सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर ह्रदयी माझे ॥
अशी आस धरून हजारो भाविक प्रतिवर्षी पंढरपूर ला येतात. आषाढी कार्तिकीत ही भाविकांची संख्या काही लाखांपर्यंत जाऊन पोहचते. लाखो भावीक व दर्शनाचे तास मात्र दिवसात चोवीसच. मग देव ही जास्तीत जास्त भक्तांना दर्शन व्हावे म्हण कंबर कसतो. एकादशीच्या मुख्य दिवसाच्या आधी देवाचे नवरात्र बसते म्हणजे देव आपले नित्योपचार व निद्रा यांचा त्याग करून जवळपास चोवीस तास दर्शन देण्यास उभा ठाकतो. मंदिरात गर्भ गृहाच्या डाव्याबाजूस देवाचे शेजघर आहे त्यात असलेला पलंग या दिवसात काढला जातो. या नऊ दिवसात देव फक्त सकाळी स्नान करतो व संध्याकाळी दिवसभराचा शीण घालवण्यासाठी श्रीचरणी गरम पाणी घालून लिंबु सरबताचा नैवद्य दाखवतात. क्षारसंजिवनीच्या वापरालाही काही शतकांची परंपरा आहे .😊
हे देवाचे एक प्रकाराचे व्रतच म्हणायला हवे. या देवाच्या जास्तीच्या कामाच्या व्रताची सांगतां होते ती प्रक्षाळपूजेने.
नऊ दिवस देवाच्या पाठीमागे लोड लावून ठेवतात,देव थकेल म्हणून हा लोड आधारासाठी.
पांडूरंग थकतो म्हणून त्याच्याचसाठी ही पूजा. त्याचा ‘ शिणवटा काढणे ‘ म्हणतात. कालच्या रात्री देवाला सुगंधी तेलाने मालीश करतात, आपादमस्तक त्याला तेलाने चोळतात. हे तेल मंदिरात बनवतात. याला उदवलेल तेल म्हणतात. या रात्री देवाला फक्त पांढरे धोतर नेसवतात.
प्रक्षाळपूजेचा दिवस पंचांग बघुन ठरवतात. मुहूर्त काढतात. या दिवशी गावातले सर्व लोक देवाच्या पायाला लिंबू साखर लावतात. आता मात्र चांदीच्या पादुकांवर पिठी साखर लावायला परवानगी आहे. सकाळी ११ वाजता पहिले पाणी देवाला स्नानाला घेतात. थकलेल्या देवाला गरम पाण्यामुळे आराम मिळतो. हे पाणी देवळात गरम केल जाते.
२.३० वाजता दुपारी महाअभिषेक संपन्न होतो.
” हरीहरा नाही भेद ” या उक्ती प्रमाणे शंकर व विष्णू यात भेद नाही. म्हणून चारही शाखांचे वैदिक आंमत्रीत केले जातात व चौखांबी मंडपात बसून रूद्र म्हटले जातात.देवाला दुधाचा अभिषेक गाईच्या शिंगातून केला जातो. २५ ते ५० लिटर दूध लागते. तोपर्यंत संपूर्ण परिवार देवळांना पण गरम पाळण्याने स्नान घातले जाते. यात्रा काळात देऊळ अस्वच्छ होते म्हणून देऊळ पण धुतले जाते. तसेच रूक्मिणीस पण दुधाचा अभिषेक केला जातो. रूक्मिणी पण दमलेलीच असते मग तिला लिंबू पाण्याने आंघोळ घातली जाते. अंग चुरचूरेल म्हणून परत दुधाचा अभिषेक व केशर पाणी घातले जाते. तिथे पवमान म्हटले जाते.
आता विठ्ठलाला जरीकाठी पोशाख व अलंकार घालतात.
दुपारी पाच वाजता नैवेद्य दाखवला जातो.यात पाच पक्वान्न असतात. पूरणपोळी, खीर, श्रीखंड, करंजी, साखरभात, अळुचीभाजी, कढी, भजी, बटाटा भाजी, वरणभात, दही, पापड, चटणी, पंचामृत, पुरी. देवावर अवलंबून जेवढे लोक आहेत , म्हणजे जे लोक वारी घालतात, तेवढे सगळे जण हा नैवेद्य पांडूरंगाला दाखवतात.
देवाचे रूप पाहण्यासारखे असते. ७ वाजता संध्याकाळी धूपारती जाते. त्यावेळेस अाटीव केशरयुक्त व बदाम , पिस्ता, काजूयुक्त दुधाचा व पेढ्याचा नैवेद्य दाखवतात. गावातील भाविक पण हा नैवेद्य दाखवतात.
रात्री शेजआरतीनंतर देवाला औषधी वनस्पतींचा वापर करून बनवलेला काढा दिला जातो. हा काढा देवळातच बनवला जातो. मला याची फारच गंमत वाटली. देव थकला आहे मग त्याचा शिणवटा काढायला नको का ?
शेजघरातील काढलेला पलंग परत स्वच्छ व चकचकीत करून ठेवला जातो ( चांदीचा). गादी, खोळ, पलंगपोस सर्व काही नविन घातले जाते.
शेजआरतीत काढ्याबरोबर शिरा, डाळ, खोबरं याचाही नैवद्य दाखवतात.
आता आरती झाली की देव सुख निद्रेसाठी शेजघरात जातात. तिथेच देवाजवळ हा काढा ठेवला जातो रात्रभर. काकडा झाल्यावर हा काढा भावीक प्राशन करतात.
शिणवटा काढायचा सोहळाच असतो. पंढरपुरातील चातुर्मास प्रक्षाळपूजा झाली की दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो. गावात भागवत, गाथा हे सर्व कार्यक्रम सुरू होतात. पुण्याचे भावीक माळी देवाचा व रूक्मिणीचा गाभारा रात्रीत फुलांनी सजवतात. जणू इंद्राचा दरबार, स्वर्गाचा भास होतो. मन व डोळे तृप्त होतात.
