काही कारणाने आई माझ्या कडे आली होती. ८ मार्च च्या दिवशी आम्ही गप्पा मारत बसलो होतो. ” काही पदार्थ काळा आड गेलेले ……तुला तुझ्या आई ने खायला दिलेले पण तो पदार्थ तु कधीच केला नाहीस आणी तो आपल्याला करता आला नाही याची रूखरूख वाटते असा कोणता विशेष पदार्थ तु मला सांगशील. ” क्षणाचाही विलंब न करता पटकन उत्तर आले “ खापरपोळी ”.
आई मला शिकवच हा प्रकार म्हणून मी मागे लागले. जरा काळजीने मला म्हणाली ” तुझ्या मागे व्याप काय कमी आहेत नसते खूळ डोक्यात घेवू नकोस. हे बघ आजी चुलीवर खापर ठेवून हे करीत असे. आता चूल आणा, खापर शोधा , लाकडे व गोवरी गोळा करा ,परत धूर होणार तो वेगळाच.”
या सर्व प्रकरणाचा निकाल अवघ्या दहा मिनीटांत लावला. जय्यत तयारी करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी छान साग्रसंगीत सोहळ्याची तयारी झाली.
आता खापरपोळी चे साहित्य व कृती पाहूया.
साहित्य

- २ वाट्या तांदूळाची पिठी
- १ वाटी पातळ पोहे
- १ चमचा लोणी
- अर्धा वाटी तेल
- चवीपुरते मीठ
कृती
- रात्री पाण्यात तांदूळाची पिठी भिजत घाला. सरसरीत भिजवा.
- जेव्हा आपण पोळी करणार आहोत त्याच्या आधी पोहे धूवून घ्या. पोहे भिजले की त्याला लोणी लावून कुस्करून भिजवलेल्या पिठात एकत्र करा. किंचीत मीठ घालून मिश्रण फार पातळ अथवा फार धट्ट ही करू नका.
- खापर धुवून घ्या जरा हडकलं की चूलीवर चांगले १० मिनिटे तापवून घ्यायचे.
- तापलेल्या खापराला तेल लावा व भांड्यात पिठ घेवून एकाच जागी ओतायचे. पसरवायचे नाही. झाकण ठेवा. वाफ आल्यावर उलटा व बाजूने तेल सोडून भाजायचे.
खापरपोळी खायची कश्या बरोबर ?

- नारळाचे दूध गूळ यांच्या मिश्रणाशी. पहिली तव्यावरची पोळी नारळाच्या दूधात भिजवायची. तोपर्यंत दुसरी पोळी खापरावर घालायची ती होईपर्यंत पहिली पोळी छान मुरते दुधात. मग पानात घेवून हवे असल्यास त्यावर अजून दूध घेवून खावू शकता.
- नुसते दूध गूळ
- नाहीतर कोणत्याही चटणी बरोबर.

हा सर्व सोपस्कार सोपा नाही याची पुरेपूर कल्पना आहे. पण एका स्त्री ने दुसर्या स्रीचा आदर व्यक्त करण्याचा तो दिवस होता ८ मार्च ,महिलादिन ! माझ्या आईस तिच्या आईने शिकवलेला पदार्थ तिने मला सांगितला. ते सांगताना तिला वाटणारी रूखरूख की तो पदार्थ तिला करता आला नाही …….ही रूखरूख काही प्रमाणात तरी आज दूर झाली त्याचे समाधान काही वेगळेच. एक प्रकारे हा आजी, आई व मी या परंपरेचा जणू महिलादिनी आनंदोत्सव झाला.
ही पोळी करताकरता खापरपणजी या शब्दातील वात्सल्य मनाला येवून बिलगले.
टीप
- खापरावरच करायला हवी पोळी हे जरी खरे असले तरी निर्लेप तवा, बीडाचा तवा या कश्यावरही तूम्ही ती करू शकता. हल्ली तर मातीचे पातळ तवे पण मिळतात.
- तांदूळ पिठी तीन ते चार तास भिजली तरी बास होते.
खूपच छान.
LikeLike
sundar
LikeLike
Aajichi receipe khaparpoli mastach.
LikeLike
कोंकणातील पदार्थ कृती म्हणजे त्यात तांदूळ हा घटक असायला हवा, चूल-शेगडी पेटवण्यासाठी गोवऱ्या अथवा लाकूड-कोळसे ओघाओघाने यायलाच हवे. मंद धगधगीचा विस्तव म्हणजे हळुवारपणे पदार्थाची निर्मिती. त्यातून आजी-पणजीपासून परंपरागत कानांवर पडणाऱ्या प्रेमाची गोडवी आजची सुग्रण करणार, उपलब्ध नसलेला काळाकुट्ट तवा परंतु त्यावर निर्माण केलेली पांढरी शुभ्र जादू -चविष्ठ असायलाच हवी. ….. धन्यवाद!
हेमंत कुळकर्णी
अमेरिका
LikeLiked by 1 person
Wow… khup chhan
LikeLiked by 1 person
शुभांगी म्हणजे उत्साहाचा सळसळता झरा. प्रत्येक वेळी एक नवीन पदार्थ घेऊन पुढे येते. मग त्यासाठी करावी लागणारी तयारी कितीही कठिण असो. त्यातुन तयार होणारी पदार्थ / डिशही भन्नाट असणार हे ओघाने आलेच. आजची खापरपोळीही त्यातीलच ! छान असणारच !!
LikeLike