

मंडळी नमस्कार,
नवरात्रोत्सवातील श्री रुक्मिणी मातेची विविध रूपे व त्या अनुषंगाने एखादी पाककृती आपण पाहत आहोत आजची ही दुसरी कडी. आज रुक्मिणी मातेने लमाणी , मारवाडी किंवा बंजारा पद्धतीचा पोशाख केलेला आहे. व त्या पोशाखाला साजेसे दागिने तिने परिधान केलेले आहेत.सुखळी माता असा गुजराती पद्धतीचा वेश का धारण करते त्याबद्दल परंपरेत काही अधिकृत उल्लेख किंवा खुलासा नाही परंतु श्री रुक्मिणी पांडुरंग हे लोक देव आहेत त्यामुळे लमाणी समाजाचा हा पेहराव रुक्मिणीने धारण करणे हे अजिबात आश्चर्यकारक नाही. अजून एक संभाव्य खुलासा म्हणजे रुक्मिणी माता ही द्वारकापुरीतून येथे आली आहे. त्यामुळे सोबत गुजराती वेश आणणे आपण लगेच समजू शकतो.ही साडी नेसवायची पद्धत जरा वेगळी आहे. पाच प्रकारच्या जरीच्या छोट्या साड्या घेतल्या जातात त्यांच्या निऱ्या करून त्याचा छान घागरा बनवला जातो.माथ्यावरून जरी काठी ओढणी दिली जाते. त्यामुळे या पोशाखाच्या सोबत मुगुट घातला जात नाही. या दिवशी तिला घातले जाणारे दागदागिने खालील प्रमाणे:
कपाळावर भोर, पेट्यांची बिंदी, खड्याची वेणी, सोन्याचे तानवळे( झुमके), हिरव्या रंगाची चिंचपेटी, नाकात सोन्याची नुसती तार असलेली तीन मोत्यांची नथ, मस्तकावर मळवटावर सोन्याची लाल खडे जडीत चंद्रिका लावली जाते. त्यानंतर मोत्याचा लहान व मोठा कंठा घातला जातो. बाजीराव गरसोळी, मोत्याचे मंगळसूत्र,मोठा तन्मणी,ठुशी , सरी, कर्णफुले, पुतळ्याच्या माळा, तारामंडल, पायात सोन्याचे रुळ जोड, सोन्याचाच पैंजण जोड, हातात माणिक बसवलेले हातसर. द्वारके वरून आलेल्या कृष्णाला तुळस खूप प्रिय असल्याने सोन्याच्या तुळशीची एक विशेष माळ तयार केलेली आहे ती बऱ्याच वेळा घातली जाते. तसेच लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कोल्हापुरी साज देखील बऱ्याच वेळा घातला जातो.
या सगळ्यात महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण दागिना म्हणजे झेला. गळ्यात अडकवायला एक लांब साखळी, त्यात बसवलेला सोन्याचा बटवा आणि त्या बटव्यात काय असेल ओळखा बरे! नाही ओळखू शकणार तुम्ही. आता सांगते काय काय असते ते.
सोन्याचे दात कोरणे, नख कापण्यासाठी खास तयार केलेले यंत्र, कानातील मळ स्वच्छ करण्यासाठी कोरण्या, नाक स्वच्छ करण्याची कोरणी. हे सर्व दागिने गुजरातच्या एका राजाने दिल्याची वदंता आहे त्याचे नाव मात्र कळू शकले नाही.काल आपण नैवेद्याच्या पानातली पुरणपोळी पाहिली . आज आपण पाहूया साखरभात.
साखरभात
साहित्य
१=एक वाटी तांदूळ ( आंबेमोहर , कोलम , तुकडा बासमती )यातील कुठलाही तांदूळ चालेल .
२= दीडवाटी साखर
३=दोन चमचे तूप
४=तीन लवंगा
५=बदाम , बेदाणे , काजू सर्व मिळून दोन चमचे ( मी काप केले बदामाचे)
६=केशरकाड्या पाच
७=छोटा चमचा वेलचीपूड
८= १/२ लिंबू
९= १/२ वाटी नारळाचा चव
कृती
१= तांदूळ धुवून ठेवावेत . साधारण १/२ तास .
एकीकडे गॅसवर दोन वाट्या पाणी पातेल्यात उकळत ठेवायचे .
२=१/२ चमचा तूपावर लवंग परतून घ्यायची . नंतर परत १/२ चमचा तूप त्यात पातेलीत घेवून त्यात तांदूळ परतून घ्यायचा दोन मि साठी . गॅस बारीक करून परतायचे तांदूळ . तोपर्यंत पाणी उकळले असेल हे पाणी तांदूळावर घालायचे . आणि भातात किंचीत मीठ घाला . भात चांगला मोकळा शिजवून घ्यायचा .मी भात शिजतानाच खोबरे त्यात घातले आहे .
शिजलेला भात परातीला पाण्याचा हात लावून मोकळा पसरवून गार करत ठेवायचा .
३= पातेलीत साखर भिजेल एवढेच पाणी घालून गोळीबंद पाक करायचा .यातच लिंबाचा रस घालायचा .
४= लोखंडी पळीत केशर काड्या जरा परतून घ्या . परतल्यावर दोन चमचे दूध घाला व केशर चांगले खलून घ्या .आता पाकात हे केशर घाला , बदामाचे काप पण घालायचे .
५= आता पाकात मोकळा केलेला भात घालायचा हलक्या हाताने एकसारखा हलवून घ्यायचा . मंद आचेवर (मी छोटा तवा पातेली खाली ठेवते ) भात पाच ते सात मिनीट गॅसवर ठेवावा . आता उरलेले तूप पातेलीत कडेने सोडा .चांगला भात मोकळा झाल्यावर त्यात वेलची पूड घालून परत भात दडपून ठेवायचा.
६= पाकातील साखर भात रात्र भर मुरला म्हणजे दुसऱ्या दिवशी खायला फारच झकास लागतो . करून पहा 👍
रूक्मिणीच्या नैवद्यातील हे एक पक्वान्न आहे 🙏
साखरेचे प्रमाण तुमच्या रूचिने कमी जास्त करू शकता .

सौ शुभांगी जोशी
Khamang.blog
Khamangbyshubhangi you tube channel
५ ऑक्टोबर २०२४ .