कैरीची तिखटी

काल मी आईला माझे YouTube channel सुरू केल्याचे सांगितले. तिला खूप आनंद झाला. तो व्हिडीओ पाहून नंतर तिने मला आशिर्वाद देण्यासाठी फोन केला. तिच्या बोलण्यातून तिला झालेला आनंद समजत होता. सांदण चांगली जमली आहेत ,समजावून पण चांगले सांगितले आहेस .👍
खरं सांगू का सांदण तिनेच शिकवली, तिचीच रेसिपी, मी त्या परिक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवून पास झाल्याचा आनंद मला होत होता. लगेच पटकन म्हणाली अजून एक पदार्थ सांगते तुला लिहून घे आणि करून दाखव सगळ्यांना. हा कोकणातील उन्हाळ्याच्या दिवसातील पानात डावीकडील खास मेनू. पदार्थ नंतर सांगते आधी त्याची कथा सांगते म्हणाली. मार्च मधे कोकणात कैऱ्या झाडावर धरायला लागतात. आमची शाळा अजून एकदीड महिना पुढे चालू असायची. शाळेत डब्यात न्यायचे ठरलेले मेनू असत. दडपे पोहे, शीरा, थालीपीठ ई..
पण माझी एक मैत्रीण डब्यात एक मस्त तोंडीलावणे आणीत असे. त्या तोंडी लावण्यावर आम्ही तुटून पडत असो. त्याचे नाव कैरीची तिखटी.
त्याकाळी कोकणात दळणवळणाची साधने फारशी नव्हतीच. पाऊस जरी भरपूर पडत असला तरी कातळात पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी,पाणी वाहून जात असे, घरणे नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात विहिरी आटलेल्या. वापरापुरते पाणी जून पर्यंत पुरवायचे. त्यामुळे भाजी वगैरे लावणे शक्य नसायचे. त्यामुळे पानात भाजी हा प्रकार दुर्मिळ. घरचे आंबे भरपूर असल्याने आमरस पानात असायचाच. या दिवसात कामाला गडी माणसे घरात खूप असत. काजू काढणे, आंबे तोडणे, त्याची आढी लावायची. कोकम उन्हात वाळवायचे, सरबत करायची अशी अनंत कामे असत. त्यामुळे घरचीबाई, वाळवण, साठं करण्यात, रस आटवणे, सुपारी सोलून घेणे, अमृत कोकम, गरे तळणे कितीतरी कामात व्यग्र असे. यातून तिला कधी वेळ मिळणार साग्रसंगीत स्वयंपाक करण्यासाठी.
कोकणातील बायका काटकसरीने व उपलब्ध साधनासामुग्रींचा पुरेपुर उपयोग करतात.
पडलेल्या कैऱ्या वेचून त्याची साले काढून कातळे काढायचे ( कातळे म्हणजे कैरीचे पातळ काप ) ते वाळवायचे आंबोशी साठी. त्याचे वाळल्यावर आमचूर करायचे. आपण याच कैरीच्या कातळाची चटणी करणार आहोत. वरील कथन झाल्यावर कैरीच्या तिखटीची तिने साहित्य व कृती सांगितली ती खालील प्रमाणे.

साहित्य

 • एक मध्यम आकाराची हिरवी गार कैरी
 • कैरीच्या फोडी जेवढ्या होतील तेवढाच कढिलींब ( कढीपत्ता )
 • दोन छोटे चमचा तीळ
 • दोन चमचे सुके खोबरे किस
 • दोन चमचे दाण्याचे कूट
 • एक ते दीड चमचा तिखट( लाल मिरचीपूड)
 • एक छोटा खडा गुळाचा
 • दोन चमचे तेल, हिंग, मोहरी, हळद

कृती

 1. कैरी धुवून कोरडी करा. त्याचे साल काढून पातळ चकत्या (फोडी ) करा. साधारण एक वाटी फोडी होतील. तेवढीच कढीपत्याची पाने घ्यायची.
 2. कढईत दोन चमचे तेल घाला ते तापल्यावर त्यात मोहरी, हिंग किंचीत हळद घालून फोडणी करायची\. आता त्यात कैरी व कढीपत्ता घालून चांगले परतायचे. साधारण तीन ते चार मिनिटे. थोडी कैरी मऊ झाली की मीठ व गुळाचा खडा घालून घ्यायचा ( गूळ चवीपुरता घालायचा फार नाही ).
 3. तीळ व खोबरे किस भाजून त्याची पूड करून घ्यायची.
 4. कढई मधील साहित्य मिक्सर मधे घालून चटणी बारीक वाटून घ्यायची.
 5. चटणी बाऊल मधे काढून घ्यायची. ती ओलसर चटणी आपल्याला कोरडी करायचीय थोडी. त्यात तुमच्या आवडीनुसार तीळाचे कूट, खोबरे कूट व दाण्याचे कूट घालून चटणी मिक्स करायची. चव पाहून मिठ घाला. त्यातच लालतीखट घाला व सगळी चटणी चांगली एकत्र करा. तुम्हाला हवी असल्यास परत एकदा मिक्सर मधे फिरवून घेवू शकता.
 6. मस्त सणसणीत लागते ही चटणी. यात साखर,कांदा, आल, लसूण काही लागत नाही. धने जिरे सुध्दा नाही. चटणी ला गोडवा तीळाचा, खोबऱ्याचा एवढाच बास होतो.

मग करून बघा व अभिप्राय कळवा.
माझे khamang YouTube channel जरूर subscribe करा .👍👍👍

https://www.youtube.com/channel/UCAR9_G5C_FxsUNbB-ODizTQ

2 Comments Add yours

 1. डाॅ. अरूण हरके म्हणतो आहे:

  खूप सुरेख रेसिपी, शुभांगी . तोंडाला पाणी सुटल्यास नवल ते काय ?

  Liked by 1 person

 2. सुषमा जोशी म्हणतो आहे:

  अफलातून दिसतंय! करून बघेन नक्की

  Like

डाॅ. अरूण हरके साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.