पंचमी सामाजिक सौहार्द्राची !

फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोले
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले


जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात, धुंद नदीनाले


पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले

गीतकार ग दि माडगुळकर, संगीत व स्वर गजानन वाटवे यांचा. पुर्वी नागपंचमीच्या सुमारास हे गाणे आकाशवाणीवर हमखास लागायचे. वाटव्यांचा सुरेल व भावोत्कट स्वर श्रावणातल्या नागपंचमीचे चित्र डोळ्यांसमोर उभा करायचा. लहानपणी काॅलेजच्या रस्त्यावर किंवा प्लॅटफॉर्मच्या जवळपास गारूडी दिसायचा. यातून येवू घातलेल्या नागपंचमीची चाहूल मिळायची. नागपंचमीचा आईचा खास मेनू म्हणजे खांडवी. जीवतीचा आघाडा व दूर्वा वाहिलेला कागद व त्यासमोर रांगोळीने काढलेला नागोबा. याला दूध, लाह्या, व खांडवीचा नैवद्य दाखवायचा. मग गरमागरम खांडवीवर तुपाची धार धरून आडवा हात मारायचा.
लग्न होवून पंढरपूरला आले. पहिल्या नागपंचमीला मला वेगळाच माहोल पहायला मिळाला. नागपंचमीच्या आदल्या दिवसापासूनच मुली व बायका रात्री रस्त्यावर वेगवेगळे खेळ खेळायच्या. झिम्मा, फुगडी, फेर धरायच्या. मला हे सारे नविनच होते. या सगळ्याजणी त्या दिवशी उपवास करतात भाजका किंवा एकादशी सारखा. त्याला “भावाचा उपवास” म्हणतात. भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा उपास. यावेळी म्हटल्या जाणाऱ्या काही भावपूर्ण ओव्या मला मानसीताई केसकर यांनी सांगितल्या.

॥ माझ्या ग दारावरून रंगीत गाड्या गेल्या
॥ भावान ग बहिणी नेल्या पंचमीच्या सणाला ग ॥
॥ चाट्याच्या ग दुकानी भाऊ बसला गादीवरी ॥
॥हिरवी पैठणी मांडीवरी हरणीच्या लाडासाठी ॥

नागपंचमीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या कमलकाकू मला कासाराकडे बांगड्या भरायला घेवून गेल्या, दुपारी सासुबाईंनी नवीन साडी दिली, थोड्या वेळाने दोघी नणंदा आल्या. येताना मेंदीचे कोन, नेलपेंट एक ना अनेक वस्तु भेट देवून गेल्या. कारण काय तर माझी पहिली नागपंचमी. एकंदरीत पंढरपूर मधील नागपंचमी खूपच उत्साहात साजरी होते. यासाठी खास आलेल्या माहेरवाशीणींचे लाड करायचे, त्यांना मनसोक्त खेळू द्यायचे, खाऊपिवू घालायचे, संध्याकाळी देवळात जायचे. तेथे सभामंडपातही सर्व खेळ खेळायचे. घराजवळ कासारांची खूप दुकान आहेत. चारदिवस तेथे बायकांची अक्षरश: जत्रा असते. पंचक्रोशीतील बायका मुली पण बांगड्या भरायला येतात. गल्ली बोळातून महिलांचे खेळ चालू असताना मुख्य रस्त्यावर मुलांच्या सुरपाट्या रंगतात. रस्त्यावरच चुन्याने मोठमोठे चौकोन रंगवून हा खेळ खेळला जातो. चापल्य, दमदारपणा, व बुध्दीकौशल्य या तिन्ही गोष्टींचा कस लावणारा अत्यंत वेगवान व नेत्रदीपक असा हा खेळ आहे. रस्यावर जाग्या असणाऱ्या या तरूणाईने गल्लीबोळात खेळणाऱ्या महिलांना आपसूकच संरक्षण मिळते. माहेरी जरी खांडवी असली तरी सासरी मात्र पुरणपोळी किंवा दिंड करायची पध्दत.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी देवळात श्री रूक्मिणीपाडूंरगापुढे मातीची गजगौरी मांडतात. गजारूढ गौरीशंकराची मुर्ती हाताने माती कालवून बनवली जाते. यात या विधीचे मुख्य यजमान पाटील तर सर्व बारा बलुतेदारांचा सहभाग असतो. गावातील कुंभार माती आणून देतात. चितारी ( वीणा,मृदुंग पखवाज बनवणारे) मातीचा हत्ती बनवतात. याला लागणारे लाकूड पाटील पुरवतात, तर डोळे म्हणून कवड्या वापरतात. मुर्ती तयार झाली की त्याला कुंची व केवड्याची कलगी घालतात. अश्या प्रकारे सुस्थापित मुर्तीच्या अग्र पुजेचा मान चितारी यांचा. त्यांना पाटीलांकडून मानाचा नारळ दिला जातो. सर्व ग्रामस्थ दिवसभर या गौरीच्या दर्शनासाठी दिवसभर येतात. महालक्ष्मी प्रमाणे याही गौरीला दोरे वाहण्याची प्रथा आहे.

