मंडळी नमस्कार,
पाचव्या माळेकरता आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आहे ललिता पंचमी. रुक्मिणी रुसून येऊन दिंडीरवनात थांबली होती. कोणी एकेकाळी दिंडीरवनात खूप गर्द झाडी होती.हा संकेत मनामध्ये धरून तिला आजच्या दिवशी पुन्हा एकदा पानात बसवली जाते. पानाफुलात रममाण झालेले तिचे हे रूप मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे.
या पोशाखाला ‘वनलक्ष्मी ‘पोशाख असे ओळखले जाते व हा पोशाख फक्त ललिता पंचमी या एकाच दिवशी केला जातो. हा पोशाख करणारे माळी गेल्या अनेक पिढ्यांपासून हे काम करीत आहेत. ही मंडळी पुण्याची आहेत. एकही पैसा न घेता रुक्मिणीची सेवा म्हणून ते हे सर्व करतात. ललिता पंचमीच्या पहाटेला ही सर्व मंडळी देवळात पोहोचतात. तेव्हापासून कामाला सुरुवात होते आणि दुपारी चारपर्यंत ते काम पूर्ण होते. हे सर्व काम पुजारी मंडळींच्या देखरेखीखाली होते. कारण मूर्तीची मापे या माळी मंडळींना सांगायला लागतात. त्याप्रमाणे ते माळा गुंफून हा अत्यंत अनोखा वेश बनवतात.
आजच्या पोशाखात मातेची साडी कणेरीच्या फुलांनी गुंफलेली आहे.चोळी शेवंतीच्या फुलांनी बनलेली आहे. तगरीच्या कळ्यांची जाळी निऱ्यांच्या वरती लावलेली आहे. कंबरपट्टा तगरीच्या कळ्या व सुगंधी गावठी गुलाब यांनी बनला आहे. कानात मासोळ्या आहेत. मासोळीच्या खाली सोन्याची कर्णफुले आहेत. आजचा मुकुट फुलांचा आहे. नाकात मोत्याची नथ आहे. गळ्यात हिरवी चिंचपेटी आहे. मोठा चंद्रहार परिधान केलेला आहे. सोन्यामोत्याचे तानवडे आहेत. मोत्याचा कंठा देखील आहे. हातात गहू तोडे आहेत.
कपाळावर पट्टी बदाम गंध लावलेले आहे. गालावर व हनुवटीवर सुद्धा गंधाचे ठिपके आहेत. दोन भुवयांच्या मध्ये जो बदामाच्या आकाराचा ठिपका दिसतो आहे त्याला’ अक्षत’ म्हणतात. ही अक्षत बनविण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. बुक्का हळद कुंकू आणि केशर पाणी मिश्रित करून ही अक्षत फक्त नवरात्राच्या काळातच लावतात.वनात वास करणाऱ्या बायका पारंपारिक पद्धतीचे कुंकू लावत नाहीत हे लक्षात घेऊन आजचा हा विशिष्ट गंध बनविलेला आहे.
तिच्या आजूबाजूला पोपट विहरत आहेत. मागे तुळशी बन आहे. ती गवतात उभी आहे. कडेला कमलपुष्पे उमलली आहेत. अशी ही वन लक्ष्मी डोळ्यांना गारवा देते.
या विश्वनिर्मातीच्या नैवेद्यात मेतकूट आवर्जून असते. तर पाहूया हे मेतकूट कसे बनवायचे ते.
माझ्या जननीचा आज स्मृतिदिन आहे. या मेतकूटाची कृती तिची आहे. तिच्या स्मृतीदिनी तिचीच मला शिकवलेली पाककृती देताना मला कृतकृत्य वाटत आहे.
मेतकूट
साहित्य
१= चणाडाळ एक वाटी
२= तांदूळ १/२ वाटी
३= उडदाची डाळ १/४ वाटी ( पाव वाटी )
४= दोन चमचे गहू
५ = एक हिंगाचा खडा
६=दोन हळकुंड
कृती
१= सर्व जिन्नस मंद आचेवर गुलबट भाजून घ्यायचे . रंग तपकिरी होवू द्यायचा नाही .
२= हळकुंड खलबत्यात कुटून घेवून , नंतरच मिक्सर मधून बारीक करायचे .
३= हिंग खडा पण कुटून मगच डाळीत टाकायचा .
४= जरा कोमट असतानाच वरील साहित्य मिक्सर मधे बारीक करून घ्यायचे .
५= गरम भातावर मेतकूट , तूप , मीठ ही संगती अप्रतीम लागते .
हे प्रमाण माझी आई कै.सुनीता वैद्य हिचे आहे .
ती मेतकूट मधे मिरची , लवंग , मिरी घालत नसे . वयस्कर व लहान बाळांना सुध्दा ठसका न लागता मेतकूट भात खाता यावा यासाठी ती मसाले घालत नसे .
तिच्या या प्रमाणातील मेतकूट जरूर करून पहा . 👍
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi YouTube channel
सुंदर !!!!
LikeLike