फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला येणारी होळी हा भारतातला एक पारंपारिक सण आहे. सामाजिक सौहार्द्र जपणारा हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक. होळी म्हणजे रंगाची उधळण, वसंताचे स्वागत करणारा निसर्ग ! देशभरात हा सण वेगवेगळ्या परंपरांनी साजरा केला जातो. आमच्या पंढरपुरात हा सण एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होतो. श्रुती व रसना या दोन्हींना पूरक अशी पंढरपूरची परंपरा आहे. ही परंपरा सुमारे दीडशे वर्षांची आहे.
श्री रुक्मिणी मातेचे पारंपरिक पुजारी असलेला उत्पात समाज एका वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतो. होळी ते रंगपंचमी या कालावधीत दीडशे वर्षे जतन केलेल्या सुमारे अडीचशे तीनशे लावण्यापैकी मोजक्या लावण्या जाहीरपणे सादर केल्या जातात हे अचंबित करण्यासारखे आहे.”उत्पात ही तुमची लावणी नाही तर भुलावणी आहे” हे उद्गार साक्षात छोटा गंधर्व यांनी काढलेले आहेत. पुण्यातील भरत नाट्य मंदिरात उत्पाद समाजामार्फत साजरा केलेला श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या अधिपत्याखालील लावणीचा कार्यक्रम ऐकल्यानंतरची ही या स्वर राजाची स्वाभाविक प्रतिक्रिया !ज्ञानोबा मला माफ करा माझी तब्येत बरोबर नाही मी फार झाले तर अर्धा तास थांबेल आणि जाईन असे म्हणून कार्यक्रमाला आलेले छोटा गंधर्व पूर्ण वेळ हा कार्यक्रम ऐकण्यासाठी थांबले.पाच समाजाच्या या लावणी गायनाच्या परंपरेचा उगम कैलासवासी बाळकोबा उत्पात यांच्या गायनात असल्याचे सांगितले जाते. लावणीपरंपरेचे हे आद्य गायक. ते रुक्मिणी मंदिरात नित्यनेमाने भजन करीत आणि होळी पौर्णिमा ते रंगपंचमी या कालावधीत मात्र डफाच्या तालावर लावणी गात. ते या लावण्या स्वतः रचून गात असत. त्यांच्या लावण्यांपैकी एकच लावणी पुढे परंपरेने पोचली आहे. तिचे शब्द माडी समोर माडी सख्याची असे काहीसे आहेत. त्या काळात बाळकोबांकडे कलावंतीणी लावणी शिकण्यासाठी येत असत.लावणी शिकवताना बाळकोबा स्वतः डोक्यावर उपरणे घेऊन लावणीतील अदाकारी व अभिनय शिकवत असत. बाळकोबांवर एकदा आर्थिक अरिष्ट आलेले असताना यमुनाबाई नावाच्या कलावंतीणीने आपल्या अंगावरचे दागिने विकून त्यांना मदत केली होती.
हे झाले श्रवण सुखाबद्दल. रसनेचे काय ? या कालावधीत दिवसा मिष्टान्न भोजन आणि रात्री लावणी असा प्रघात आहे. बडवे उत्पात व इतर सर्व सेवाधारी आणि रसिक पंढरपूरकर एकत्र येऊन अंगत पंगत करायचे. प्रत्येक दिवसाचे पदार्थ ठरलेले असायचे. कालपरत्वे ही परंपरा काहीशी बदलली आहे. आता आचारी लावून स्वयंपाक केला जातो. परंतु परंपरेने आलेले पदार्थच क्रमशः केले जातात.हे पदार्थ म्हणजे होळीला पुरणपोळी धुळवडीला धिरडे गुळवणी तुकाराम बीजेला कन्या आंबील तृतीयेला पिठले वड्या चतुर्थीला सांजा पोळी तर रंगपंचमीला घरी विरजण लावून चक्का करून केलेले श्रीखंड, नाथ षष्ठीला गव्हाची खीर आणि डाळ वांगे. या आठवड्यात क्रमशः हे पदार्थ सांगायचे व लावणी परंपरेचे पाईक असणाऱ्या काही मान्यवरांची त्यासोबत ओळख करून द्यायची असा मानस आहे.
नवीन पिढीने त्यांच्या रुचीनुसार या पदार्थात नवीन भरही घातली आहे. या मिष्टान्न भोजनानंतर रंग खेळला जायचा. पाच दिवस रंगात भिजलेला तोच सदरा घातला जायचा.
पारंपरिक होळीसाठी म्हणून केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. तेव्हा आपण या मालिकेची सुरुवात करूयात पुरणपोळीनेच.
पुरणपोळी
साहित्य
१= दोन वाटी चण्याची डाळ
२=दोन वाट्या चिरलेला गूळ
३= दोन वाटी चाळून कणीक घ्यायची ( एक चमचा मैदा )
४=पाव चमचा जायफळ
५= किंचीत मीठ , तांदळाची पिठी
कृती
१= डाळ स्वच्छ धुवून घ्यावी ,कुकरमधे डाळीत जरा जास्त पाणी घालून डाळ शिजवून घ्यावी . डाळीच तेलाचे दोन थेंब व किंचीत हळद घाला रंग छान येतो पुरणास.
२= डाळ मऊ शिजल्यावर डाळ चाळणीवर घालून जास्तीचे पाणी कटासाठी काढून ठेवावे .
३= डाळ कढत असतानाच त्यात गूळ घालून पुरण शिजवून घ्यावे . पुरण शिजले की नाही हे पटण्यासाठी कालथा पुरणात नडगमगता उभा राहिला म्हणजे पुरण शिजले समजावे . पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचे. वाटताना जायफळ व किंचीत मीठ घालून वाटायचे पुरण .
४= परातीत दोन वाट्या कणीक व एक चमचा ( मोठा चमचा ) मैदा घेऊन कणीक घट्ट भिजवून घेतली . थोड्यावेळाने कणकेत मीठ व पाणी लावून कणीक मऊ होईपर्यंत मळून घेतली .आता एका भांड्यात कणीक ठेवली व त्यात कणीक पूर्ण भिजेल एवढे पाणी घातले . तासानंतर पाणी काढून कणीक परत तेलाचा हात घेवून मळून घेतली . आता कणकेला मस्त तार आली आहे .
५= कणकेची पारी करून कणकेच्या दुप्पट पुरण या उंड्यात भरून घेतले . तांदूळाची पिठी पोलपाटला लावून पोळी सरसर लाटली . शेवटपर्यंत पुरण गेलेले आहे हे पाहून पोळी तव्यावर लाटण्याच्या साहाय्याने पसरवली .दोन्ही बाजूने पोळी खमंग भाजून घेतली .
६= आज कणकेत किंचीत हळद घातली आहे.
टीप
पुरणाची पोळी तांदळाच्या पिठीवर लाटावी कारण तांदूळाच्या पिठातील प्रथिनं अगदी कमी असल्याने ते पीठ कणकेतलं तेल आणि पाणी शोषून घेत नाही . म्हणून पोळी पिठाला आणि पोळपाटाला चिकटत नाही .
वरील प्रमाणात दहा ते बारा पोळ्या होतात .
वरील टीप डॅा वर्षा जोशी
यांच्या स्वयंपाकशाळा या पुस्तकातील आहे .
करून पहा 👍
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
संदर्भ : उत्पातांचा लावणी इतिहास- वसंत भगवान उत्पात लिखित पुस्तक.
माहिती सौजन्य: अशुतोष बडवे व श्याम उत्पात पंढरपूर.

