मीठ घालून मिश्रण पुरण यंत्रातून श्रीखंड गाळून घ्यायचे .
४= केशककाडी गरम करून ( पळीत ) त्यात दूध घालून खलून घ्यायचे . विरघळलेले केशर , वेलची , जायफळ श्रीखंडात एकत्र करायचे
५= आता वरून कातरलेले बदाम , पिस्ता पसरवायचा .
मुलायम श्रीखंड तयार 👍👍
या प्रमाणात सहा ते सात लोकांना श्रीखंड आरामशीर पुरेल .
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi youtube channel