कोयाडं

नावावरून कोईचा काहीतरी विचीत्र प्रकार असणार अशी माझी पूर्ण खात्री होती. पूर्ण मे महिना कोकणात आजीकडे लहानपणी सुट्टीत जायचो. भरपूर आंब्याची, फणसाची, नारळ , कोकम, यांची झाडे अवतीभोवती होती. परत लागात मामाने ८०० कलमं हापूस आंब्याची लावलेली, त्याच्या सोबत काजूची पण झाडे. केळी तर परसदारी होत्याच. विहिरीजवळ चमेलीचा मांडव, कडेला अबोली, गावठीगुलाबाची झुडूपे, कातरलेली जास्वंद, पांढरा व लाल चाफा. थोडे पुढे आत्याचं घर तिच्या दारात बकुळीचा वृक्ष पसरलेला.

आमच्या कवाडीच्या बाहेर पिस्त्याचे झाड होते त्याच्या पानावर छोटीशी बीयावजा फळं असतं….. ती वाऱ्याने पडतं, ती गोळा करून सोलून आम्ही खात असू . जांभाचे झाड सुध्दा याचं दिवसात बहरायचे, लागात जाताना करवंदाच्या जाळ्या असत.
आजीची खास परसबाग होती छोटीशी त्यात तीचे खास वांईग ( वांगी) रोप लावलेल असे. मीरची चे झाड, भोपळ्याचा वेल ई. डाळवांग करण्यासाठी जणू त्याचे नियोजन कायम असे.

तिथेच पुढे चूल होती पाणी तापवण्यासाठी . त्यावरती एक मोठी तपेली कायम असे. त्या खाली कायम लाकूड सारलेले असे. त्याजवळ एक दगडी द्रोण पाण्याने भरलेली असे. पाचपावलावर मोठी विहीर. विहीरीला रहाट होताच त्यातून पाणी शेंदायला फार मजा वाटायची. पुर्वी मी बैलरहाट पण पाहिलेला आठवतोय. बैलांच्या गळ्यात नाजूक घुंगरू बांधलेले असायचे ते बैल गोल फिरायला लागले कि त्या घुंगरांचा सुंदर नाद यायचा. छोट्या छोट्या लोट्यातून पाणी वर यायचे ते पन्हाळीत खाली पडताना बघण्याचा छंदच लागायचा.

दुपारच्या वेळेत आजोबा जूना पत्र्याचा डबा हातात देत व एक काठी कारण या शांत वेळी वानर सेना हल्लाबोल करत. मग काय आंबा म्हणू नका, केळी, जांभ वाट्टेल ते हाती लागेल त्यावरती आक्रमण व नासधूस .म्हणून आमच्या हाती काठी व पत्र्याचा डबा. मग आमची बच्चे टोळी डबा वाजवीत त्यांना हाकलून देण्यासाठी मैलभर पळत सुटायचो.

मला आई खास तपकिरी पेटीकोट शिवत असे कारण करवंद खायची हात पेटीकोटला पुसायचे, करवंद काढताना जाळीतले काटे लागले की रक्त हमखास यायचे, केळीच्या सोप्यात बकुळीचा गजरा गुंफायचा मग केळीची डाग लागणारच, कोकम खायचे, काजू चे डाग, अंगणात लालमाती त्यावर खेळणार, चीऱ्यांवर बसणार, एक ना दोन किती गोष्टी या पेटीकोटने व मी रंगवल्या आहेत.

संध्याकाळच्या ४ ते ५ या दरम्यान रिक्षेतून गावात नाटकाची जाहिरात केली जात असे. जाहिरात करताना रिक्षेतील माणूस कागद भिरकावीत असे ते पकडण्यासाठी आम्ही रस्त्यांनी पळत सुटायचो. संध्याकाळ झाली की आजोबांसोबत गोठ्यात जायचे, ते धारा काढी, गडी पण होता पण आम्ही कंदील धरायला जात असू. दूधं काढून झाली की झोपाळ्यावर बसून रामरक्षा स्तोत्र, पाढे, मारुती स्तोत्र, ईत्यादी म्हणत असू.तोपर्यंत खरच डोळे जड होत असतं दिवसभर उनाडक्या केल्यावर काय होणार? भूक तर लागलेलीच असे मग नेहमीचा प्रश्न आई भाजी काय केली आजीने? मग आई सांगायची कोयाडं व गरमागरम भात जेवा.

झाले……… माझी कुरकुर सुरू. आजी चांगली नाही, काहीतरी भाज्या करते. कोईची कधी भाजी करतात ? आजी पडलेल्या आंब्याचे कातळे काढून आम्हा नातवंडांना द्यायची. मला राग यायचा .माडीवरती मोठ्या आंब्याची आढी लावलेली असे त्यातला आंबा का नाही कापून देत. आई म्हणायची तो आंबा काय नी हा आंबा काय खायला फोड गोड लागतेना निमुट खायचं. ते आंबे व्यापारा साठी होते म्हणून आजी हे करत असे पण ते वय या गोष्टी समजण्याचे नव्हते पटकन राग येत असे.
तर कोयाडं म्हणजे काय ? हे समजून घेताना कथाच सांगत बसले .काय करू आठवणी येतातच ना.
कोयाडं म्हणजे रायवळ आंब्याचा केलेला एक प्रकार. भाजी नसली तर वेळ निभावणारा पण रुचकर प्रकार.

