मंडळी नमस्कार,
आज दसरा. आज रुक्मिणी मातेस विजयालक्ष्मी पोशाख व साज आहे. पारंपरिक नवरात्राची सांगता जरी आज होत असली तरी या लेखमालेच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणीचे नवरात्र पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. दसऱ्याचा आजचा सणअसत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.आजचा रुक्मिणी मातेचा पोशाख कसा आहे ते पाहूया.
जडावाच्या मुकुटावर खड्यांची वेणी आहे. वेणीला माणकाचे सुंदर फुल तुरा म्हणून लावले आहे.चंद्र सूर्य आहे. माणिक मोत्यांचा बिंदी पट्टा आहे. कानात जडावाचे तानवडे व मत्स्य आहेत. तिला आज लाल मळवट भरून त्यावर कमलपुष्प व अक्षत आहे. त्याखाली हळद लावली आहे. नाकात टपोरी मोत्याची नथ आहे . अगदी गळ्यालगत हिरव्या रंगाची चिंचपेटी आहे नंतर त्याखाली दशावतारी हार आहे त्याखाली पाचूची गरसोळी आहे. ठसठशीत मोती, हिरे व पाचू यांनी घडवलेला कंठा आहे. त्याखाली लहान मोठे जडावाचे हार आहेत. त्यानंतर नवरत्नांचा हार आहे. तुळशीपत्रांचा सुवर्णहार आहे. जडावाचा कंबरपट्टा आहे. मास पट्टा आहे. तारामंडल हार देखील आहे. दोन्ही दंडात वाक्या, बाजूबंद, शिंदेशाही तोडे, माणकाचे कंगन आणि जडावाच्या पाटल्या आहेत. पायात सोन्याचे रूळ आणि पैंजणे आहेत. आज सर्वात लक्षवेधक आहे ती रुक्मिणीने नेसलेली सोन्याची साडी.कडेला छत्रचा नकोमर व समोर सोन्याचा कुंकवाचा करंडा आहे. हे तिचे विश्वरूप आपले डोळे दिपवणारे आहे. जगतजननीला साजेचा असाच तिचा सर्व साज आहे नाही का ?
पांडुरंगाचा थाटही काही कमी नाही.
सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज ।
आम्हांसी सहज द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥४॥
श्री संत तुकाराम महाराज यांच्या वरील अभंगाची साक्षात प्रचिती यावी असे आजचे श्री पांडुरंगाचे दर्शन आहे. सोन्याची पगडी, पगडी वरती जडाव व बाजूची वेणी आहे. सुंदरसे मोरपीस आहे. त्याखाली मोत्याचा तुरा आहे. केशरी नामावर नीलम नामपट्टी आहे. आज त्याचे कान आपल्याला पूर्ण दिसत आहेत. सावळ्या चेहऱ्यावर किती तेज झळकते आहे ते पहा. गळ्यात कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंठा, मोत्याच्या कंठ्यात हिऱ्याचे पदक, सोन्याचे ही पदक, पाचू आणि हिरा जडवलेली मोठी मोत्याची माळ, दोन जडावाचे हार, दोन पुतळ्यांच्या माळा, एक सोन्याचा तुळशीहार, लहान आणि मोठे सोन्याचे मोती असलेली तीन पदरी माळ आणि सर्व रूपाला अलौकिक परिमाण देणारे ते सोन्याचे घोंगडे व गवळारु काठी. आज नेसवलेला कदही सोन्याचा आहे.मोरपीस पाहिले की कृष्णाचा भास होतो तर घोंगडे पाहिले की त्याला लोकदेव का समजले जाते त्याची जाणीव होते.तो प्रसन्न सावळा चेहरा, कटीन्यस्त हात व समचरण या सर्व भेदाभेदापलीकडे कसे व केव्हा नेतो ते खरोखर समजत नाही.
आज दसरा नैवेद्याला एक वेगळा प्रकार करून पाहिला. जसे आपल्याकडे नवरात्र चालू आहे तसेच बंगालमधे पण दुर्गापूजा महोत्सव चालू आहे. त्यामुळे आज एक बंगाली पदार्थ पाहुयात.
कमला लेबुर खीर / कोमोला खीर
साहित्य
१= १/२ लिटर दूध
२= दोन मोठी संत्री किंवा ३ लहान संत्री
३= दोन चमचे साखर
४= वेलची पूड , बदाम , पीस्ता काप
कृती
१= पॅन मधे दूध तापत ठेवायचे .दूध चांगले आटवून घ्यायचे , आटत आल्यावर साखर घालायची .
आता दाट झालेली बासूंदी तीन तास तरी गार करायला फ्रिज मधे ठेवायची .
२= संत्रे सोलून घ्यायचे (शीरा , बीया , पांढरा भाग काढून टाकायचा नुसता गर घ्यायचा)
३= फ्रिज मधील गार दूधात आता संत्र्याच्या फोडी घालायच्या .
मस्त गोड किंचीत आंबट आणि संत्र्याचा स्वाद यांचा त्रिवेणी संगम या खीरीत आहे. जरूर करून पहा. नाहीतरी ॲाक्टोबर हीट चालूच आहे. पोटाला थंडावा देते ही खीर.
महत्वाचे म्हणजे गरम दूधात संत्र घालायचे नाही कारण दूध फाटेल. गार दूधात संत्री घालायची.
पहाताय ना करून 👍
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi YouTube channel

cool cool
LikeLiked by 1 person