लावणी नव्हे  भुलावणी ४

on

 फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात  समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. आज आपण परिचय करून  घेणार आहोत या परंपरेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून तिला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या एका कलंदर व्यक्तिमत्त्वाचा,  अर्थातच ज्ञानोबा उत्पात यांचा. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आल आणि अदाकारी यांचा एक आगळावेगळा संगम होता. त्यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल उत्पात. आपले आजोबा कैलासवासी बाळकोबा उत्पात यांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला त्यांच्या गायकीत भजन गायकी आणि लावणी गायिका सुंदर संगम झालेला दिसून येतो. एकदा त्यांना लावणीच्या रियाज याबद्दल विचारले गेले.  त्यांचे उत्तर होते” शिल्पकार जसे कठोर परिश्रम घेऊन अगदी हुबेहूब  मूर्ती घडवतो ना अगदी तसेच अविष्रांत परिश्रम मी  एकेक लावणी  आत्मसात करायला घेतले आहेत.  काही अवघड झाली असणाऱ्या लावणींची माझी हजार आवर्तने झाली असतील” 

प्रथम जी लावणी म्हणायची ते ती पाठ करायचे नंतर मूळ चाल मुखोदगत  करायचे . त्यानंतर ताल आणि राग यांचा विचार करायचा. एखादा शास्त्रीय गायक आपल्या ख्याल  गायनाची सुरुवात विलंबित लयीत  करून द्रुत लयीत त्याची समाप्ती करतो त्याप्रमाणे लावणी कशी मांडता येईल याचा ते सूक्ष्म  विचार करायचे.नोकरी निमित्त ते पंढरपूर जवळच्या मोडलिंब या गावाला होते.  सलग सुट्टी लागली की केव्हा एकदा पंढरपुरी जाईन असे त्यांना व्हायचे.  पंढरपूर गाठले की नरसिंह जोशी मंगळवेढेकर यांना गाठायचे.  त्यांना हार्मोनियमची साथ करण्याची विनंती करायची.  आठवडाभर परिश्रमाने तयार केलेली लावणी म्हणून बघायची आणि नरसिंह मंगळवेढेकर यांनी समाधान व्यक्त केल्यानंतरच ती लावणी शंकराप्पांना ऐकवायची. अशी कठोर मेहनत केल्यानंतर दादोबा- ज्ञानोबांचा(ज्ञानेश्वर गोपाळ उत्पात) वारसा पुढे चालू झाला.  

   अशातच एक विलक्षण घटना घडली.  वसंतराव देशपांडे यांना जुन्या लावण्या ऐकायच्या होत्या.  त्यांच्यासाठी इचलकरंजी ते शामराव भिडे यांनी पारूबाई जेजुरीकर यांची बैठक आयोजित केली.  मध्यंतरात ज्ञानोबांनी काही लावण्या म्हटल्या.  त्याला वसंतरावांनी भरभरून दाद  दिली व संपूर्ण कार्यक्रम ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. . ज्ञानोबांनी त्यांना होळीचे रंगपंचमी होणाऱ्या लावणी महोत्सवाची कल्पना दिली व निमंत्रण दिले.  २१ मार्च १९८१ हा दिवस या लावणी मंडळासाठी सोनियाचा दिवस ठरला.  त्या दिवशी रात्री दहा वाजता गावाच्या वाड्यात लावणीचा कार्यक्रम सुरू झाला.  रात्री अकराच्या सुमारास वसंतराव व पु. ल.  छोट्या अरुंद बोळातून वाट काढत समोर येऊन बसले.  सभागृहात एक चैतन्याची लाट पसरली आणि ज्ञानोबांनी आपला सूर लावला.  त्या दोघांनी कार्यक्रमानंतर ज्ञानोबांना अक्षरशः मिठी मारून त्यांची पाठ थोपटली.  लावणी मंडळाची कीर्ती महाराष्ट्रभर पसरण्याचा तो प्रारंभ होता. 

     लावण्यांमध्ये त्यांच्या अर्थाला साजेशी मोहक आलापी करणे हे ज्ञानोबांचे अजून एक वैशिष्ट्य. या लावण्यांचे वैशिष्ट्यपूर्ण शब्दोच्चारण  आनंद द्विगुणीत करणारे होते.

