स्मोकी आंबा पन्हे
विचीत्र वाटतय ना एेकायला ,पण चव मात्र अफलातून लागते. हा सर्व प्रयोग मी स्वतः केला आहे. सहज विचार आला कैरीचे पन्हे आपण भाजून करतो मग पिकलेल्या आंब्याचे करून बघायला काय हरकत ?
लगेच कामाला लागले. पूर्ण सुरकुतलेला पिकलेला आंबा न घेतां आढीतला कमी पिकलेला आंबा घेतला. चला साहित्य व कृती बघूयात.
साहित्य
- एक आंबा ( खूप पिकलेला नको )
- जीरे पाव चमचा, तीन दाणे काळीमिरी, पुदीना पाने चार ते पाच, मिरची एक ( बेताचीच तिखट पाहिजे )
- गुळाचा छोटा खडा किंवा साखर ( चव बघून प्रमाण घ्यायचे )
- अर्धे लिंबाचा रस, मीठ चवीनुसार
- एक ग्लास गार पाणी
कृती
- गॅसवर जाळी ठेवा ( पापड भाजतो ती ) व त्यावर आंबा भाजायचा. भाजताना देठाकडून चिक बाहेर पडेल. चांगला काळे डाग सगळीकडून पडतील इतका भाजायचा.
- आंबा भाजून गार झाल्यावर त्याची साल हलकेच काढून टाकायची. आता गर काढून घ्यायचा व बाठ टाकून द्यायची.
- मिक्सर मधे आंब्याचा गर, चव बघून गूळ अथवा साखर, मीठ, पुदीना पाने, मिरची तुकडा, जिरेपूड या सर्व गोष्टी गार पाणी घालून फिरवायच्या.
- पातेल्यात चाळण ठेवून ( सूप , सार गाळायची ) त्यावर हा रस गाळून घ्या.
- ग्लास मधे बर्फाचा खडा घाला मग हा रस त्यावर घालायचा. वरून चव बघून लिंबांचा रस घालायचा.
- चविष्ट स्मोक्ड पन्हे तयार.

फायदा असा आहे की साखर किंवा गूळ अतिशय कमी लागते व एक भाजक्या आंब्याचा विशिष्ट वास पन्ह्याला छान येतो त्यामुळे मजा येते पिताना.
बघा करून. माझी कल्पना आवडली का ते जरूर कळवा.
हापूस आंब्याचा मोरंबा
पाकात मुरवून ठेवलेल्या पदार्थास त्या फळाचा मुरंबा म्हणतात.
साहित्य
- पाच आंबे पिकलेले. पण फार सरूकुतलेले पण नको, कारण फोडी करताना रस निघतो व फोडी पण चौकोनी होत नाहीत.
- साखरेचे प्रमाण सोपे आहे. एका कुंड्यात फोडी करून ठेवा जेवढा कुंडा फोडींनी भरलाय तेवढीच साखर घालायची. कुंडा ( बाऊल ) तुम्ही जे भांड घ्याल त्या प्रमाणे.
- चार ते पाच लवंगा.
कृती
- प्रथम आंबे सोलून घ्या. मग त्याच्या एकसारख्या फोडी करा.
- कुकर मधे एक शिट्टी द्यायची फोडींना.
- तोपर्यंत पातेलीत साखर बुडेल इतकेच पाणी घालून पाक करत ठेवायचा. पाक गोळीबंद करायचा.
- काचेच्या बशीत पाणी घाला. पाक झालाय की नाही हे कळण्यासाठी पाकाचा एक थेंब बशीत घाला . तो थेंब विरघळला नाही व घट्ट होउन टणक गोळी सारखा झाला म्हणजे आपला पाक गोळीबंद झाला. जर पाक कच्चा असेल तर पाकाचा थेंब पाण्यात पसरेल , विरघळेल.
- वाफवलेल्या फोडी गार करून घ्यायच्या. मोरांबा करायच्या वेळेस फोडी सकाळीच वाफवून ठेवा व दुपारी पाक करून त्यात घाला.
- पाकात फोडी घातल्यावर पाक एकदम पातळ होतो. दोन ते तीन उकळ्या आल्यावर गॅस बंद करायचा.
- या सर्व क्रियेत कुठेही पाणी लागू देवू नका ,कारण आपल्याला टीकावू करायचा आहे मोरांबा.
- पूर्ण मोरांबा गार झाल्यावरच स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचा ( बरणी आधीच धुवून कोरडी करून ठेवा ).

मला आठवते आई याला दादरा बांधून ठेवी. माहेरी पाऊसाचे प्रमाण फार होते त्यामुळे ही सगळी खबरदारी तिला घ्यावी लागे. नाहीतर बुरशी आलीच समजा.
श्रावणात या मोरंब्याचा थाट भारीच. श्रावणीसोमवार, शनिवार, मंगळवार, या दिवशी उपास सोडायला गोड पदार्थ म्हणून याचाच मान. पटकन पाहुणे आले तरी वाढावयास हातचा सहज उपलब्ध पदार्थ.
या सर्व सुचना २७ वर्षा पुर्वी आईने लिहून दिल्या आहेत. तेंव्हा मोबाईल नव्हता व काॅल बुक करावा लागे, मग लिहून आणलेल उपयोगी पडत असे. पण आजही त्याचा तितकाच उपयोग होतोय. आता मुली पटकन फोन करून विचारतात, नाहीतर गुगल काका आहेतच.
पण काही वेळा जुन्या डायरीवरून नजर फिरवताना मन व त्या पानांचा स्पर्श सुध्दा सुखावतो नाही का ?
Ekdam bhaari….navin prayog.mastch.
LikeLike
Mastach👌
LikeLike