मंडळी नमस्कार,
रुक्मिणी मातेचे नवरात्र पंधरा दिवसांचे असते हे पहिल्या लेखात तुम्हाला सांगितले आहेच. त्यामुळे मातेची विविध रूपे सादर करण्याचे काही स्थानिक संकेत आहेत. त्याची पहिल्यांदा तुम्हाला थोडीशी माहिती देते. चौथ्या माळेला बुधवार किंवा मंगळवार आल्यास रुक्मिणी माता कोल्हापूरच्या अंबाबाईचे रूप घेते नाहीतर तुळजाभवानीचे. पण या तिथीला रविवार आले असतील सरस्वतीचे रूप धारण करते. यावर्षी चतुर्थी रविवारी असल्याने अर्थातच मातेने आज सरस्वतीचे रूप धारण केले आहे. सरस्वती म्हटले की पावित्र्य, ज्ञान. शस्त्र नाही तर शास्त्र सांगणारी देवी. . पांढरा स्वच्छ जरीकाठी मंचकावर आज ती विराजमान असते. मोर हे तिचे वाहन. त्याचे प्रतीक म्हणून तिच्या पाठीमागे मोरपिसे लावली जातात. पार्श्वभूमीला लावलेला पडदादेखील पांढरा शुभ्र असतो. आज तिला मोठ्या काठांची पैठणी परिधान करतात.या पैठणीचा रंग आकाशी किंवा मोरोपंखी असतो. त्यावरती सोनेरी रंगाचा शेला आहे. हे रूप न्याहाळत बसावे इतके देखणे असते. आज ती मांडी न घालता एक पाय वर व एक पाय खाली सोडून सुखासनात बसते. विद्येच्या देवतेने आज काय दागिने परिधान केले आहेत ते आता सांगते.
पहिल्यांदा शिरावरती मुकुट, त्यावरती खड्यांची वेणी, मुकुटाच्या शिरावरती आज सुवर्णाचा हिरेजडित अर्धचंद्र आहे.दोन स्वर्ण पैंजणे मुकुटावरती सुंदररित्या बांधली आहेत.कपाळाला खड्याची बिंदी आहे. बिंदीच्या दोन्हीही टोकांना अतिशय आकर्षक मोर आहेत. जडावाचे दोन कानातले आहेत. त्यालाच लागून दोन मोठी कर्णफुले व सोन्या मोत्याचे तानवळ आहेत. आज तिने गळ्यात हिरव्या रंगाची चिंचपेटी घातली आहे. नाकात पाचू ,माणिक, मोती असलेली ठसठशीत नथ आहे. मोत्याचे मंगळसूत्र आहे . त्याखाली मोठा तन्मणी आहे. त्याखाली मोत्याचा कंठा घातला आहे. नंतर जडावाचे हार परिधान केलेले आहेत. कमरेवरती पेट्यांची बिंदी बांधलेली आहे. खांद्यावर सोन्याची हात सर आहे. दोन्ही भुजांवर आज बाजूबंद देखील आहेत . त्याखाली दोन वाक्या आहेत. हातात शिंदेशाही तोडे आहेत. पायात रूळ पैंजणे आहेत . जडावाच्या हारातले मोठे पदक फारच सुंदर आहे.अशी ही सरस्वती , तिच्या वैभवाने आपले डोळे दिपवते. आजच्या पांडुरंगाच्या रूपाची एक झलक.
नैवेद्यातले श्रीखंड कसे बनते ते आज पाहूया.
श्रीखंड
साहित्य
१= १ लिटर दूध
२= साधारण तीन वाटी साखर( किंवा जितका चक्का होईल तेवढीच साखर लागते )
३=पाच ते सहा केशर काडी
४= वेलचीपूड १ चमचा पाव चमचा जायफळ
५= कातरलेले पिस्ता ,बदाम , काजू एक चमचा भरून
६= किंचीत मीठ
कृती
१= दूध तापवून घ्यायचे ते कोमट झाल्यावर त्याला विरजण लावायचे ( एक चमचा दही दुधास लावायचे . एकाच दिशेने दूध हलवून दह्याचे विरजण लावायचे )
२= दही लागल्यावर ते स्वच्छ फडक्यावर निथळत ठेवा . दह्यातील पाणी निघून गेल्यावर , चक्का घट्ट बांधून ठेवायचा . उन्हाळ्याच्या दिवसात चक्का बाहेर पटकन आंबट होतो . अश्यावेळी मोठ्या गंजात चक्का टांगून फ्रिज मधे ठेवायचा .
३= आता चक्का आणि साखर , थोडी साय ( दोन चमचे ) मिक्स करून जरा वेळ ठेवून द्या . तासाभराने साखर जरा विरघळलेली असेल . त्यात किंचीत मीठ घालून मिश्रण पुरण यंत्रातून श्रीखंड गाळून घ्यायचे .
४= केशर काडी गरम करून ( पळीत ) त्यात दूध घालून खलून घ्यायचे . विरघळलेले केशर , वेलची , जायफळ श्रीखंडात एकत्र
करायचे .
५= आता वरून कातरलेले बदाम , पिस्ता पसरवायचा .
मुलायम श्रीखंड तयार 👍👍
या प्रमाणात सहा ते सात लोकांना श्रीखंड आरामशीर पुरेल .
सौ शुभांगी जोशी
पंढरपूर
Khamang.blog
Khamangbyshubhangi youtube channel
सर्व माहिती श्री चिंतामणी उत्पात यांच्या विशेष सहकार्याने.