आय एन टी या खतनाम संस्थेचे संचालक असलेले अशोक जी परांजपे यांचे आणि या लावणी मंडळाचे एक आगळे वेगळे नाते आहे.  पंढरपुरात या संस्थेमार्फत एक भक्तिसंगित महोत्सव आयोजित केला होता.  त्यात उत्पातांच्या
लावणीचा कार्यक्रम ठेवला जावा असे फर्मान साक्षात पु ल देशपांडे यांनी काढले.  त्याप्रमाणे हा कार्यक्रम ठेवला गेला.  परंतु भक्ती संगीत महोत्सवात लावणी कशी काय असा आक्षेप घेण्यात आला.  कार्यक्रम रद्द करावा लागतो की काय असे वाटू लागले.  पु ल देशपांडे यांच्याशी विचार विनिमय करून कार्यक्रमाचे स्वरूप थोडेसे बदलून’ लावणीतील भक्ती दर्शन’  असा सुधारित कार्यक्रम सादर करण्याचे ठरले.  अतिशय कमी वेळात हा कार्यक्रम बसला व महोत्सवात सादर झाला.  कार्यक्रमासाठी  दुर्गा भागवत ,डॉक्टर यशवंत पाठक, कमलाकर नाडकर्णी ,कल्याणी नामजोशी, वी. रा. आठवले आदीअनेक नामवंत उपस्थित होते.  त्यात वनमालाबाई देखील होत्या.  पुढे एन. सी. पी. ए. ने पुढाकार घेऊन वृंदावन दंडवते यांनी संग्रहासाठी या लावण्यांचे ध्वनिमुद्रण केले.  हे सुमारे साडेचार तासांचे  ध्वनीमुद्रण हा आज एक अमूल्य ठेवा आहे.या मुद्रण प्रसंगी गोविंद तळवलकर, भास्कर चंदावरकर, स्वतः पु ल देशपांडे, विजया मेहता यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उपस्थित होते. 

   हे नादसौंदर्याचे दालन स्त्री श्रोत्यांनाही खुले व्हावे आणि गायनाचा व  गीतअभिनयाचा  प्रसार महाराष्ट्रभर व देशभर व्हावा अशी शुभेच्छा दुर्गाबाई भागवत यांनी दिली होती. अशोक जी रानडे यांनी हा कार्यक्रम ऐकल्यानंतर लावणीचे संगीत ख्याल संगीता इतकेच समृद्ध आहे .  फक्त एकच कार्यक्रम ऐकून माझी अशी अवस्था आहे तर मी अनेक कार्यक्रम ऐकले तर काय होईल?  अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. सोलापूरच्या प्राध्यापक राम पुजारी यांनी कुमार गंधर्वांसाठी सोलापुरातच ज्ञानोबांच्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित  केला.  तो कार्यक्रम ऐकल्यानंतर  कुमारांनी लावणी सम्राट ज्ञानोबांचा मुक्तकंठाने गौरव केला.प्रख्यात संतूर वादक शिवकुमार शर्मा यांच्या बंगल्यात  देखील लावणीचा  कार्यक्रम झालेला आहे . या  प्रसंगी झाकीर हुसेन उपस्थित होते. पंडित भीमसेन जोशी यांच्या नव्या घराच्या वास्तुशांती प्रसंगी देखील त्यांनी आवर्जून हा कार्यक्रम ठेवला होता.अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील ख्रिस्तीन राव यांनी ‘मराठी लावणी चा संगीत पैलू ‘या विषयावर पीएचडी केली त्यात ज्ञानोबा उत्पातांची लावणी यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे.  त्यांनी भारतात आल्यावर पंढरपुरी येऊन ज्ञानोबांची गाठ घेऊन त्यांची सविस्तर मुलाखत घेतली व त्यांच्या आवाजातील काही लावण्या ध्वनीमुद्रित केल्या.

आज चतुर्थीचा दिवस आहे.  त्यामुळे आपण  उपवासाची शेंगदाण्याची  पाटवडी   पाहूया.  

साहित्य:

१ दोन वाट्या भुईमुगाच्या शेंगांचे काढलेले दाणे

२ अर्धा चमचा जिऱ्याची पूड

३ चवीनुसार मीठ

४  सात ते आठ हिरव्या मिरच्या

५  पाव वाटी चिरलेली कोथिंबीर

६  पाव वाटी ओला नारळ खोवलेला

७  तीन ते चार चमचे शिंगाडा पीठ. शिंगाडा पीठ उपलब्ध नसल्यास उपवासाची भाजणी चालेल  

८  अर्धा चमचा तूप

कृती

१ दाणे,हिरवी मिरची, जिरं ,खोबरं ,कोथिंबीर, मीठ या सर्व गोष्टी मिक्सरमधून बारीक करून घ्या. 

२ हे वाटलेले मिश्रण ताटलीत काढून मळून घ्या.  मळताना ते एकजीव व्हावे म्हणून शिंगाड्याचे पीठ अंदाजाने घाला.  साधारण मऊसर असा गोळा तयार झाला पाहिजे. 

३ एका ताटलीला तूप लावून त्यावर हा गोळा एकसारखा पसरा.  कुकरमध्ये, इडलीपात्रात,मोदक पात्रात  कशातही ही ताटली वाफवून घ्यायची आहे. कुकरमध्ये उकडवत लावणार असाल तर कुकरची शिट्टी काढून ठेवा. 

 ४ सहा ते सात  मिनिटे  उकडवून  झाल्यानंतर ताटली बाहेर काढा. त्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्या. 

५ या वड्या तूप किंवा तेल वापरून शॅलो फ्राय करून घ्या. एवढ्या तुम्ही तळू देखील शकता. वडीचा रंग तपकिरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

 सौ शुभांगी अनिल जोशी

 पंढरपूर

khamang.blog व khamangbyshubhangi यु ट्यूब चॅनेल. 

 संदर्भ : उत्पातांचा लावणी इतिहास- वसंत भगवान उत्पात  लिखित पुस्तक. 

 माहिती सौजन्य: श्याम  उत्पात, मोहन मंगळवेढेकर, आशुतोष बडवे , पंढरपूर. 

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.