मला खूप कुतुहल वाटत होत की काढ्यात काय जिन्नस असतील. मला सगळी यादीच मिळाली. ती आपल्याला सांगते , देवाचा शिणवटा काढण्यासाठी हा काढा वापरतात तर आपण पण ही का करू नये ? चला करूयात.
वरील प्रमाण मोठ्या प्रमाणात करायच्या काढ्याचे आहे. ३ ते ४ चार लिटर पाण्यासाठी
साहित्य
- ७५० ते १ किलो गुळ
- गवती चहा ४० काड्या
- तुळस १५ काड्या
- सुंठ ५० ग्रम
- मीरे बारीक केलेले २ चमचे
- दालचिनी २ ते ३ काड्या
- लवंग १०
- वेलदोडे १०
- काजू, बेदाणे १०
- लेड पिंपळी
- जायफळ १
- जेष्ठमध ५०० ग्रम
- बदाम
- शेंदेलोण, पादेलोण, केशर,शहाजिरे, साधेजिरे, खारीक, खडीसाखर

कृती
क्रमांक ४ ते १२ पर्यंत वस्तु सगळ्या बारीक पुड करून घ्यायच्या. आधी पाणी पातेलीत उकळत ठेवायचे, मग त्यात गवतीचहा, तुळस घालायची. उकळी यायला लागली की वरील जिन्नसाच्या पुड्या घालायच्या. मग गूळ, मीठ घालून एक उकळी आणायची. मग काढा गाळून प्यावा.
वर दिलेल प्रमाण हे देवळातील मोठ्या प्रमाणातील आहे. आपण निम्मे करून हे प्रमाण घरी करूयात चला.
हा काढा पीऊन आपण ही रोगमुक्त व ताजेतवाने होवू यात.
या लेखासाठी सर्वश्री आशुतोष बडवे व विवेक बडवे यांचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे . त्यांचे आभार !!

Adabhut
mahiti
LikeLiked by 2 people
व्वा मस्त उपाय घरगुती सगळं साहित्य उपलब्द आयर्वेदीक हि करून पाहूया
LikeLiked by 2 people
भारी आहे हे। प्रक्षालपूजा माहित नव्हती।
देवाला जेवायला फारच बाई उशीर करतात😂
काढा मस्त
LikeLiked by 2 people
खूप छान ,देव दमतो ही कल्पनाच भन्नाट आहे.
LikeLiked by 2 people
ख्रिस्ती धर्मात वर्णिलेला त्यांचा देव सतत सात दिवस जगाची घडण करून थांबला. म्हणजे दमून विश्रांती घेण्यासाठी नव्हे. त्याच्या मनाप्रमाणे ते पूर्ण झाले म्हणून. पुढे त्याने ‘माणूस’ म्हणून बनवलेला बुद्धिनिष्ठ प्राणी त्याची भक्ती करत असतो -पंढरपूरच्या विठ्ठलाची करतात, त्याप्रमाणे. त्यांना वाटण्यात येणाऱ्या प्रसादाचे प्रकार माणूसच निर्माण करत असतो व ते लाडू-जेवणांपासून भारतातील देवळांत विविध प्रकारचे असले तरी ‘तीर्थ’ हा हिंदूंचा प्रसाद अक्षरशः त्या देवाला दूध-मध वनस्पतींमधील अर्क ‘फुले आणि पाने’ व क्षीर (पवित्र मानलेले पाणी) इत्यादी वाहून एकत्र केलेले ‘अमृत तुल्य’ पेयच असते. लाखोंच्या संख्येतील भक्तांना ते ‘पळीभर’ देणे -हे व्यवहाराचे झाले. आपले पूर्वज ऋषी-मुनी हे कंदमुळे व वनस्पतींच्या फळा-पानांचे गुणधर्म ओळखून असल्यामुळे ती परंपरा आयुर्वेद म्हणून आजदेखील जिवंत आहे व म्हणून सदर कृतीतील ‘गवतीचहाचा काढा हे एक चविष्ठ पेय म्हणून निर्माण करण्यात औचित्याचे ‘दर्शन’ घडून रखुमाई देखील आनंदून जाईल. साथींच्या दिवसात घरी येणाऱ्या पाहुण्यांस चहा-कॉफी ऐवजी असे गरम पेय दिल्यास इतर वेळेस देण्यात येणाऱ्या ‘बदाम-केशर-दूध-साखर’ असे जीवत्यांपुढे ठेवत असलेल्या पेयापेक्षा अधिक चांगले. म्हणूनच मला ‘खमंग’ ची प्रस्तावना आणि कृती -एक उच्य दर्जाचा साहित्य प्रकार मानवासा वाटला. शिवाय कथन केलेली देवळाची चातुर्मासापासून चालत असलेली साग्रसंगीत माहिती व पार्श्वभूमी ज्याचा देवावर विश्वास नाही -त्याला देखील अचंबित करून जाईल. धन्यवाद!
हेमंत कुळकर्णी
अमेरिका
LikeLiked by 2 people
तुझे पदार्थ जितके छान असतात ना तितकेच शब्दांकन
मस्त
😊👌💐
LikeLiked by 2 people
फारच छान. अशा कितीतरी गोष्टी आपल्या पर्यंत पोचते नसतात.
धन्यवाद तुम्ही ही रेसिपी आमच्या पर्यंत पोहोचवली. सुरेख वर्णन 🙏🙏
LikeLiked by 2 people
shinavatha kadhayacha kadhyane wa chanach kruti
LikeLiked by 2 people
Good
LikeLike