लावणी नव्हे  भुलावणी ३

on

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात  समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत या परंपरेचा वसा संभाळून ,वाढवून पुढच्या पिढीकडे सोपवणाऱ्या एका कलंदर व्यक्तिमत्त्वाचा. हे व्यक्तिमत्त्व आहे मृदंगाचार्य शंकर आप्पा मंगळवेढेकर यांचे. 

        उत्पातांची लावणी कै. ज्ञानोबाच्या पिढीला मिळाली  ती शंकर अप्पांमुळे . शंकररावांचे घराणे हे पखवाजाचे व शास्त्रीय  संगीताचे. ते मृदूंगाचार्य होते. लहानपणीच ते श्री रंगनाथ गोपाळ उत्पात यांच्या मैत्रीमुळे व त्याकाळी उत्पात गल्लीत राहत असल्यामुळे लावणी मंडळात गेले. वै. दादबा उत्पात, वै. ज्ञानोबा काका उत्पात हे शंकर अप्पांपेक्षा वयाने मोठे पण अप्पा त्यांच्यात मिसळून गेले. ते या कार्यक्रमाला तबल्याची साथ  करू लागले.  या रंगतदार साथीमुळे उत्पातांची लावणी अधिक उठावदार झाली. अप्पानी लावणीला अनुकूल व संयत साथ केली.साथीचे तबला वादन हे गायनापेक्षा अधिक होऊ दिले नाही. अप्पांच्या सर्व लावण्या ह्या तोंडपाठ असल्यामुळे कुठे कसं वाजवायचे हे त्यांना माहित होते. अप्पा अचूक जागा पकडायचे. ” आसन करुनी बसते ” लावणीचे वेळी ” चारी प्रहर चौघडा झडू द्या ” या ओळीला अप्पांनी तबल्यावर असा काही चौघडा वाजवायचा की रसिक खुश होऊन जायचे.

ताल हा लावणीचा प्राण आहे व  तो अप्पांनी सांभाळला.

       संग्रह करणे हा अप्पांचा स्वभाव. त्यांनी 300 ते 350 लावण्या शोधून आपल्या संग्रही ठेवल्या. संगीत व साहित्य या दोन्ही दृष्टिकोनातून त्यांनी लावणीचा अभ्यास केला. अप्पांच्या तबल्यावर गोदावरी पुणेकर सारखी लावणी सम्राज्ञी निहायत खूष होती.साथ कशी असावी याचा एक उत्तम नमुना किंवा उदाहरण म्हणजे शंकर अप्पांचीतबल्याची साथ असे तिचे म्हणणे होते.तिचे यजमान श्री दातार हे रसिक व स्वतः तबला वादक होते. त्यांना घेऊन गोदावरी अप्पांचा तबला ऐकण्यास त्यावेळी पंढरपूरी आली होती. अप्पांचा तबला ऐकुन ते दोघेही खूष झाले.

      या पिढीला लावणीची गोडी अप्पानी लावली.अलीकडे श्री अप्पा लावणी कार्यक्रमात मंजिरीची साथ करीत असत. मंजिरीचा ताल साऱ्या लावणी  कार्यक्रमाचा तोल सांभाळतो.वै. तात्या मंगळवे्ढेकर सुद्धा अप्पांच्या मंजिरीकडे पाहून तबला वाजवीत असतं . मंजिरी हे लावणीच्या  मैफिलीचा ताल व तोल सांभाळण्याचे माध्यम  आहे व ते अप्पा समर्थपणे संभाळीत होते.आप्पांसमवेत मंगळवेढेकर कुटुंबीयातील तात्यासाहेब मंगळवेढेकर व नरसिंह मंगळवेढेकर यांनी देखील या लावणी कार्यक्रमा वेळी रसपोषक साथ अनेक वर्षे केली आहे.

आज तुकाराम बीज.  तुकोबांचा एक अभंग असा आहे. 

पाहुणे घरासी I आजि  आले ऋषिकेशी I 

काय करूं  उपचार I कोंप  मोडकी जर्जर II धृ II 

दरदरीट  पाण्या माजीI रांधियेल्या कण्या II २ II  

घरीं  मोडकिया बाजाI वरी वाकळांच्या शेजा II ३ II 

मुखशुद्धी तुळसीदळI तुका म्हणे मी दुर्बळ II ४ II 

साक्षात ऋषिकेश घरी आला तर काय करायचे ते तुकोबांनी वरच्या अभंगात सांगितले आहे.  आजच्या बिजेला याच कण्या व आंबील केले जाते. 

ज्वारीच्या कण्या : 

 साहित्य

१ एक वाटी ज्वारी आणि मीठ चवीनुसार. 

२  किंचित जिरे 

कृती : 

१ ज्वारी ओलवून मिक्सरमध्ये तिचा रवा काढा. ( भरड ) 

२ ही भरड थोडीशी पाखडून घ्या म्हणजे त्यातील साले निघून जातील आणि छान कण्या  मिळतील. 

३ एक चमचा कण्या थोड्याशा भाजून घ्या.  भाजताना त्यात जिरे व चवीनुसार मीठ घाला. तेही खमंग भाजून घ्या.  दोन्ही गोष्टी पाणी घालून कुकरमधून शिजवून घ्या.  शिजवताना पाणी बेताचे घालायला लागते नाहीतर त्याची लापशी होईल.  

४ आता शिजवलेल्या कण्याकुंड्यात किंवा ताटलीत घेऊन त्यावर थोडेसे तूप घाला.  त्यासोबत एक तर ताक नाहीतर आंबील अतिशय रुचकर लागते. 

 आता आंबिलाची कृती पाहूया. 

१ दोन चमचे ज्वारीचे पीठ पाणी घालून एकजीव करून रात्रभर भिजत ठेवा. 

२  दुसरे दिवशी सकाळी एका पातेल्यात दोन फुलपात्री  पाणी उकळायला ठेवा.  पाण्याला उकळी आली की आपण तयार केलेले ज्वारीचे मिश्रण त्यात घालून एकसारखे ढवळत राहा.  पिठाची गुठळी होऊ नये याची दक्षता घ्या.  पिठाचा कच्चट वास जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवायचे आहे.  त्यासाठी आदमासे पाच ते सात मिनिटे लागतील. 

३ हे पीठ कोमट झाल्यावर त्यात आपण एक फुलपात्रभर ताक घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून सरसरीत होईल आणि पिता येईल  इतपत  त्याची घनता ठेवायची आहे. 

४ कढल्यात तेल घेऊन जिरे मोहरी हिंगाची फोडणी करायची.  त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडासा कढीपत्ता, आवडत असल्यास लसूण  छान परतून घ्या.  ही फोडणी आंबिलावर घालायची आहे. वर थोडी कोथिंबीर भुरभुरा.

उन्हाळ्यात अतिशय रुचकर आणि आरोग्यदायी असे हे पेय जरूर करून पहा. 

 सौ शुभांगी अनिल जोशी

 पंढरपूर

khamang.blog व khamangbyshubhangi यु ट्यूब चॅनेल. 

 संदर्भ : उत्पातांचा लावणी इतिहास- वसंत भगवान उत्पात  लिखित पुस्तक. 

 माहिती सौजन्य: श्याम  उत्पात, मोहन मंगळवेढेकर, आशुतोष बडवे   पंढरपूर. 

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.