साहित्य

 • ६ रायवळ (लिटीचे) आंबे पिकलेले
 • तीन चमचे तेल व फोडणीचे साहित्य
 • दोन चमचे गूळ
 • १/२ चमचा मोहरीची पूड
 • चवीनुसार मीठ व तिखट

कृती

 1. आंबे धुवुन घ्या, पातेलीत आंबे ठेवा व आंबे बुडतील एवढे पाणी घालून गॅस वर उकळत ठेवा. सालीला मऊ पणा व सालीचा रंग बदलला कि गॅस बंद करायचा. आता टोपलीत आंबे निथळत ठेवायचे व चांगले गार होऊ द्यायचे.
 2. एका कढईत तीन चमचे तेल घ्या ते तापले कि मोहरी, हिंग व हळद याची खमंग फोडणी करून ठेवा. यात कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची काही लागत नाही.
 3. आंबे गार झाले की आंब्याची नुसती साल बाजूला काढा व बाठ गरा सकट बाजूला ठेवा. सालीतील रस काढून घ्या, मग त्यात गूळ, मीठ, तिखट चव बघून घाला. जर आंबा आंबट असेल तर गूळाचे प्रमाण वाढवा.
 4. कढईत फोडणी मधे बाठी घालायच्या व सालीतील रस पण त्यावर घालायचा व एकच उकळी आणायची.
 5. १/२ मोहरी पूड पाण्यात दोन तास भिजवून ठेवा नंतर रवी ने चांगली घुसळा. मग ती वरील कोयाडं मधे मिक्स करा. छानच वास व चव येते कोयाडं ला.
 6. आपले कोयाडं तयार आहे.

चविष्ट लागतेच.
पण करायलाही सोपे व थोड्या जिन्नसात.
रायवळ आंबा नसेल तर इलाज नाही मग तुम्ही दुसऱ्या आंब्याचे करू शकता.
करून बघा व अभिप्राय कळवा

5 Comments Add yours

 1. Prajakta khadilkar म्हणतो आहे:

  Navin mahit nasleli receipe mastach.koyadacha flashback vachun khup chan vatale.

  Like

 2. Hemant Kulkarni -USA म्हणतो आहे:

  यालाच ‘बाठोणी’ म्हणतात, असे लहानपणी ऐकल्याचे स्मरते. रायवळ आंबा आंतील गरापेक्षा त्यामधील पातळ रसासाठी चोखून खाण्यात रंगत लागते. या कारणासाठी, बाठोणी करतांना दोन रायवळ आंब्यांसोबत एक पिकलेला हापूस आंबा वापरण्याची पद्धत कोंकणातील आमच्या गांवी होती. हे सर्व एकत्र केल्यानंतर चव घेऊन अनुभवायचे असते व मग गूळ किती वापरायचा ते ठरवले जाई. मग एखाद्यास मधुमेह इत्यादी असल्यास आजीला कसरत करावी लागे. आंब्याच्या कोयी (बाठा) शिजवल्या असल्या तरी त्या ‘खायच्या कश्या’ हा प्रश्न मलादेखील भंडावून सोडी व मी त्यांच्या वाटेस जात नसे. अजूनही बाठा खाता येतात कां? -हे माझ्या मनांतील शल्य कायमच आहे. जर त्या देखील खायच्या हे खरे असेल, तर ‘शहाळे’ देखील संपूर्णपणे खाता येण्याची पाककृती संभवते. माझा नवीन सिद्धांत: आंबा म्हणजे कल्पवृक्ष.

  हेमंत कुळकर्णी
  अमेरिका

  Liked by 1 person

 3. Sujata yadgiri म्हणतो आहे:

  Navnavin padartha kaltat, Chan vatate.

  Like

 4. manasee म्हणतो आहे:

  उन्हाळी सुट्टीतल्या कोंकणाचं शब्दचित्र आणि त्या बालपणच्या जीवात भिनलेल्या आठवणी… किती सुंदर वर्णन केलंयस शुभांगी!

  कोयाडं गेल्या कित्येक वर्षांत – दशकांत – खाल्लं नाही… आजोबांनी रत्नागिरी सोडली तेव्हापासून रायवळ आंबे देखील विषेश हाती नाही लागले कधी…

  नेहमीप्रमाणेच उत्तम रेसिपी आणि सोबतीला सुरेख फोटो आणि वर्णन! तोंडाला पाणी सुटले अगदी!☺️

  Liked by 1 person

 5. manasee म्हणतो आहे:

  *विशेष

  मराठी टायपिंग मधील चुकीची माफी असावी.

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.