गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला
वरील ओळींवरून चैत्र महिना व चैत्र गौर यांचे आगमन आपल्या लक्षात आले असेलच. कविता क्रान्ती नावाच्या कवयित्रीची आहे . कवयित्रीचे पूर्ण नाव कळू शकले नाही. तरीही ही चैत्रातल्या खास वातावरणाचे वर्णन करणारी एक उत्तम कविता आहे हे नि:संशय ! लहानपणी आजोळी चैत्रगौरीचं हळदीकुंकू मला एक सोहळा वाटे. वाड्यापुढे सारवलेली अंगणी, अंगणा च्या बाजूला गुलाबाचे व मोगऱ्याचे ताटवे, दारापुढे फर्लांगावर ते बकुळीचे झाड, पांढरा चाफा फुललेला चमेलीचा मांडव फुलांनी बहरून वाकलेला, अबोलीचा तो बहर, आमराईत लागलेल्या असंख्य बारीक बारीक कैऱ्या. या कैऱ्यांचा कच्चा वास. एखादी पसवलेली केळ, तिचा तो लोंगर. हे सर्व वातावरण अगदी मंत्रमुग्ध करीत असे. कोकिळेचे गाणे, भारद्वाजाचा तो घुमणारा आवाज यातून निर्माण होणारे ते दैवी संगीत. या सोहळ्याची नांदी आदल्या रात्री सुरू होई. रात्री तपेलीत हरभरे भिजत घातले जायचे. सकाळी उठून अंगणं सारवली जायची. त्यानंतर हरभऱ्याची डाळ भिजत घातली जायची. मिरची कोथिंबीर निवडून ठेवली जायची. कैऱ्या धुवून त्यांचा किस काढला जायचा. गूळ बारीक करून ठेवणे, जिऱ्याची पूड करणे, ओला नारळ खोवणे … एक ना दोन. अनेक कामांची मालिकाच असायची. पन्ह्यासाठी फुलपात्र धुवून ठेवायची. पळसाची पाने आंब्याची डाळ देण्यासाठी तोडून ठेवायची. संध्याकाळी गजरा माळता यावा म्हणून कळ्यांचा गजरा करून ठेवायचा. या सर्व वातावरणाचा आनंद चालण्या बोलण्यातून मला जाणवत असे. एक गंमत सांगते बर का. “अंगापेक्षा बोंगा मोठा” या म्हणीचा अर्थ मला त्यावेळी अजिबात कळत नव्हता. नटणे म्हणजे साडी नेसणे, गजरा घालणे एवढेच माहित. हळदी कुंकवाला संध्याकाळी छानसा फ्रॉक किंवा परकर घाल असा आईचा तगादा आणि मला मात्र साडी नेसायची असायची, आणि ती सुद्धा नऊवारी. आयत्या वेळेला आईने टाचून दिलेला ब्लाऊज आणि आजीची नऊवारी. अशी माझ्या जामानिम्या ची तयारी. आजी समोर साडी नेसवून घ्यायला उभे राहायचे. साडी नेसून होईपर्यंत ती मिश्कीलपणे हसत राहायची आणि सोबत सूचनांचा भडिमार. साडी ची गाठ आपली आपण मारल्यास ती घट्ट बसते, गाठ समोर मारायची, ताठ उभी राहा सारखी हलू नकोस दोन पायात अंतर घे एक ना दोन. साडी नेसवून ती व सूचना ऐकून मी घामेघूम व्हायचो. मग कुणीतरी चिडवायचे “चार पावले चालून दाखव”. मी मी कॅटवॉक असल्यासारखी सांभाळत कशीबशी चार पावले टाकायची. मध्येच मी ओरडायचे ” आई ! साडीतून माझा पाय दिसतोय पदर का छोटा काढलास ? माझ्या दोन्ही पायांना पिना लाव.” माझ्या सर्व अटींच्या चौकटीत ती साडी लहानपणी कधीच बसली नाही. पण हट्टाचे काय करायचे. केसांचा