फाल्गुन शुद्ध पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या उत्पात समाजाच्या लावणी महोत्सवाचा आढावा आपण घेत आहोत. फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला वसंत ऋतूचा आरंभ होतो असे समजले जाते. काल आपण या लावणीपरंपरेचे आद्य गायक समजले जाणारे बाळकोबा उत्पात यांची माहिती घेतली. आज या परंपरेला वृद्धिंगत करणारे अजून एक दिग्गज कैलासवासी दादबा उत्पात यांच्या कामगिरीची माहिती पाहूया. त्यांचे पूर्ण नाव भगवान गोपाळ उत्पात (वैरागकर).गेल्या पिढीतील एक अत्यंत थोर भजन आणि लावणी गायक म्हणून ते ओळखले जातात. त्यांना अत्यंत मधुर आवाज लाभला होता. त्यांनी लौकिक अर्थाने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नव्हते तरीही त्यांचे संगीतज्ञान व संगीतभान अत्यंत प्रगल्भ असे होते. त्यांनी कधीही तंबोरीचा सूर हार्मोनियमचा वापर करून लावला नाही. कारण ज्या स्वरात तंबोरा वाजत असेल त्याच्या खालच्या मंद्र सप्तकातील पंचम व षड्ज स्वतःच्या गळ्याने लावण्याइतकी मेहनत त्यांनी केली होती. त्यांचे पाठांतर इतके चोख होते की त्यांना समोर वही घेऊन कधीही म्हणावे लागले नाही.
दादबा लावणी म्हणायचे ते होळी ते रंगपंचमी या कालावधीतच आणि ते सुद्धा स्वान्तसुखाय आणि समवयस्क मित्रांच्या आनंदासाठी . दादोबांची ही कला पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे या कालावधीत त्यांच्या लावण्या ऐकण्यासाठी लांब लांब अंतरावरून रसिक यायचे. त्याकाळी अत्यंत नामांकित असलेल्या गोदावरी पुणेकर, हिरा अवस्कर, गुलाब संगमनेरकर, हिराबाई कलढोणकर, विदर्भातील ख्यातनाम अशा चतुराबाई इत्यादी मंडळी त्यांच्या लावण्या ऐकण्यासाठी आवर्जून येत असत. पूर्वी या लावण्या बंदिस्त जागेत म्हटल्या जात होत्या. कालांतराने या विठ्ठल मंदिराच्या उत्तरद्वारा जवळील दगडी फरशीवर रंगू लागल्या.कालांतराने आपला हा शौक पुढे चालवण्यासाठीत्यांच्या मित्रमंडळींनी मंदिराजवळ असलेला ‘डावाचा वाडा’ म्हणून ओळखला जाणारा एक स्वतंत्र वाडा विकत घेतला. त्यांच्या गायनाची कीर्ती पुण्या मुंबईपर्यंत पोचल्यानंतर एकदा महामहोपाद्याय दत्तो वामन पोतदार व बाळासाहेब खासगीवाले खास या लावण्या ऐकण्यासाठी आले होते.
दादबांच्या नसानसातून सूर आणि तालच भरलेला होता. जेवायला बसले तर मीठ आणि लिंबू वाढेपर्यंत ते ताट हातात घेऊन त्यावर ते डबा सारखी थाप मारायचे आणि लावणीचे बोल गुणगुणत त्यातच रममाण व्हायचे.
दादांच्या निधनानंतर झालेल्या श्रद्धांजली सभेत बोलताना धुंडा महाराज देगलूरकर म्हणाले” दादोबांनी मला दोन गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे तालीम करणे आणि दुसरी भजन. “ शंकर आप्पा मंगळवेढेकर म्हणाले”लावणी म्हणताना दादांनी कधीही लावणीची मूळ चाल बिघडवली नाही. शब्दघात स्वरघात अचूक केला. त्यांचा कधी घात केला नाही. पुरुषांनी केलेली लावणीची मैफिल फक्त दादांचीच.”
