मंडळी नमस्कार,
आज रुक्मिणीमातेने तुळजाभवानीचे रूप धारण केले आहे. तुळजाभवानी म्हटले की आपल्याला महिषासुरमर्दिनी आठवते.अर्थातच दैत्य संहार करत असल्याने हे रूप रौद्र असते. तुळजापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. या शक्तीपीठात वास करत असलेल्याया वीर तत्वाचा सन्मान करण्यासाठी रुक्मिणी माता आज हे रूप धारण करते. बाहेरून हे रूप तुळजामातेचे असले तरी अंतरंगी माता ही नेहमीप्रमाणे समाधानी वत्सल व प्रेमळ भासते. गरजेप्रमाणे रौद्ररूप व नेहमीचे प्रेम व वात्सल्य यांचा समतोल आजच्या स्त्रियांनी साधला पाहिजे असे तर हे रूप सांगत नाही ना ? काल दिवसभर रुक्मिणी माता वनात होती. साहजिकच ती दमली असणार म्हणून आज तिला मंचकावर विसावली आहे. पाठीमागे टेकायला लोड आहे. पाहूयात आजचे तिथे दर्शन कसे आहे ते.
आज तिने लाल रंगाची पैठणी परिधान केली आहे. पिवळ्या मंचकावरती दोन्ही पाय खाली सोडून विराजमान आहे. जांभळ्या रंगाचा शेला आहे. मागे शांत निळ्या रंगाची पार्श्वभूमी आहे. आज या जगतजननीला खाली चांदीचे पाय लावलेले आहेत.सोन्याच्या मुकुटावर खड्याची वेणी आहे. मुकुटाच्या टोकाला सूर्याचे प्रतीक लावलेले आहे. पैंजणाचे सोन्याचे जोड मुकुटावर लावले आहेत. पेट्यांची बिंदी कपाळावर बांधली आहे. या बिंदीत माणिकमोती आहेत. जडावाचे झुमके आहेत. कानात मत्स्यजोड आहेत त्याखाली मोठी सुवर्णाची कर्णफुले आहेत.मत्स्यावरती माणिक ,पाचू आणि हिरे जडवलेले आहेत.कर्णफुलावर मोती आणि माणिक आहेत. नाकात मोठी मोत्याची नथ आहे. आज तिला जो मळवट भरण्यात आला आहे तो गंध आणि कुंकवाचा आहे. मळवटाच्या मधोमध अत्यंत सुबक असे कमल पुष्प आहे. त्याच्या देठाला सोनेरी ठिपका दिला आहे. दोन भुवयांच्या मध्ये अक्षत आहे. मानेच्या लगत हिरव्या रंगाची चिंचपेटी आहे. गळ्यात ठसठशीत मोठी सोन्याची ठुशी आहे.आज तिला दशावतारी साज देखील घालण्यात आला आहे. त्यानंतर जो दागिना आहे तो अत्यंत खास आहे त्याला पाचूची घरसोळी म्हणतात. खास पारंपरिक राजेशाही दागिना आहे तो. त्या घरसोळीला मधोमध पानडीच्या आकाराचे हिरे आहेत आणि टोकाला मोती जडवले आहेत.त्याखाली लहान मोठ्या मोत्याच्या सरी आहेत. त्याखाली मोहरांची माळ आहे. त्याखाली पुतळ्यांची माळ आहे. मोठा जडावाचा हार आहे. हातात कानडी पद्धतीचे दोन बाजूबंद घातलेले आहेत. बांगड्या मोत्याच्या असून त्यात माणिक आणि पाचू दोन्हीही जडवलेले आहेत. पायात सोन्याचे रूळ आहेत.
माझी नेहमीची मदतनीस अत्यंत भाविक आहे. माझ्यावर प्रसन्न असणाऱ्या माझ्या नवदुर्गांपैकी ती एक आहे. गेले सहा दिवस उपवास करते आहे व पूर्ण नवरात्र हा उपवास चालणार आहे. आजची पाककृती खास तिच्यासाठी, रताळ्याची चटणी.
रताळ्याची चटणी
साधी , सोपी तरही चविष्ठ चटणी .
साहित्य
१=साधारण एक वाटी रताळ्याचा किस ( रताळ्याचे साल काढून त्याचा किस करायचा आणि पाण्याने चांगला धुवून निथळत चाळणीवर ठेवायचा )
२= दोन ते तीन हिरव्या मिरच्या
३= १/२ चमचा जिर
४= १/२ वाटी दाण्याचे कूट
५= कोथिंबीर दोन चमचे चिरून
६= दोन चमचे लिंबाचा रस
८= मीठ व साखर चवीनुसार
कृती
१= मिक्सरच्या भांड्यात मिरची , रताळीकिस , जिरे , मीठ , साखर , दाण्याचे कूट , कोथिंबीर सर्व घालून नेहमी सारखी चटणी वाटायची .
२= चटणी अगदी गुळगुळीत वाटू नका जरा रवाळ वाटायची . चटणीवर लिंबाचा रस पिळायचा व चटणी चांगली मिक्स करून घ्यायची .
अप्रतिम लागते चव . तुम्ही कोणाला चवीला चटणी दिली तर ओळखता पण येणार नाही .
ही नवी ,नवी बोला खिरापत कसली ?
चांगला मेनू आहे भोंडल्यासाठी आणि उपासाकरता पण .
जरूर करून पहा .👍
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi YouTube channel
