आज बर्याच दिवसांनी एक वेगळा विषय मांडते आहे. आज आपण आपल्या अनेक पाककृतींचा आत्मा असणारे “काळे तिखट” बनविणार आहोत सुरुवातीला यासंदर्भातल्या काही संकल्पना स्पष्ट करते.
पदार्थांची चव, रुची किंवा स्वाद वाढविण्यासाठी आपण ज्या वनस्पती किंवा वनस्पतीजन्य पदार्थ घालतो ते म्हणजे “मसाले”. या मसाल्यात आपण मिरची घातली की ते होते “तिखट”. आणि मसाला कमी किंवा जास्त भाजला की त्यावर ठरते ते त्याचे काळेपण. मूळ नाव काळा मसाला, मिरची घातली की त्याचे होते काळे तिखट. कमी भाजलेला व मिरचीची मात्रा कमी असलेला किंवा मिरची अजिबातच नसलेला काळा मसाला म्हणजे गोडा मसाला. यातला गोडा हा शब्द त्यामुळे थोडासा फसवा आहे. ही गोडी सापेक्ष आहे.
लागणारे जिन्नस

- मिरची: दोन प्रकारची. ब्याडगी व गुंटूर मिरची. उन्हात चार दिवस ठेवून चांगली वाळवलेली व त्याचे देठ काढलेली
- ब्याडगी मिरची: पाव किलो
- गुंटूर मिरची : पाऊण किलो
- धने एक किलो उन्हात ठेवून वाळविलेले
- तीळ पाव किलो
- मसाला वेलची आठ ते दहा नग ५० ग्रॅम
- खडा हिंग ५० ग्रॅम
- जिरे २०० ग्रॅम
- दालचिनी २० ग्रॅम
- मोहरी १२५ ग्रॅम
- काळे मिरे २० ग्रॅम
- दगड फूल २५ ग्रॅम
- चक्री फूल २० ग्रॅम
- लवंग २० ग्रॅम
- मेथी १०० ग्रॅम
- शहाजिरे ५० ग्रॅम
- जायपत्री २० ग्रॅम
- नागकेशर १० ग्रॅम
- चिरफळ १० ग्रॅम
- तमालपत्र १० पाने
- खोबरे अर्धा किलो
- हळकुंड १०० ग्रॅम
- गोडे तेल अर्धा किलो
कृती
- एक किलो मिरची डेखं काढून उन्हात चार दिवस वाळवायची. मिरची वाळल्यावर ती हाताला चुरचुरीत लागली पाहिजे. एक किलो धने याच पद्धतीने उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. धने पाखडून व चाळून घ्यायचे आहेत.
- प्रथम कढईत तेल घेऊन खडा हिंग तळून घ्यायचा. नंतर हळकुंड तळून घ्यायचे. नंतर खोबरे तेलावर परतून घ्यायचे. खोबऱ्याचे काप किंवा किस करून आपण हे करू शकतो.
- आता क्रमवार उरलेले सर्व मसाल्याचे पदार्थ तेलावर परतून घ्यायचे आहेत. पण हे पदार्थ फार खरपूस भाजायचे नाहीत .
- सर्वात शेवटी मिरच्यांना हाताने तेल लावून कढईत थोडे तेल घालून मिरच्या परतून घ्यायच्या.
- वरील सर्व मसाल्याचे पदार्थ एकत्र करून ठेवावेत पण तीळ आणि खोबरे डंखात वाटायला देताना वेगळे द्यावेत.
- या सर्व मसाल्यासाठी पाव किलो खडेमीठ वापरावे . तेही मसाल्यात घालून डंखात द्यावे.
वरील सर्व प्रमाण माझी नणंद सौ अरुणा काणे हिने सांगितले आहे. तिला तिच्या सासूबाई कैलासवासी मालतीताई काणे (मामी ) यांनी त्यांच्याकडे परंपरेने चाललेले हे प्रमाण शिकविले होते.
काहीजण या मसाल्यात सुंठ, बडीशेप, खसखस, तळलेला कांदा असे बरेच काही घालतात . तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता.





masalyache rup pahun vas gheta yet nasala tari to uttam bhinato ahe….tyat tuze te chulivar bhajanyache kaushalya khup nitnetake ahe…..kalya masalyatale sarva jinnas mihit zale….khup chhan👌
LikeLike