बॉबकट होता. छोटा पोनी येत असे. त्याला 50 पिना लावून केस चापूनचोपून बसवायचे. त्यावर भलामोठा गजरा घालायचा. गजरा कसा सांगू ? हेअर पिन केसात लावायची, गजरा सेफ्टी पिन मध्ये घालायचा व सेफ्टी पिन हेअर पिन मध्ये घालायची म्हणजे तो गजरा केसावरून पाहिजे त्या कोनात लोंबकाळत अगदी डोळ्यांपर्यंत यायचा. काय ध्यान दिसत असेल ते तुमच्या लक्षात आलं असेलच. हळदीकुंकवाच्या सुरुवातीला मी अत्तर लावणार, मी डाळ देणार, मी पन्ह देणार, ओटीही मीच भरणार असा दांडगा उत्साह संचारलेला असायचा. पण…. हा उत्साह अर्धा ते एक तासभर टिकायचा. मग मग घामाघूम झालेला जीव. काहीवेळेला ओचाच सुटायचा, निऱ्या पायात यायच्या, अंगावर पन्ह सांडायच, हळदीकुंकवाची बोटे अंगावर उमटायची. यालाच अंगापेक्षा बोंगा मोठा, नाचता येईना अंगण वाकडे, वगैरे म्हणायचे हे आज कळते आहे. आज चैत्रांगण काढताना हे सर्व आठवते आहे आणि हसू पण येते आहे.
सप्तशतीच्या पाठात चैत्र अश्विन आणि मार्गशीर्ष या तीन भारतीय महिन्यात कोणकोणत्या रुपात देवी पृथ्वीवर अवतरते त्याचे वर्णन आहे. चैत्रात येते ती नवसृजनाची उद्गाती पार्वती. ती माहेरपणाला महिनाभर घरी येते. तिच्यासाठी केलेले कौतुक रांगोळीच्या प्रतीकातून दाखवले जाते. यालाच चैत्रांगण म्हणतात. या रांगोळीद्वारे चैत्र गौरीचे आपण साग्रसंगीत स्वागत करतो. चैत्रांगण म्हणजे पार्वतीने बरोबर आणलेला जामानिमा व तिच्या स्वागतासाठी आपण केलेली सज्जता यांचे प्रतीकात्मक रेखांकन असते. सर्व स्वागत होते ते निसर्ग तत्वांच्या सान्निध्यात . त्यामुळे त्यांचीही उपस्थिती अनिवार्य असते. आदिम स्त्री तत्वाचा आपण साऱ्यांनी मिळून केलेला हा सामुदायिक गौरवच की!
सायंकाळच्या हळदी-कुंकवाचा पन्हे व आंब्याची डाळ हा खास मेनू. आंब्याची डाळ बनविण्याची पद्धत सर्वसाधारणपणे एकच असली तरी प्रत्येक घरच्या डाळीची चव ही वेगळीच असते. संध्याकाळी सर्व मैत्रिणींकडे हळदीकुंकवाला जाऊन आल्यानंतर बरोबर नेलेल्या डब्यात घरोघरीच्या डाळींचे जे मिश्रण तयार होते त्याची चव तर अवर्णनीय असते!
आंब्याची डाळ
साहित्य
- दोन वाट्या चण्याची डाळ
- एक वाटी काढून केलेला कैरीचा कीस
- दहा ओल्या मिरच्या
- तीन सांडग्या मिरच्या
- एक वाटी खोवलेला ओला नारळ
- फोडणीचे साहित्य
- पाऊण वाटी तेल
- मीठ, साखर, कढीलिंब
कृती
- चण्याची डाळ पाच ते सहा तास आधी भिजत घाला. भिजल्यानंतर निथळत रोळीत किंवा चाळणीवर ठेवा. डाळ पुरण यंत्रातून किंवा मिक्सर मधून अर्धवट काढायची.
- कढईत तेल तापत ठेवा. त्यात कढीलिंब, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, सांडगी मिरच्या, कढीलिंब, किंचित हळद, जिरे मोहरी घाला.
