कचोरी म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर शेगावची कचोरी येवढेच आठवते. मुगाची डाळ, किंवा डाळी भिजवून त्या वाटून केलेली कचोरी आपल्याला माहित आहे. पण मी जी आज कृती सांगणारे ती जरा हटके आहे. “खमंग” हे दुर्गा भागवत यांचे पुस्तक वाचताना आरोग्यदायी गाजराची कचोरी कशी करता येईल हे वाचनात आले व ते तत्परतेने करून पाहिले.
कचोरी म्हणजे साटोरीची तिखट- मीठाची आवृत्ती.
तिखटाची कचोरी करताना कणकेत बेसनाचं पीठ व मोहन घालून त्याची पारी केल्यास ही कचोरी खमंग लागते असे दुर्गा बाईंचे म्हणणे आहे.
मी सारणात व पारीत थोडा बदल आणला. बाईंच्या मुळ कृतीत त्यांनी ही कचोरी नुसती गाजराची करा असे म्हटले आहे. गाजर किसून त्यात दाण्याचे कूट घालून साबूदाणा खिचडीसारखे परतून घ्यायचे अशी पुस्तकात कृती दिली आहे.
त्यात मी खालील प्रमाणे बदल केला.
साहित्य

पारीचे साहित्य
- १ वाटी मैदा
- १/२ वाटी बारीक रवा
- २ छोटे चमचे तेल, चीमुट भर ओवा
- वरील साहित्य हे पारीचे आहे
सारणाचे साहित्य
- १ वाटी भरून गाजराचा किस
- १ वाटी भरून ओला हरभरा
- ३ ते ४ मिरच्या
- ३ ते ४ लसूण पाकळ्या
- वाटी भरून बारीक चिरलेली कोथींबीर
- १ चमचा जिरेपूड,१ चमचा लिंबाचा रस,१/२ चमचा किसलेलं आल,१ /२ चमचा धनेपूड.
कृती
- प्रथम मैदा, बारीक रवा, चवीनुसार मीठ, ओवा हे सर्व एकत्र करून घ्या. दोन चमचे तेल गरम करून पीठात घालून, पीठ भिजवून घ्यायचे. नेहमी पेक्षा पीठ घट्ट भिजवायचे.
- पॅन मधे १/२ चमचा तेल घालून ते गरम झाले की त्यात आलं, लसूण, मिरची, याचा खरडा घालून परतायचे. मग त्यात हिंग, हळद, गाजर, हरभरा (हरभरा मीक्सर मधे घालून जरा एकदाच फिरवा). आता याला एकच वाफ आणा. मग त्यात धनेजिरे पूड, मीठ, लिंबु रस किंवा अामचूर पावडर, मीठ व कोथींबीर घालून सारण गार करत ठेवा.
- आता पहिल्यांदा भिजवलेल पीठ कुटून किंवा फूडप्रोसेसर वर फिरवून घ्या.
- भिजवलेल्या पीठाचे पोळी करण्यासाठी लागेल एवढा उंडा करून गोल पोळी लाटायची. लाटलेल्या पोळीवर काॅर्न फ्लाॅवर किंवा तांदूळ पीठी भूरभूरायची. आणी चक्क सुरळी करून घ्यायची. मग सुरीने छोटे तुकडे करून घ्यायचे सुरळीचे. एक लाटी घेऊन पुरी लाटायची. पुरी जरा जाडसरच करा पातळ नको. खरंतर पुरणाच्या पोळी सारखा उंडा करायचा त्यात हे सारण १ ते २ चमचे भरा, मग उंड्याचे तोंड मिटून घ्यायचे व हातानेच हा उंडा चपटा करायचा.
- कढईत तेल तापवून घ्या व कचोरी मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
- मस्त नारळाची चटणी किंवा खजूर चिंच चटणी बरोबर खायला द्या.
टीप
हे मिश्रण फ्रीज मधे चांगले टिकते त्यामुळे आयत्या वेळेस पटकन पाहुणे आले तर करायला झटपट व सोयीचे जाते.
mast…
LikeLike
व्वा!! मस्त रेसिपी
करून बघेन
मटार पण चालेल ना?
आता हरभरा मिळणार नाही इथे
LikeLiked by 1 person