या श्रद्धांजली सभेत बोलताना पंढरपूरचे माजी आमदार( माझे आज्जे सासरे)गणेश वामन उपाख्य बाबुराव जोशी म्हणाले,” दादोबांच्या गुणगौरवाची अनेकांनी भाषणे केली. परंतु दादोबा उत्कृष्ट लावणी गायक होते हे कोणीच सांगितले नाही. कालिदास सांगायचा आणि शृंगार विसरायचा हे कसे चालेल? “ त्यापुढे बोलताना त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पौर्णिमेचे टिपूर चांदणे पडले होते. आहे. चंद्रभागेच्या पात्रातून नाव विष्णुपदाकडे चालली होती.हवेत हिवाळ्याचा गारवा होता. दादबांनी डफ हातात घेतला. डफावर थाप पडली आणि नावेतून जाताना चंद्रभागेच्या जल लहरींवर दादोबांच्या गळ्यातून येणाऱ्या मुलायम आवाजात एका चढ एक लावणीच्या स्वरमधूर लहरी उठू लागल्या.’ऐने महाली शेज केली, हंड्या झुंबरे लावा’ हे लावणीतील इरसाल शब्द स्वरात चिंब चिंब भिजवून लख्ख चांदण्यात न्हावून निघाले. आमच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. गारवा असूनही लावणीने अंगात उब निर्माण केली.”
दादा म्हणजे नवरात्र भजनातील साकार नादब्रह्म होते. मूर्तिमंत भक्तिरस होता. महोत्सवातील अष्टमीच्या दिवशी’ खेळ भोवरा बाई ग भोवरा” ही गवळण म्हणताना त्यांना अक्षरशः गान समाधी लागायची. असा लावणी गायक न होणे !
संदर्भ : उत्पातांचा लावणी इतिहास- वसंत भगवान उत्पात लिखित पुस्तक.
माहिती सौजन्य: श्याम उत्पात पंढरपूर.
आजचा पदार्थ आहे धिरडं गुळवणी
िरडे गुळवणी
धिरडे
साहित्य
१=एक वाटी कणिक
२= १/२ चमचा तांदळाची पिठी
३= किंचीत मीठ
४= किंचीत जीरेपूड
कृती
१= कणकेत मीठ , जिरेपूड , तांदूळ पिठी एकत्र करून त्यात पीठ सरसरीत होईल एवढे पाणी घालून भिजवायचे . पिठ फार पातळ किंव्हा घट्ट नको .
२= नॅानस्टीक तव्यावर ही धिरडी घालायची . तवा तापल्यावर ओल्या रूमालाने तवा पुसून घ्या , मग पळीत पिठ घेवून एकसारखी गोलाकार धिरडे घालायचे . मंद आचेवर तपकिरी रंग येईपर्यंत धिरडे उलटायचे नाही . धिरड्याच्या कडेने तव्यावर तेल सोडायचे किंचीत .अशी धिरडी खायला लुसलुशीत आणि खमंग लागतात .
गुळवणी
साहित्य
१ = एक मोठे फुलपात्र भरून पाणी
२=१/२ वाटी गुळ
३= १/२चमचा खसखस ,१/२चमचा सुखे खोबरे भाजून बारीक वाटून घ्यायचे
४= वेलची , जायफळ
५= १/२ वाटी दूध
६ = आवडत असल्यास पाव चमचा सूंठ पूड
कृती
१= मोठे फुलपात्र भरून पाणी पातेलीत घ्यायचे त्यात बारीक चिरलेला गुळ घालायचा . गुळ विरघळेपर्यंत पाणी उकळत ठेवायचे . आता यात खसखस व खोबरे यांची पूड घालायची . सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर त्यात वेलची , जायफळ , सूंठ पूड घालायची . आता एका कुंड्यामधे वरील मिश्रण काढून घ्यायचे .आता याच्यात दूध मिसळायचे . दूध गुळवणी उकळत असताना घालायचे नाही , कारण दूध फुटायची शक्यता असते .
मग धुळवडी चा मेनू आवडला ना ?
या मेनू बद्दल माहिती सौ प्रतिभा अनिल बडवे यांनी दिली . काकू धन्यवाद 🙏

