सध्या देशांत निवडणूकीचा हंगाम सुरू झाला आहे. शेकडो पक्ष, त्यांचे हजारो पुढारी व त्यांना निवडणारे आपण कोट्यावधी. या सर्वांच्या सरमिसळीने होणारी निवडणूक प्रक्रिया पाहिली की आठवण होते ती कोशिंबीरीची. ही कोशिंबीर आधंळी न होता ती डोळस पणे करणे हे आपले घटनात्मक आद्य कर्तव्य. या माहोलात मला कोशिंबीरीचे विविध प्रकार सुचले त्यात नवल ते काय ?
अश्या वेळी दुर्गाबाईंचे खमंग साथीला मिळाले तर दह्यात साखरच.
कैरीची कोशिंबीर
साहित्य

- छोटी कैरी एक
- एक वाटी दही (आंबट नको)
- १/२ वाटी दूध
- १/२ चमचा मोहरी पूड
- १ चमचा साखर
- चविनुसार मीठ व तिखट
कृती
- कैरी सोलून किसून घ्या. मग तासभर तिप्पट पाण्यात घालून ठेवायची.
- एक बाऊल मधे कैरी घट्ट पिळून काढायची. उरलेल पाणी फेकू नका त्याचे सरबत छान होते.
- कैरीवर मीठ, साखर, दही, दूध, मोहरी पूड घालायची व कोशिंबीर करायची. मी कोथिंबीर पण भूरभूरली मला ती आवडते म्हणून .

कैरीची कोशिंबीर प्रकार दुसरा.
साहित्य
- एक कैरी साल काढून चौकोनी तुकडे करून घ्यायचे
- एक कांदा घ्या तोही बारीक चिरायचा
- 1/2 चमचा लाल तिखट
- दोन चमचे साखर
- १ चमचा भरून जिरे पूड ( भरड करायची बारीक पूड नाही ) .
- १/४ चमचा बडीशेप पूड
- चविनुसार मीठ

कृती
- बाउल मधे कैरीच्या फोडी, कांदा, तिखट, जिरेपूड, बडीशेप पूड, मीठ, साखर सर्व गोष्टी एकत्र करून घ्या.
- थोड्यावेळ मिश्रण तसेच ठेवा म्हणजे कोशिंबीरीला जरा पाणी सुटेल.

दाण्याचे कूट, तेल, मोहरी, नारळ कश्याचीही गरज नाही. या सगळ्यांना वगळून सुध्दा कोशिंबीर लाजवाब लागते.
जांभाची कोशिंबीर
माझे आजोळ कोकणातले त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी कडे गेल्यावर उन्हाळी रानमेवा खायचा हा माझ्या सुट्टीचा एक भागच असे. जांभ हे फळ उन्हाळ्यातील पाणीदार फळ .हे फळ तृष्णा शमवते.
लहानपणी एवढे जांभ खाल्ले त्यामुळे सासरी आल्यावर हौसेने मी झाड लावले. आणि भरपूर जांभ लागतात या झाडाला. खारूताई , पक्षी मस्त त्याचा स्वाद घेतात.
तर मला सुचलेली जांभाची कोशिंबीर
साहित्य
- ५ ते ६ जांभ
- एक वाटी भरून दही
- १/४ चमचा मोहरी पूड
- १/२ चमचा साखर
- कोथिंबीर, तिखट, मीठ चविनुसार. दालचिनी पूड.
कृती
- जांभ धुवून कोरडे करून घ्यायचे. जांभाला केशर असते ते काढून टाकायचे व चौकोनी फोडी करून घ्यायच्या.
- बाउल मधे दही, साखर, तिखट, मीठ, मोहरीपूड, दालचिनी पूड घालून मिसळून घ्या. आता त्यात जांभाच्या फोडी घालायच्या.
- मस्त कोशिंबीर तयार याला सुध्दा नारळ, कुट, फोडणी लागत नाही .

मग बघताय ना करून .
काही झटपट कोशिंबीरी
ओल्या काजूची कोशिंबीर
अश्या प्रकारे ओल्या काजूची कोशिंबीर पण छान लागते. पण काजू सोलून दोन भाग करून घ्यायचे व जिरे मोहोरीची फोडणी करून एक वाफ आणायची व गार झाल्यावर नारळ, कोथिंबीर, मिरची, चविपुरती साखर व मिठ घालायचे .
स्विट काॅर्नची कोशिंबीर
स्वीट काॅर्न वाफवून घ्यायचे ( दाणे ) मग त्यात नारळ, कोथिंबीर, मिरची, मीठ घालायचे. जरा काॅर्न गार झाल्यावर त्यात दही मिसळा. वेगळीच चव येते. याला सुध्दा फोडणीची गरज नाही.
कच्च्या पपई ची कोशिंबीर
प्रथम पपई चे साल काढून किसून घ्यायचा. तेलाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे व किस वाफवून घ्यायचा. किस गार झाला की त्यावर मीठ, लिंबू, दाण्याचे कूट,घालून मिक्स करा. वेगळीच कोशिंबीर तयार.
काही टीप्स
- कच्च्या कोशिंबीरी अगदी जेवणाच्या आयत्या वेळेस करा म्हणजे चव छान राहते.
- दही घालून करायच्या कोशिंबीर मधे थोडे दूध घालावे चव एकदम छान लागते
खूपच छान लेख.
LikeLike
Jambhachi koshimbir aajach karun baghte!
LikeLiked by 1 person
कैरीचा पोपट …अफलातून !!
LikeLike
कोशिंबीरी मस्त
जांभाची तर लग्गेच करून बघेन
उन्हाळ्यात भाज्या नकोश्या वाटतात
हा मस्तं पर्याय आहे
LikeLike
Mast kairi chi mast and jambh chi pan
LikeLike
Sarva prakarchya koshimbiri mastach👌
LikeLike