आपल्या गावगाड्यात देऊळ हे एक सांस्कृतीक केंद्र आहे, मुक्तद्वार आहे. घरात जशी आत्मीयता असते तशीच ती देवळातही असते. त्यामुळे सगळ्या माहेरवाशीणी व सासुरवाशीणी मिळून मनोसोक्त खेळ खेळतात. मावळतीपुर्वीय गौरीचे विसर्जन करतात. या विसर्जनावेळी भोई समाज लाकडी पाटावर ही मुर्ती वाहून नेतो. वाजंत्री,जरीपटके, अब्दागिरी, छत्री अशी मोठ्या थाटात मिरवणूक निघते. स्थानिक घडशी समाज वाजंत्री वाजवतो. रस्यात मिरवणूकी पुढे लोणार तालमीतील मुले दांडपट्टा, लेझीम, काठी असे मर्दानी खेळ खेळतात. मिरवणूक पुढे वाळवंटात जाते तेथे कोळी समाज आपल्या नावा पताका व फुलांनी सजवतात. वाळवंटात बुरूड समाज बांबू रोवून झोपाळे बांधतात. हे सर्व मुली व महिलांसाठी असते. तेथेही फुगड्या व इतर खेळ खेळले जातात. शेवटी विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा. गौरी ची कुंची व केवड्याची कलगी मात्र तशीच वाजतगाजत परत नेवून देवळातील महालक्ष्मी पुढे ठेवतात.
मिरवणुकीत खेळ सादर करणाऱ्या वस्तादालाही मानाचा नारळ देतात प्रत्यक्ष खेळ करणाऱ्या ५० ते १०० पैलवान मुलांचे काय? अर्थात त्यांची ही काळजी घेतली जाते. पाटलांच्या वतीने १० ते २० किलो हरभरा डाळ भिजवून त्याची ऊसळ प्रसाद म्हणून द्रोण भरून वाटली जाते. ही आरोग्यदायी प्रथा आजही चालू आहे.
सामाजिक ऐक्य जपणाऱ्या या परंपरा आपण समजून घेतल्या पाहिजेत त्यात डोळसपणे वेळोवेळी कालसुसंगत बदल ही केले पाहिजेत व या बदलांसह त्या जतनही केल्या पाहिजेत नाही का ? 🙏🙏
इतके वाचल्यावर भूक लागणे स्वाभाविकच आहे तर बघुयात खांडवीची व पातोळी यांची कृती व साहित्य ……….

खांडवी

साहित्य

 • १ वाटी तांदूळ रवा,
 • १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ,
 • अर्धी वाटी नारळ खोवलेला,
 • ४ लवंगा, छोटा तुकडा आल्याचा किसलेला, मीठ, २ चमचे तुप ,जायफळ

कृती

 1. रवा दोन चमचे तुप घालुन गुलबट भाजून घ्यायचा.
 2. तोपर्यंत पातेलीत ३ वाटी पाणी घालून उकळत ठेवायच. पाण्याला आधण आले की त्यात खोवलेला नारळ, गूळ, लवंग, आलं, किंचीत मीठ घालायच.
 3. उकळलेल्या पाण्यात रवा घालायचा. एकसारखा ढवळावा लागतो.गुठळी होवू द्यायची नाही. दणकून वाफ आणा.
 4. ताटाला तूप लावून ठेवा. आता पातेलीतील शिरा ताटात पसरवा वरून खोबर भूरभूरा. वड्याकापून गार करत ठेवा, गार झाल्याल्यावर तुपाबरोबर स्वाद घ्या. केशर घातले तर रंग ही छान येतो.

