धपाटे शब्द द्वर्थी आहे. भार पोटावर द्यायचा की पाठीवर हे आधी ठरवावे लागते. आपला ब्लॉग पोटपूजेशी संबंधीत असल्याने आपण धपाटा म्हणजे “महाराष्ट्रात घरोघरी लोकप्रिय असणारा अत्यंत रुचकर व पौष्टीक खाद्य प्रकार” हा अर्थ गृहीत धरून पुढे जाऊयात.
पंढरपूरात देवाच्या पंचामृती अभिषेकाचे पंचामृत पुर्वी तांब्या किंवा कळशी भरून प्रसाद रूपात घरी येत असे. सगळ्यांना प्रसाद वाटून सुध्दा ते उरायचे. त्या पंचामृताचा विनियोग योग्य करता यावा यासाठी पुर्वीच्या महिलांनी या पंचामृती धपाटी चा शोध लावला असावा असा माझा कयास आहे. आमच्या घरात धपाटी हा पदार्थ आक्का नावाच्या आजींनी प्रथम आणला. हा सर्व प्रकार पुन्हा डोळ्यांसमोर आणला माझी मैत्रीण आरती हिने .तीने पाठवलेल्या पंचामृताची धपाटी याची चव अजून जीभेवर रेंगाळत आहे.
आमच्या कडे येणाऱ्या पाहूण्यांना मी ही धपाटी खाऊ घातली त्यांनाही ती फार आवडली. खूपदिवसा पासून याची कृती मैत्रीणी व बहिणी विचारत होत्या. याची कृती खालील प्रमाणे.
साहित्य

- ३ वाट्या ज्वारीचे पीठ, २ वाटी कणिक, १/२ वाटी बेसन
- १/२ वाटी ( छोटी वाटी ) दुध, १/२ वाटी दही, तीन चमचे साखर, तीन चमचे मध, तीन चमचे तूप हे सर्व एकत्र करून पंचामृत करायचे
- १चमचा हिंग, १ चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट, १/२ चमचा ओवा, १ चमचा जिरेपूड, १ चमचा धनेपूड, दोन लहान कांदे किसून (कांदा घातला नाही तरी चालेल ), लसूण १० ते १२ पाकळ्या, भरपूर कोथिंबीर, तीन चमचे तीळ, कोथिंबीर च्या काड्या पण मिक्सर मधून बारीक करून घ्या, आल्याचा तुकडा.
कृती
- पराती मधे सर्व पीठ घ्या. त्यात लसूण, कोथिंबीर काड्या, आल, कांदा हे सर्व मिक्सर मधे वाटून त्याचे वाटण करून घ्या. हे वाटण या पीठात घालायचे. जिरेपूड, धनेपूड, तीळ, ओवा, तीखट, मीठ, हिंग, हळद हे पण पीठात घाला.
- आता आपण तयार केलेले पंचामृत या पीठात घालून हे पीठ छान मळून घ्यायचे. चव बघून मीठ,तिखट घालायचे ठरवा.
- ही धपाटी छान लाटता येतात, तव्यावर तेल सोडून खमंग भाजून घ्या. जर तुम्हाला थापून करायची असली तर थापून सुध्दा धपाटी करा.
- मस्त दाण्याची चटणी, तीळाची चटणी, खरडा, दही, यांतील कश्या ही बरोबर धपाटी खायला चांगलीच लागतात.
- पंचामृत सेवनाचे फायदे तुम्हा सर्वांना माहित आहेतच त्यामुळे वेगळे लिहीत नाही. पण पंचामृताचे धपाटे मात्र जरूर करा.👍
Mastach dhapati nakkich chavishta lagat asanar👌
LikeLiked by 1 person