- डाळीत कोथिंबीर, मीठ , साखर, कैरीचा कीस, ओले खोबरे घालून चांगली कालवावी.
- आता फोडणी गार झाल्यावर डाळीवर घालून डाळ एकसारखी करा.
महत्त्वाची टीप:
एक चमचा जिरे, पाव चमचा मेथ्या, अर्धा चमचा खडा हिंग कढईत थोडेसे भाजून याची अबडधबड पूड करावी. ही पूड फोडणीत घालावी म्हणजे डाळ खूपच खमंग लागते. मोठ्या प्रमाणात डाळ करायची असल्यास व ती टिकवायची असल्यास ओल्या नारळा ऐवजी सुके खोबरे वापरा.
खरोखर अतिशय सुंदर !
विवेचनातील भाषाशैली केवळ अप्रतिम. एखाद्या सिध्दहस्त लेखकाला लाजवेल असेच सहजसुंदर, तरीही शब्दसौॆंदर्य अद्वितिय..!! अर्थपूर्ण आणि अलंकारीत..तुम्हा उभयतांच्या प्रतिभेला साजेसेच….!!
LikeLiked by 1 person
Khupach sundar
LikeLiked by 1 person
सध्या देशात कोरोना व्हायरस पसरलेला आहे.
देशभरात कर्फ्यू लागू झाला आहे .आणि सर्वजण घरातच बांधून ठेवल्यासारखे झाले आहे .आणि रोज तीच ती भाजी खाऊन कंटाला आला आहे.आपन पाठवलेली रेसिपी सोपी आहे.आजच आई ला बनवायला सांगतो मी..
छान आहे रेसिपी आपली…
घरचे सर्व जन आंनदी होतिल.
धन्यवाद मैडम..🙏🙏🙏🙏
शुभ सकाळ 🙏🙏🙏
LikeLiked by 1 person
Such beauty… It’s absolutely joyous!
LikeLiked by 1 person
अतिशय मोजक्या शब्दात सुंदर व्यक्तिचित्र व आंबाडाळ रेसिपी वाचताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसत होता सुंदर सुंदर वर्णन अतिशय छान लेख 🙏🙏🙏🙏 वाचल्यावर करून खा वाटतय तोंडाला पाणी सुटले
LikeLiked by 1 person
सुंदर वर्णन
LikeLiked by 1 person
वर्णन खूप छान कोकणात गेल्याासाारखे वाटले.
LikeLiked by 1 person
🙏//shree chaitragauri prasannna // haladi kunku karyakramala upasthit asalyasarakhe vatale khupach sundar lekhanshaili …chaitrangan khupach chan surekh kadhale ahe.ambyachi dal khamang uttam pakkruti🙏👌
LikeLiked by 1 person
खूप सुंदर वर्णन आणि तोंडाला पाणी सुटेल अशी पाककृती 😋😋
LikeLiked by 1 person
खूप छान !आंब्याची डाळ my favourite माझ्या डोळ्यासमोर छोटी शुभांगीताई आणि आणि भोवतालचा सारा परिसर उभा राहिला, सुंदर पाककृती सुरेख सजावट आणि उत्कृष्ट शब्दसौंदर्य असा हा खमंग ब्लॉग!💐खूप छान As usual !👍
LikeLiked by 1 person
अप्रतिम..खूप सुंदर आणि रुचकर, साधी सिंपल अशी ही रेसिपी आहे……आणि हो मॅडम चे विशेष आभार..नवीन रेसिपी साठी..
LikeLike
छान लिहिलय. प्रत्येक प्रसंग जस्साच्या तस्सा मनःचक्षूसमोर उभारतोय. छान आहे लेखन शैली, सहज, सोपी…!
LikeLiked by 1 person
डाळीची रेसिपी सोपी आहे.चैत्र महिन्याचे वर्णन पण छान आहे पण मला रांगोळी आवडली जर शक्य झाले तर आडव्या फरशी वरील रांगोळी चिन्हाच्या /प्रतिकांच्या नावासह लेखरूपात लिहाल का
LikeLike