पातोळे

साहित्य

 • नारळाचा चव
 • गूळ, वेलची पूड, जायफळपूड,खसखस भाजून केलेली पूड
 • तांदूळ पिठी, तूप( साजूक ) मीठ, चमचा भर तेल
 • चार हळदीची पाने

कृती

 1. मोदकाच्या सारणाप्रमाणे सारण तयार करायचे. ( नारळाचा चव, गूळ एकत्र करून शिजवायचे, शिजत आल्यावर त्यात वेलची, जायफळ पूड घालायची. खसखस पूड ही घालायची. नंतर सारण गार करत ठेवायचे.
 2. एक वाटी जर तांदूळ पिठी असेल तर तेवढे पाणी पातेलीत आधण म्हणून ठेवायचे. उकळी आल्यावर त्यात मीठ व तेल ( चमचा भर ) घालायचे.
 3. आता तांदूळाची पिठी आधणात घालून दणकून वाफ आणायची. मोदकाच्या उकडी सारखीच उकड काढायची.
 4. उकड चांगली मळून घ्यायची
 5. हळदीची पाने स्वच्छ घुवून कोरडी करा. पानाला तूप लावा व आता उकडीचा गोळा पानावर पसरवायचा ( पाण्याचा हात लावून उकड पसरवा ).
 6. पानाच्या अर्धा भागावरच सारण भरायचे व उरलेल्या अर्धा भाग त्यावर दुमडायचा.
 7. चाळणीला तेल लावून एक एक पाने त्यावर ठेवायची. मोदका प्रमाणेच चाळण पाण्याच्या आधणावर ठेवून उकडवून घ्यायचे. थंड झाल्यावर वरची पाने काढून टाकायची.
 8. तूप घालून खावे. हळदीच्या पानाच्या रेषा व सुगंध पातोळीला अप्रतीम येतो.
 9. अश्याच प्रकारे तिखटमिठाचे पातोळे पण करतात.
 10. काकडीच्या किसात हिरवी मिरची, कोथिंबीर,आले ,जिरे , मीठ घालून हळदीच्या पानावर लावून वाफवायचे .

विशेष आभार : श्री आशुतोष बडवे .

5 Comments Add yours

 1. Jayashri jagtap म्हणतो आहे:

  छान माहिती

  Liked by 1 person

 2. Hemant Kulkarni म्हणतो आहे:

  खांडवी आणि तुपाची तांबली जन्मोजन्मीचे नाते हं,
  हळद जशी केळ ताईची पानांमधील लाडिक बहीण गं

  गूळ-खोबरे, रवा फर्मावून सुगंध दरवळे पंढरपुरी कां?
  सारेजण देऊया शुभांगीस मनःपूर्वक धन्यवादच नां !!

  हेमंत कुळकर्णी
  (झटपट गदिमा)

  Liked by 1 person

 3. अमृता मोडक (स्मिता केळकर) म्हणतो आहे:

  नागपंचमी साजरी करण्याच्या पंढरपुरातील पद्धती वाचून खूप मजा वाटली आजही बायकामुले खेळ खेळतात का ?तू या सर्वांचे वर्णनही खूप छान केले आहेस डोळ्यासमोर सगळे चित्र उभे राहिले प्रक्षाळ पूजेबद्दल चा लेखही छान माहितीपूर्ण आहे पाककृती तर तुझा हातखंडा आहे अशीच छान छान माहिती देत रहा

  Liked by 1 person

 4. मीनाक्षी देशपांडे म्हणतो आहे:

  व्वा श्रावण गौर वर्णन वाचून गौर निघाली बडवेची इथवर अली चल पोचली ती घाटावर थांब अजून उत्पात ची येते मग ती पण पाहू इ इ चर्चा गमती लगबग आठवली , शुभांगी

  Liked by 1 person

 5. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

  patole nakki karun baghen.baki donhi jinnas mastach samajik panchamiche varnan mahiti chanach

  Liked by 1 person

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.