वैभवशाली नवरात्र : कोजागिरी पौर्णिमा

on

मंडळी नमस्कार, 

 श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या पंधरा दिवसांच्या नवरात्रातील आजचा एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस.  श्री रुक्मिणी मातेला एकदा श्रीकृष्णाचे बालरूप बघायची इच्छा निर्माण झाली.  हे बालरूप म्हणजे गोकुळात बासरी वाजवणारे मनोहर रूप.  श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचा हा हट्ट पुरवून तिला ज्या रूपात दर्शन दिले त्याच रूपात म्हणजे देहुडाचरणी मुद्रेत श्री रुक्मिणी मातेचा साज केला जातो.  एका परीने आज शिव आणि शक्ती अर्थात स्त्री तत्व व पुरुष तत्त्व यांचे एकत्रित दर्शन आपल्याला होते.  त्यामुळे आजच्या या रूपाला अर्धनारीश्वर असे देखील संबोधले जाते. हा पोशाख करणे सोपे नाही.  आज रुक्मिणीला नेहमीप्रमाणे  नऊवार  साडी  नेसवायची नसून  पांडुरंगाप्रमाणे सोवळे नेसवायचे आहे.  त्यावर अंगी घालून उपरणे देखील घ्यायचे आहे.  तिला आज कुंकवाचा मळवट नसतो तर त्रिपुंड असते.  आज तिच्या कमरेत बासरी देखील खोचली  जाते.  मुकुटाच्या ऐवजी असतो शिरपेच  आणि त्यात लावलेले असते एक डौलदार  मोरपीस.आज तिच्या नाकात नथदेखील नसते.कृष्णाला प्रिय म्हणून तुळशीहार गळ्यात असतो. 

आज शिरपेचावर सूर्यचंद्र देखील आहेत. दोन नवरत्नांचे बाजूबंद आहेत.  एक रत्नपट्टी आहे.  मोत्याचे जडावाचे पदक आहे.  कानात मत्स्य आहेत.  तानवड आहेत. गळ्यात हिरवी चिंचपेटी,  विविध हिऱ्या मोत्यांच्या माळा,  कमरेत मोठी सोन्याच्या घुंगरांची माळ आहे. परंपरेने आजच्या पोशाखात कमरेत बासरी खोवलेली असते. आजचा हा पोशाख करायला सगळ्यात कठीण समजला जातो.  देहुडा चरण म्हणजे बासरी वाजवताना एक पाय सरळ तर दुसरा पाय तिरका समोरून आणून फक्त पुढचा भाग टेकवलेला. तिने आज अंगी परिधान केले असून लाल रंगाचा शेला त्यावर आहे.ही कृष्णरुपातली रुक्मिणी अविस्मरणीय आहे ना ?  

त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवित आहे ॥१॥

गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमनंदुवो ॥ध्रु०॥

सांवळे सगुण सकळा जिवांचें जीवन । घनानंद मूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥

शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥ श्री संत ज्ञानेश्वर . 

कोजागिरी पौर्णिमा व अश्विन पौर्णिमा अशा दोन पौर्णिमा यावेळी आहेत.  पौर्णिमेला जो भंडाऱ्याचा नैवेद्य असतो तो फरशी चिवडा.  हा चिवडा बनविण्यात उत्पात  समाज तरबेज आहे.  कैलासवासी अरुणबाबा उत्पात आणि त्यांचे चिरंजीव प्रमोद हे यातले तज्ञ समजले जातात. या चिवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा चिवडा खरोखरच फरशीवर करतात.  या चिवड्याला कसलीही फोडणी नसते.  थोड्याशा तेलात काळे तिखट कालवून ते चुरमुरे यांना चोळायचे.  वरून सगळे कोरडे मसाले घालायचे आहेत म्हणजे मेतकूट धने जिरे पूड चवीप्रमाणे मीठ ,पिठीसाखर, हळद, तिखट, लवंग पूड, दालचिनी पूड.  हे सर्व मसाले वरून भुरभुरून हा चिवडा फक्त हाताने व्यवस्थित कालवायचा.  खायला  पातेल्या  चमचे वगैरे सरंजाम लागत नाही.  फक्त हाताचा वापर करून तो फस्त करायचा असतो.हा चिवडा वारकरी, भजन कर्ते,  कीर्तनकार, सेवेकरी व  दहा दिवस देवी उपासना करणारे सर्व भाविक  यांना वाटला जातो. 

श्री रुक्मिणी पांडुरंगाला विविध वस्त्र प्रावरणे परिधान करणे ही एक कला आहे.  रुक्मिणी मातेच्या बाबतीत ही कला उत्पात समाजाने जोपासली आहे.  त्यातील एक तज्ञ श्री चिंतामणी उत्पात  यांनी या कलेचे प्रात्यक्षिक  दाखवले आहे.  ते प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खालील दुवा पहा.पंढरपुरातील पिढी जात शिल्पकार मंडवाले बंधू यांनी या प्रात्यक्षिकासाठी रुक्मिणी मातेची मूर्ती उपलब्ध करून दिली.  ती घरी आणून त्यावर हे प्रात्यक्षिक चित्रित करण्यात आले आहे.

सौ शुभांगी जोशी 

Khamang.blog

Khamangbyshubhangi youtube channel

यावर आपले मत नोंदवा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.